Home बातम्या टॅक्सी व रिक्षाच्या भाडेवाढीस मान्यता

टॅक्सी व रिक्षाच्या भाडेवाढीस मान्यता

0

पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन सरकारने टॅक्सी, ऑटोरिक्षा व मोटरसायकल टॅक्सीच्या भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून सदरवाढ आज गुरुवार दि. १० पासून लागू होणार आहे.

ऑटोरिक्षासाठी पहिल्या किलोमीटरसाठी १३ रुपये होते. त्यात वाढ करून १५ रुपये केली आहे तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १२ रुपये वाढ दिली आहे. पिवळ्या व काळ्या रंगाच्या टॅक्सीसाठी पहिल्या किलोमीटरसाठी १४ वरून १६ रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १२ रुपये भाडे निश्‍चित केले आहे. वातानुकुलित टॅक्सीचा पहिला किलोमीटर १६ रुपये होता. तो १८ रुपये करण्यात आला आहे. त्यानंतरचा प्रत्येक किलोमीटर १२ वरून १४ रुपये केला आहे.

सुपर लक्झरी टॅक्सीचा पहिल्या किलोमीटरचे भाडे २८ वरून ३२ रुपये केले आहे तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी २२ वरून २५ रुपये केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाडेवाढ झाली होती. राज्यात सुमारे ३०० रिक्षा, पिवळ्या व काळ्या रंगाच्या ४०० टॅक्सी, वातानुकुलित व अन्य मिळून सुमारे ८००० टॅक्सी असल्याची माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली. राज्यात अडीच हजार मोटर सायकल पायलट आहेत.

सरकारने वरील भाडेवाढ दिली असली तरी प्रत्यक्षात रिक्षावाले प्रवाशांची लुबाडणूकच करीत असल्याच्या तक्रारी येतात. वरील भाडेवाढीमुळे पणजी बाजार ते आल्तिनोवरील प्रवासासाठी ३० रुपये भाडे द्यावे लागेल. परंतु काही रिक्षावाले वरील अंतराच्या प्रवासासाठी ४० ते ५० रुपये भाडे आकारतात, अशा वाहन चालकांवर सरकारकडून कारवाई होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पर्यटक बस भाड्यातही १५ टक्के वाढ करण्यात आली आहे.