Home बातम्या ‘टीम अण्णा’साठी आता नियमावली

‘टीम अण्णा’साठी आता नियमावली

0

टीम अण्णासाठी लवकरच खास घटना बनवण्यात येणार आहे. टीममध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश करावा, संबंधित सदस्याकडून काही चुका झाल्या तर कशाप्रकारची कारवाई करायची, याबाबतचे नियम या घटनेत असतील. तोपर्यंत सध्याची कोअर कमिटी काम करत राहील. नंतर यथावकाश टीम अण्णाची पुनर्रचना केली जाईल, असे स्वत: अण्णांनी स्पष्ट केले.

टीम अण्णाच्या कोर कमिटीची बैठक गाझियाबादमध्ये शनिवारी झाली. परंतु सध्या मौनव्रतावर असलेले अण्णा हजारे बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती अण्णांना देण्यासाठी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण आदी सदस्य काल सकाळी राळेगणसिद्धीला पोहोचले. नंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अण्णा हजारे यांच्या सहीचे लेखी निवेदन वाचून दाखविण्यात आले.

आम्ही कॉंग्रेसच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही असे सांगताना लवकरच देशव्यापी दौरा करणार असल्याचा पुनरुच्चार अण्णांनी केला.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला मिळालेल्या देणगीच्या रकमेत ८० लाख रूपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपाचा अरविंद केजरीवाल यांनी यावेळी इन्कार केला. याबाबत कोणाला काही शंका असतील तर अगदी कुणाही सरकारी एजन्सीकडून त्याबाबतची चौकशी करावी, असे केजरीवाल म्हणाले.