Home बातम्या टूजी घोटाळा प्रकरण : कनिमोझीसह सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

टूजी घोटाळा प्रकरण : कनिमोझीसह सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

0

११ नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी व द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांच्यासह सर्व आठ आरोपींचे जामीन अर्ज काल विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावले. येत्या ११ नोव्हेंबरपासून या खटल्याची पुढील सुनावणी सुरू होईल असेही न्यायमूर्तींनी जाहीर केले. जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी तीन कारणे दिली. ‘‘केलेला गुन्हा जाणूनबुजून केलेला गुन्हा आहे, आर्थिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे’’ असे मत न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी जामीन अर्जावर निवाडा देताना व्यक्त केले.

टूजी घोटाळ्यांतील आरोपींनी सार्वजनिक पैसा स्वतःसाठी वापरल्याचा ठपकाही न्यायमूर्ती सैनी यांनी ठेवला. रागाच्या भरात एखाद्याकडून खून होऊ शकतो, परंतु आर्थिक स्वरूपाचा गुन्हा हा वैयक्तिक लाभावर डोळा ठेवून आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतील याची तमा न बाळगता थंड डोक्याने केला जातो, असेही श्री. सैनी यावेळी उद्गारले.

जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने तीन कारणे अधोरेखित केली. केंद्रीय गुप्तचर विभागाने जामीन अर्जांस विरोध केलेला नसला तरी कायद्याच्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही, करीम मोरानी या आरोपीने स्वतःच्या आजारपणाबाबत सादर केलेली कागदपत्रे तो आजार कोठडीत न ठेवण्या इतपत गंभीर असल्याचे दर्शवीत नाहीत आणि कनिमोझी या खटल्यातील एकमेव महिला आरोपी असल्या, तरी त्या खासदार आहेत व समाजातील वरच्या वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणे संभवत नाही, असे मत व्यक्त करीत न्या. सैनी यांनी आरोपींचे जामीन अर्ज रद्दबातल केले. आरोपींचे हक्क महत्त्वाचे असले तरी ज्यांचे नुकसान झाले त्यांचे आणि साक्षीदारांचे हक्कही काही कमी महत्त्वाचे नाहीत, असेही न्यायमूर्तींनी सुनावले. द्रमुक नेते करुणानिधी यांच्या कन्या असलेल्या कनिमोझी गेल्या मे महिन्यापासून तिहार तुरुंगात आहेत. लाच स्वीकारणे, सरकारी तिजोरीला गंडा घालणारे कट कारस्थान रचणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्यासह कलैग्नार टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकुमार, सिनेयुग फिल्म्सचे संस्थापक करीम मोरानी, कुसेगाव फ्रूटस् अँड व्हेजिटेबल्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असिफ बलवा, राजीव अग्रवाल यांचे जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत.