हरयाणातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार तिसर्या स्थानी फेकला जाऊन हरयाणा जनविकास पक्षाचे कुलदीप बिश्नोई निवडून आल्याने ‘टीम अण्णा’ या विजयाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र, तेथील एकंदर राजकीय समिकरणे आणि पार्श्वभूमी लक्षात घेता अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामुळे कॉंग्रेस उमेदवार तेथे पराभूत झाला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. निवडून आलेले कुलदीप बिश्नोई हे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे चिरंजीव. हरयाणामध्ये कॉंग्रेसचे राज्य आणण्यात याच भजनलाल यांचा मोठा वाटा होता. परंतु पुढे राज्यातील जाट मतांवर डोळा ठेवून कॉंग्रेसने भजनलाल यांच्या जागी हुडांना आणले. मुख्यमंत्रिपद नाकारल्याने त्यांनी हरयाणा जनविकास पक्ष हा पक्ष काढला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ८९ जागांवर उमेदवार उभे केले आणि या समुद्रमंथनातून कसेबसे सहा उमेदवार विजयी झाले.
त्यानंतर बिश्नोईंच्या कॉंग्रेसशी वाटाघाटी चालल्या होत्या, परंतु त्या फसल्या आणि या सहापैकी पाचजणांना कॉंग्रेसने हिकमतीने आपल्या गोटात ओढून बिश्नोईंना दणका दिला. ही सारी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली, तर या बिश्नोईंना निवडणुकीतील विजय सुकर करून देऊन ‘टीम अण्णा’ ने काय मिळवले हा प्रश्न उपस्थित होतो. भाजपाचे पाठबळ आणि आपल्या पित्याचा नावलौकीक यामुळे आपण जिंकलो असे खुद्द बिश्नोई म्हणतात. ‘‘अण्णा यायच्या आधीच लोकांनी माझा विजय पक्का केला होता’’ असेही त्यांनी सुनावले आहे. त्यामुळे जनलोकपालच्या मुद्द्यावर लोकांनी तेथे कॉंग्रेस उमेदवारास पाडले असे म्हणणे पटणारे नाही. काही विधानसभांच्या जागांवरील पोटनिवडणुकांचे जे निकाल आले आहेत, त्यामध्येही कॉंग्रेस उमेदवार पराभूत झालेले असले, तरी त्यामागीच कारणे स्थानिक आहेत. जनलोकपाल आणि त्यासंदर्भात ‘टीम अण्णा’ने निर्माण केलेल्या वातावरणाला त्याचे श्रेय देता येणार नाही. महाराष्ट्रात खडकवासल्याच्या पोटनिवडणुकीत, गळ्यातल्या सोन्याच्या माळांमुळे प्रख्यात झालेले मनसेचे माजी आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना आपल्या गटात ओढून त्यांच्या दिवंगत पतीच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रयत्न केला. परंतु पुणे जिल्ह्यातल्या व पवारांच्या प्रभावाखालील या मतदारसंघात राष्ट्रवादीला जबर दणका बसला. कॉंग्रेसने दाखवलेला निरुत्साह आणि मनसेचीही गुप्तपणे भाजपला लाभलेली साथ यातून वांजळे पराभूत झाल्या, त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या तडकभडक कार्यशैलीबाबत असलेल्या नाराजीमुळेही राष्ट्रवादीला तेथे दणका बसला आहे. आंध्र प्रदेशच्या बांसवाडामधला निकाल हाही तेलंगणामधील आंदोलनाशी संबंधित असल्याने स्थानिक घटकच कारणीभूत ठरले आहेत. बिहारमध्ये दरोंदामध्येही राजद उमेदवाराचा पराभव हा स्थानिक परिस्थितीनुरूपच आहे. या सर्व निकालांवरून एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे टीम अण्णाने कितीही राष्ट्रजागरण केलेले असो, शेवटी निवडणुकांमधून स्थानिक प्रश्न आणि स्थानिक परिस्थितीच महत्त्वाची ठरत असते. खरे तर देशाला वेढून राहिलेला भ्रष्टाचार, महागाई, घोटाळ्यामागून चाललेले घोटाळे याबद्दल देशातील जनतेला प्रचंड चीड आहे. परंतु मतपेटीतून ती व्यक्त करायची वेळ आली की मात्र, उमेदवाराची जातपात, आपला – परका ही भावना, स्थानिक मुद्देच प्रभावी ठरतात. त्यामुळे ‘टीम अण्णा’ काही म्हणो, अण्णांच्या देशव्यापी दौर्याचा काडीमात्र परिणाम त्या त्या प्रदेशांतील निवडणुकांच्या निकालांवर दिसून येणार नाही. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मते देऊ नका असे सांगताना त्याला पर्याय मात्र अण्णा देत नाहीत. तुम्हाला हवे त्याला मत द्या, परंतु कॉंग्रेस उमेदवाराला देऊ नका असे म्हटले तरी त्यातून शेवटी निष्पन्न काय होणार याचा विचार करायला नको? केवळ जनलोकपालपुरते पाहून राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी म्हणून अण्णांचे सहकारी ही चाल खेळले असले, तरी त्याचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम संभवत नाही, एवढी आपल्याकडची राजकारणी मंडळी निर्ढावलेली आहेत. निवडणूक कशी जिंकायची याचे डावपेच अण्णांपेक्षा त्यांना अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत हेच तर देशाचे दुर्दैव आहे!