जमीन खरेदीत 14 कोटींची फसवणूक; माजी आमदारासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद

0
5

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातील एका रिअल इस्टेट कंपनी आणि कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध न्हावेली-डिचोली येथील प्रेमचंद्र गावस यांची जमीन खरेदीवेळी सुमारे 14.9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या संचालकांमध्ये एका माजी आमदाराचाही समावेश आहे.

जमीन खरेदीसाठी जानेवारी 2008 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेईश मागूश रियल इस्टेट कंपनीला सुमारे 14.9 कोटी रुपये दिले होते; परंतु आपणाला जमिनीचा ताबा मिळालेला नाही, असे प्रेमचंद्र गावस यांनी तक्रारीत म्हटले आहे. या रियल इस्टेट कंपनीच्या संचालकांमध्ये एका माजी आमदाराचा समावेश असून, त्यांचे नाव सुरेश परुळेकर असे आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी पणजी येथील असून. तक्रारदार डिचोली येथील आहे; परंतु तक्रारदार आणि संशयित आरोपी यांच्यात तारदेव, मुंबई येथे बैठका झाल्यामुळे मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सुरेश परुळेकर, प्रसाद परुळेकर आणि मंदा परुळेकर या 3 संचालकांविरुद्ध कलम 409 (लोकसेवक, किंवा बँकर, किंवा व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग), 420 (फसवणूक) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.