मुरगावातील क्रूझ टर्मिनल नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित

0
4

>> कोची बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांची माहिती; पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला सुरुवात

मुरगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल नोव्हेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित होईल. त्यामुळे गोवा, कोची, मुंबई बंदर पायाभूत सुविधांसाठी कौशल्य विकास उपक्रम हाती घेण्यासाठी ओळखले जाईल, अशी माहिती कोची बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. व्ही. एम. बीना यांनी काल दिली.

जी-20 समूहाच्या पर्यटनविषयक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला पणजी येथे काल सुरुवात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, केंद्रीय पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यांची बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीच्या दोन आनुषंगिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोस्टल सर्किट योजना मंजूर केली आहे. गोव्यातील रुई द ओरेम खाडी, आग्वाद किल्ला, सिकेरी-बागा, हणजूण-वागातूर, मोरजी-केरी आदी भागांचा विकास केला जाणार आहे. पश्चिम किनारपट्टी मेरीटाईम इंडिया मिशन अंतर्गत इतिहास आणि संस्कृती थीमवर आधारित सर्किटचा भाग म्हणून विकसित केली जाईल, अशी माहिती डॉ. बीना यांनी दिली.

रेड्डी यांनी क्रुझ पर्यटन आणि पर्यटन क्षेत्रातील प्लास्टिकची अर्थव्यवस्था या विषयांवरील आनुषंगिक कार्यक्रमांना संबोधित केले. भारताचा विस्तीर्ण समुद्रकिनारा केवळ व्यापारासाठी आणि आपली निर्यात वाढवण्यासाठीचा प्रमुख मार्ग आहे असे नव्हे तर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठीची मोठी संधी देखील आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.

क्रूझचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 2015-16 मधल्या 1.26 लाखांवरून वाढून 2019-20 मध्ये 4.68 लाखांवर पोहोचली. सागरी हवाई सेवेचे परिचलन सुधारण्यासाठी 16 ठिकाणी सागरी विमानतळ विकसित केले जात आहेत आणि 2023 पर्यंत निवडक बंदरांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल विकसित करण्याचे देखील उद्दिष्ट आहे. भारत सरकारने 75 पेक्षा जास्त दीपगृहांच्या जवळच्या क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

क्रूझ पर्यटन क्षेत्रामध्ये केवळ गोव्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याची अमर्याद क्षमता आहे. समुद्रपर्यटनाच्या क्षमता फक्त गोव्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशातील पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करतीले, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

राज्यांतर्गत पर्यटन सेवांचा विस्तार करताना ‘देखो अपना देश’ संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. देशाची महत्त्वपूर्ण शहरे रेल्वे व हवाई सेवेद्वारे जोडताना नव्या आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात येतील. गोवा डेहराडून थेट विमान सेवेद्वारे उत्तरकाशी व दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या गोव्याशी जोडली गेली आहे. गोव्याचा सांस्कृतिक वारसा व आंतरग्राम पर्यटनाचे ब्रँडिंगही केले जाईल. वेगवेगळ्या उत्सवांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेऊन पर्यटन विस्तार करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

पर्यटन विस्तारासाठी कटिबद्ध : खंवटे
गोवा सरकार पर्यटन विस्तारासाठी कटिबद्ध आहे. इको, अध्यात्म, योग व आयुर्वेद पर्यटनासह गोव्यातील आंतरग्राम पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जी- 20 बैठकीत बोलताना दिली.