जॉन तेलीस उर्फ आंतू हा या टोळीचा म्होरक्या असून पोलिसांनी या टोळीकडून अडीच कोटी रु. चे फर्नेस ऑईल, आठ टँकर व एक टेम्पो जप्त केला. पोलीस उपमहानिरीक्षक ओमप्रकाश मिश्रा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गुन्हा अन्वेषण पोलीस विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – संतोष पटेल (मध्यप्रदेश), विद्याधर दयेकर (काकोडा), दिगंबर पेडणेकर (उपासनगर), राजेंद्रकुमार राणा (सांकवाळ), जितेंद्र सिंग (सांकवाळ), महंमद गौस (वास्को), गोपाळ मेस्त (शांतीनगर), कासिम शेख (वास्को), मुजिम मदिहाळ (चांदर), बसप्पा मेत्री (नावेली), राजकिशोर (उत्तरप्रदेश), साहबलाल सयस्वार (वेर्णा) व कृष्णा हरजी.
वरील आरोपींत टँकरचे ड्रायव्हर व क्लिनर यांचा समावेश असून टोळीचा म्होरक्या जॉन तेलीस याच्या सुचनेनुसार ते भरलेला टँकर जुवारीनगर येथे असलेल्या त्याच्या गॅरेजजवळ वळवायचे. नंतर टँकरमधील कधी ५० तर कधी १०० लिटर ऑईल काढले जायचे. हे ऑईल काढल्यानंतर टँकरचे वजन कमी होऊ नये यासाठी तेवढ्याच वजनाच्या पाण्याच्या बाटल्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवल्या जायच्या हे ऑईल चोरण्यासाठी मदत करणार्या टँकर चालकाला प्रत्येक वेळी २ ते ५ हजार रु. जॉन तेलीस द्यायचा. चोरलेले हे फरनेस ऑईल जॉन तेलीस नंतर औद्योगिक आस्थापनांना विकायचा.
हे टोळके गेल्या किती काळापासून या चोरीत गुंतले होते ते अधिक तपासांतीच कळू शकणार असल्याचे मिश्रा म्हणाले. जॉन तेलीस याची गॅरेज ही जुवारीनगर येथे एका निर्जनस्थळी असून त्यामुळे टँकरमधून होणार्या ऑईलच्या चोरीचा कोणाला सहसा सुगावा लागत नसे असे ते म्हणाले.
अत्यंत संघटितपणे जॉन तेलीस या भामट्याची ही टोळी ही चोरी करत असे. पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने चोरट्यांना अटक करण्यासाठी जुवारीनगर येथे सापळा रचला. यावेळी पोलिसांना ऑईल टँकर निर्जनस्थळी नेऊन तेथे ऑईल काढून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी छापा मारून टँकर चालकाला पकडल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. नंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली.