Home बातम्या डॉनगिरी

डॉनगिरी

0

मुंबईतील आयपीएल क्रिकेट सामन्यानंतर अभिनेता शाहरुख खान आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात झडलेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतरच्या सर्वच घडामोडी अत्यंत दुर्दैवी आहेत. या वादाची परिणती म्हणून शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने पाच वर्षे वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेशबंदी घातली आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रारही यापूर्वीच दाखल झालेली आहे. एका सर्वपरिचित सेलिब्रिटीसंदर्भातील हा वाद असल्याने सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष त्याकडे वेधले जाणे साहजिक आहे. मात्र, हा वाद एवढा चिघळणे योग्य नाही आणि गोष्टी एवढ्या चिघळण्याचा दोष दोन्ही बाजूंकडे जातो. शाहरुखचे आज जे खलनायकी चित्र निर्माण केले जाते आहे ते योग्य नाही. सभ्य, सुसंस्कृत आणि अत्यंत तरल विनोदबुद्धी असलेला हा अभिनेता आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर प्रत्यक्षात वादाची ठिणगी उडली तेव्हाचे शाहरुखचे वर्तन अनाकलनीय आहे. त्याच्यावर आरोप होतो आहे त्याप्रमाणे तो खरोखरच मद्य प्राशन करून आला होता का आणि त्याच्या संतापाचा पारा एवढा वाढवण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची आणि जे तेथे तेव्हा उपस्थित होते त्या बघ्यांची भूमिका काय हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर चूक कोणाची यासंदर्भात ठोस निर्णय घेता येत नाही.

झडलेल्या बाचाबाचीचे जे संवाद प्रसृत झाले आहेत, त्यातून काय घडले त्याचा साधारण अंदाज येतो. शब्दाला शब्द भिडून वाद वाढत गेला आणि त्यातून शाहरुखनेदेखील काही असभ्य भाषा वापरली. तो मद्याच्या अंमलाखाली असो, नसो, त्याने वापरलेली भाषा गैर होती यात शंका नाही. परंतु त्याच्याशी हुज्जत घालणार्‍यांनाही प्रसंगावधान राखून हा वाद थोपवता आला असता. परंतु अरे ला कारे करत आव्हाने – प्रति आव्हाने दिली गेली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी हा वाद निष्कारण प्रतिष्ठेचा बनवला आहे. शाहरुखने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आपल्या मुलांशी सुरक्षेच्या नावाखाली गैरवर्तन झाल्याने आपण भडकलो असे त्याने सांगितले, परंतु माफी मागण्यास मात्र त्याने नकार दिला. चूक त्याची असो वा नसो, निदान आपल्या तोंडून निघालेल्या गैर शब्दांबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त करण्यास काही हरकत नव्हती, परंतु त्यानेही हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आहे. शाहरुखसंदर्भातील हा काही पहिला वाद नव्हे. २००८ साली त्याचे सलमानशी एका पार्टीत वाजले होते. शिरीष कुंदेरला थप्पड लगावल्याचे प्रकरण तर ताजेच आहे. एरव्ही जाहीर कार्यक्रमांमध्ये अत्यंत मोकळाढाकळा, विनोदी वागणारा शाहरुख कधी कधी असा बेताल का होतो हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना अशा वेळी पडल्याखेरीज राहत नाही. आताही शाहरुखचे हे वर्तन अनाकलनीय आहे. तो आज केवळ भारतातच नव्हे, तर जगभरामध्ये नावाजलेला अभिनेता आहे. दुबई असो वा लंडन, जेथे जेथे तो जातो, तेथे तेथे त्याच्या देशी – विदेशी चाहत्यांची गर्दी लोटत असते. अशा लोकप्रियतेवर स्वार असलेल्या शाहरुखने स्वतःचे सार्वजनिक वर्तन सुधारायलाच हवे. अभिनेत्यांबाबत वार्ता वदंता सदैव येतच असतात, परंतु त्यांना हवा देण्याचे काम त्याने आपल्या वर्तनाने करू नये. प्रसारमाध्यमांची आपल्यावर अगदी २४ तास कडी नजर असतानादेखील त्याने असे स्वैर वागणे त्याच्या प्रतिमेला मारक आहे. जयपूरच्या आयपीएल क्रिकेट सामन्यात त्याला जाहीरपणे सिगारेट ओढताना सर्वांनी पाहिले. आपण या देशातील लाखो तरुणांचा आदर्श आहोत आणि आपले अनुकरण करण्याचा आपले हे लाखो चाहते सदैव प्रयत्न करीत असतात हे भान शाहरूखने ठेवायलाच हवे. त्यामुळे अशा बेजबाबदार वर्तनाने आपली अभिनयातली सारी पुण्याई घालवून बसण्याची पाळी त्याच्यावर येऊ शकते. बुधवारी झालेल्या वादावादीवेळी त्याची छोटी कन्या सुहाना मागून आपल्या बेभान पित्याला मागे खेचताना दिसते आहे. हे छायाचित्र अस्वस्थ करणारे आहे. शाहरुख हा चित्रपटांतला सुपरस्टार असेल, ही स्टारगिरी त्याने रस्त्यावर दाखवण्याचा प्रयत्न करू नये. आपण सेलिब्रिटी आहोत म्हणजे सार्‍या कायदे कानूनांच्या वर आहोत असाही भ्रम बाळगू नये. जे घडले त्यात आपली अजिबात चूक नव्हती असा विश्वास असेल तर आपला विरोध प्रकट करण्याचे सनदशीर मार्ग खुले होते. मात्र, त्याऐवजी गैरवर्तनातून त्याचीच प्रतिमा डागाळली आहे.