टॅक्सी स्टँड त्वरित द्या; अन्यथा आजपासून रास्ता रोको

0
2

>> मोप विमानतळाकडे जाणारी सर्व वाहने अडवणार; टॅक्सी व्यावसायिकांचा इशारा

मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्य सरकारने त्वरित काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्टँड किंवा ब्ल्यू टॅक्सी स्टँड त्वरित दिला नाही किंवा जागेचे नियोजन करून तशा प्रकारचा आदेश काढला नाही, तर मंगळवार दि. 2 मेपासून रास्ता रोको करण्याचा इशारा टॅक्सी व्यावसायिकांच्या टुगेदर फॉर मोपा एअरपोर्ट संघटनेने काल दिला. नागझर जंक्शनवरील रस्त्यावर मोपा विमानतळाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने अडवली जाणार असल्याचा इशाराही सदर संघटनेने नागझर येथे काल आंदोलनावेळी दिला. यावेळी जनजागृती फेरी देखील काढण्यात आली.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक पेडणेवासीयांना काळ्या-पिवळ्या टॅक्सी स्टँड आणि तोही हक्काचा स्टँड सरकारने उपलब्ध करावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून 23 जानेवारीपासून प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान आंदोल, सरकारला लेखी निवेदन दिले. या लेखी निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आश्वासने दिली; मात्र ती पाळली गेली नसल्यामुळे आता आमची सहनशीलता संपली आहे. सरकारने त्वरित आम्हाला टॅक्सी स्टँड उपलब्ध करून द्यावा, तशा प्रकारची अधिसूचना जारी कराी आणि वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन आमच्या हक्काचा स्टँड आम्हाला उपलब्ध करावा, अशी मागणी संघटनेने
केली.

आजपासून रस्त्यावर उतरणार : नारुलकर
सरकारने दिलेले आश्वासन आजपर्यंत पाळलेले नाही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्टँड देणार असे जाहीर झाले होते; परंतु अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही. शांततेने मोर्चा काढलेला आहे, कायदा हातात घेतलेला नाही. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही आणि स्टँड दिला नाही, तर आम्ही मंगळवारपासून रस्त्यावर उतरणार. त्यानंतर कुणीही मध्यस्थी केली तरी आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भास्कर नारुलकर यांनी दिला.