डिचोली येथील मुस्लिमवाडा व सर्वण या भागातील दोन गटांत झालेल्या मारामारीनंतर डिचोलीत सोमवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या मारहाण प्रकरणात मुस्लिमवाडा येथील एक युवक जखमी झाल्याने तेथील सुमारे २००हून अधिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात जमून मारहाण करणार्या युवकास अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी उपअधीक्षक बोसेट सिल्वा यांनी शांततेचा भंग होऊ नये तसेच कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये हे लक्षात घेऊन बैठक घेतली.
दरम्यान, सदर प्रकारामुळे तणाव निर्माण झाल्याने धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी उपअधीक्षक बोसेट सिल्वा यांनी सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक घेऊन हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व धर्मियांनी सहकार्याचे आश्वासन दिले.
उपअधीक्षक बोसेट सिल्वा यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, शुक्रवारी डिचोली येथील जलील सालसकर व सर्वण येथील शंकर सावंत (पोलीस कर्मचारी) यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यावसान किरकोळ मारहाणीत होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोचले होते. हे प्रकरण सामजस्यांने मिटवण्याचा पवित्रा दोन्ही गटांनी घेतल्यानंतर हे प्रकरण सिल्वाच्या मध्यस्थीने मिटवले होते.
सोमवारी सायंकाळी सर्वण येथील काही युवक मुस्लिमवाडा येथे जलील याच्या घरी आले. तो उपलब्ध नसल्याने त्याच्या दुकानावर दगडफेक केली. त्यात शबीर शेख याच्या डोक्याला जखम झाल्याचे उपअधीक्षक सिल्वा यांनी सांगितले.
या प्रकारानंतर सुमारे २०० जणांचा गट डिचोली पोलीस ठाण्यावर जमा झाला. या मारहाण प्रकरणातील दोघांना रात्री ११ पूर्वी अटक करण्याचा आग्रह धरल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकारामुळे डिचोलीत जादा पोलीस कुमकही मागविण्यात आली होती. या प्रकरणी इब्राहीम अमीर हमजा यांनी पोलीसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी धीरज सावंत, सागर सावंत, राजेश सावंत, उमेश म्हादईकर (गावडे) यांच्यासह पोलीस कर्मचारी शंकर सावंत यास अटक केल्याचे उपअधीक्षक बोसेट सिल्वा यांनी सांगितले.
सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक
या प्रकारामुळे डिचोलीत निर्माण झालेल्या तणावावर मात करण्यासाठी उपअधीक्षक बोसेट सिल्वा, निरीक्षक हरीश मडकईकर, शिवराम वायंगणकर यांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यास माजी आमदार राजेश पाटणेकर, रायू सावंत, विश्वनाथ धावस्कर, शशिकांत हळर्णकर, फोंडू सावंत, शेख रूफकी सालसकर, रियाज बेग, रौफ सालसकर, फादर आर्नोल्ड पिन्टो, कॅजिटन वाझ, रॉबिनसन पाउल आदी उपस्थित होते. बैठकीत दोन गटांत निर्माण झालेला तणाव सामंजस्याने मिटवण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनीच या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन प्रकरणावर सामजंस्याने तोडगा काढण्याचे ठरले.