Home बातम्या टँकरच्या चाकाखाली सापडून महिला ठार

टँकरच्या चाकाखाली सापडून महिला ठार

0

येथील एल. एल. गोम्स मार्गावर टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने नवेवाडे येथे राहणार्‍या सौ. सुरत उर्फ सुदीक्षा सुदेश भोसले (३२) या जागीच ठार झाल्या. त्या नवहिंद टाईम्स दैनिकाचे वास्को प्रतिनिधी सुदेश भोसले यांच्या पत्नी होत. त्या मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला होत्या.

सकाळी त्या आपल्या कार्यालयामध्ये जाऊन तेथून नंतर बायणा येथील आईची भेट घेऊन नवेवाडे येथे डिओ (जीए ०६ एच ७४३९) दुचाकी वरून जात होत्या. येथील रेमंड हार्डवेअर जवळ बाजूला असलेल्या मालवाहू रिक्षाला धक्का बसल्याने दुचाकीसह रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी तेथून जाणार्‍या टँकरच्या (जीए ०६ टी ४७६९) खाली आल्याने टँकरचे मागील चाक तिच्या उजव्या बाजूकडील अंगावरून गेल्याने जागीच तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरताच सकाळपासून लोक मोठ्या प्रमाणात भोसले यांच्या नवेवाडे येथील निवासस्थानी जमा होऊ लागले. संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोकांनी तिचे अंतिमदर्शन घेतले. तिला दोन वर्षाची मुलगी असून ११ मार्च रोजी दुसरा वाढदिवस साजरा केला होता. सभापती राजेंद्र आर्लेकर, आमदार मिलिंद नाईक, कार्लुस आल्मेदा, माविन गुदिन्हो, माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा, पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर, एम. पी. टी. चेअरमन मारा पांडियन, नगरसेवक इत्यादींनी भोसले यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले.