>> ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; सिडनीत ‘लिटल इंडिया’ प्रकल्पाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान काल त्यांनी सिडनीत ‘लिटल इंडिया’ प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्याशिवाय, त्यांनी सिडनीतील एरिना स्टेडियममध्ये जवळपास 20 हजार अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. आपल्या भाषणामध्ये मोदींनी भारतात सर्व क्षेत्रात होत असलेल्या बदलांविषयी माहिती दिली. आजच्या घडीला डिजिटल क्रांतीने भारतीय नागरिकांचे जीवन बदलले आहे. आता सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या दुकानांपर्यंत डिजिटल क्रांती दिसत आहे. 40 टक्के रिअल टाइम डिजिटल पेमेंट एकट्या भारतात होतात. आज फळे, भाजी किंवा पाणीपुरीच्या गाड्या असोत, सगळीकडे डिजिटल व्यवहार होत आहेत. तसेच देशातील 50 कोटी भारतीयांची बँक खाती उघडली गेली असून, त्यांना बँकांचे सर्व फायदे मिळत आहेत. जनधन बँक खाती ही आधार आणि मोबाईलशी लिंक केली गेली आहेत, असे मोदी म्हणाले.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे दाखल झाले. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर 20 हजार भारतीय लोकांना मोदींनी संबोधित केले. भारत ऑस्ट्रेलिया संबंध, भारतीय संस्कृती, भारताची प्रगती यासह अनेक मुद्द्यांना हात घालत मोदींनी संवाद साधला.
आपल्या भाषणामध्ये मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंध कशा प्रकारे सुधारत आहेत आणि प्रस्थापित होत आहेत याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. तसेच, भारताकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचीही माहिती दिली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकूण 13 व्यक्तींची नावे घेतली. यामध्ये काही अनिवासी भारतीय व्यक्तींचाही समावेश होता. त्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांचाही समावेश होता. या सर्व व्यक्तींची नावे घेऊन मोदींनी त्यांचे आभार मानले. तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान संबंध सुधारण्यात या व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचे मोदींनी यावेळी नमूद
केले.
मी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो, तेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते की, तुम्हाला आणखी 28 वर्षे भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाची वाट पाहावी लागणार नाही. सिडनीमध्ये मी पुन्हा उपस्थित आहे आणि मी एकटा आलेलो नाही. माझ्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही आले आहेत. त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या सगळ्यांसाठी आले आहेत. हा भारतीयांबद्दल त्यांच्या प्रेमाचाच दाखला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताप्रती केवढे प्रेम आहे हेच यातून दिसते, असेही मोदी म्हणाले. या नात्याचा सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा पाया म्हणजे परस्पर विश्वास आणि परस्पर आदर आणि त्यामागचे खरे कारण प्रवासी भारतीय आहेत, असेही ते म्हणाले
याच वर्षी मला पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे भारतात अहमदाबादमध्ये स्वागत करण्याची संधी मिळाली होती. आज त्यांनी इथे लिटल इंडियाचे भूमिपूजन करण्यात मला साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे. हे लिटल इंडिया ऑस्ट्रेलियाच्या विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाचे प्रतीक आहे, असेही मोदींनी नमूद केले.
भारताकडे सामर्थ्याची कमतरता नाही : मोदी
भारताकडे सामर्थ्याची कमतरता नाही, भारताकडे संसाधनांची कमतरता नाही. आजच्या घडीला भारत सर्वात मोठा आणि सर्वात युवा प्रतिभेचा देश आहे. भारत विकसित राष्ट्र बनले पाहिजे, हे आपल्या मित्र देशांचेही स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.