मांडवी नदीतील डेल्टिन काराव्हेला कॅसिनो अखेर कालपासून बंद ठेवण्यात आला. राष्ट्रीय हरित लवादाने डेल्टिन काराव्हेला कॅसिनो सीआरझेड परवाना नसल्याने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. एनजीटीच्या आदेशानंतरही सदर कॅसिनो सुरू होता. या आदेशाला आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आलेली आव्हान याचिका सदर कॅसिनोच्या व्यवस्थापनाला मागे घ्यावी लागली आहे; कारण एनजीटीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयातच आव्हान याचिका दाखल करता येऊ शकते. सदर कॅसिनोमुळे पर्यावरणाच्या झालेल्या हानीचा आढावा घेऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा आदेश गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेला आहे.