– ज. अ. रेडकर
युद्धसैनिक ते जननायक असा जीवनप्रवास करणारे श्री. किसन बाबुराव ऊर्फ अण्णा हजारे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असावे. युद्धकाळात जवळच्या सहकार्यांचा डोळ्यांदेखत मृत्यू झाला हे त्यांच्या मनाला खूप लागले व त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. विमनस्क अवस्थेत रेल्वे फलाटावर येरझारा घालत असताना तिथल्या बुकस्टॉलवर विवेकानंदांचे ‘राजयोग’ हे पुस्तक दिसले. ते पुस्तक वाचतानाच त्यांच्या मनातील आत्महत्येचे दुष्ट विचार पुसले गेले आणि त्याऐवजी आपले जीवन देशहितासाठी खर्च झाले पाहिजे असे नवीन विचार त्यांच्या मनात घोळू लागले.
सैन्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेलीच होती. आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय त्यांनी त्यापूर्वीच घेतलेला होता. तेव्हा पुढे काय करावे अशा विचारात ते ‘राळेगण शिंदी’ या नगर जिल्ह्यातील छोट्याशा गावात पोचले. घर ना दार, संसार ना प्रपंच. तेव्हा त्यांनी आसरा घेतला तो तिथल्या पडक्या मंदिराचा! सोबत एक वळकटी आणि पत्र्याचा एक ट्रंक! त्यात त्यांचे काही कपडे, सैन्यदलातील काही पदके आणि स्वामी विवेकानंदांचा ‘राजयोग!’ एवढीच त्यांची मालमत्ता!!
सुरुवातीचे बरेच दिवस त्यांनी विचार करण्यात घालवले. अवर्षणामुळे कोरडा दुष्काळ पडलेला हा गाव! शिंदीचे बन! त्यापासून दारू गाळण्याचे अड्डे! व्यसनाधीन लोक, नशेत बायका–पोरांना मारबडव, शिक्षणाचा अभाव या सगळ्या दुष्टचक्रात गाव अडकला होता. मंदिरात येणार्या काही आया–बहिणी आपली कर्मकहाणी त्यांना सांगायच्या. गावातून फेरफटका मारण्याचे, घडामोडींचे चिंतन करण्याचे व्रतच त्यांनी घेतले. या चिंतनातूनच त्यांना सूर गवसला आणि उजाड, भकास ‘राळेगण शिंदी’चे ‘राळेगण सिद्धी’ असे रूपांतर झाले. हा सारा इतिहास श्री. अण्णा हजारे यांच्या तोंडून ऐकण्याचा–पाहण्याचा प्रत्यक्ष योग १९८७ च्या नोव्हेंबरमध्ये जुळून आला.
त्याचे असे झाले. शिक्षण खात्याने महाराष्ट्रात राबवली जाणारी प्रौढ शिक्षण मोहीम कशा प्रकारे चालते याचा अभ्यासदौरा तत्कालीन साहाय्यक संचालक श्री. प्रकाश सालेलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता. पेडणे तालुका शिक्षणाधिकारी म्हणून माझा त्या गटात समावेश होता. ग्रामीण भागात काम करणारे हरहुन्नरी शिक्षक श्री. पांडुरंग नाडकर्णी, श्री. श्रीधर वेरेकर, श्री. आत्माराम कुडचडकर, शिक्षण खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी (अभ्यासापेक्षा पर्यटनात आनंद मानणारे), प्रौढ साक्षरतेचे काही पर्यवेक्षक, श्री. शंभू आमोणकर हे निवृत्त प्राचार्य असा एकूण पंधरा जणांचा जमू या दौर्यावर होता. मजल दरमजल करीत आम्ही २१ नोव्हेंबरला राळेगण सिद्धी येथे पोहोचलो. ते कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. तिथल्या अतिथिगृहात आमची राहायची सोय केली होती. दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता अण्णांशी भेट ठरली होती. तो संपूर्ण दिवस आम्ही सर्वजण अण्णांच्या सहवासात होतो. त्यांनी चालवलेल्या सर्व योजनांची माहिती ते प्रत्यक्ष फिरून देत होते. १९७८–७९ सालापर्यंत ओसाड, भकास असणारा, अवर्षणग्रस्त गाव आता हिरवाईने नटला होता. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ बंधारे योजनेद्वारे मुळातच पडणारा अल्प पावसाचा थेंबन् थेंब अडवला गेला, जिरवला गेला आणि अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या गावातील विहिरी तुडुंब भरल्या. त्या पाण्यावर शेती डोलू लागली. व्यसनमुक्तीच्या चळवळीने जोर धरला. दारूचे अड्डे बंद पडले. शिक्षणाला पर्याय नाही म्हणून बालवाडी ते माध्यमिक शाळा सुरू झाल्या. प्रौढ निरक्षरांसाठी साक्षरता वर्ग सुरू झाले. गावात विजेची स्वयंपूर्णता यावी म्हणून सौरऊर्जा आणि पवनचक्की उभारली गेली. (तोवर पवनचक्की फक्त पाठ्यपुस्तकातील चित्रातच पाहिली होती.) गोबर गॅस प्लांट यांचाही वापर त्या स्वयंपूर्ण खेड्यात केलेला आढळला. स्वातंत्र्यानंतर तीस–पस्तीस वर्षांत सरकारला जमले नव्हते ते अण्णांनी एकहाती परिवर्तन सात–आठ वर्षांत घडवून आणले होते. तोपर्यंत अण्णा प्रकाशझोतात नव्हते.
हे सगळे करत असताना अण्णांना सरकारी कार्यालयांतून (अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते सनदी अधिकारी आणि गावपातळी ते मंत्रालय) योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. प्रत्येक ठिकाणी विलंब, अडवणूक होत होती. त्यातूनच माहिती अधिकाराचा लढा अण्णांनी सुरू केला. महाराष्ट्र सरकारला हा कायदा संमत करावा लागला. या कायद्याच्या कचाट्यात भले भले सापडले आणि त्यातील कित्येकांना आपली मंत्रिपदे सोडावी लागली. काहींच्या नोकर्या गेल्या, काहींना तुरुंगाची हवा खावी लागली आणि लागत आहे हे आज आपण पाहत आहोत.
यानंतर भ्रष्टाचारमुक्त शासनव्यवस्था ही मोहीम अण्णांनी हाती घेतली. १६ ऑगस्ट २०११ रोजी भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. याचे चक्षुर्वसत्य अवलोकन आपण सर्वांनीच केले आहे. यापूर्वी रामदेवबाबांनी याविषयी आवाज उठवला होता. परंतु चर्चेच्या गुर्हाळात गुंतवून राज्यकर्त्यांनी अकल्पितपणे त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यांना पळता भुई थोडी केली. बिच्चारे रामदेवबाबा! संन्याशाची काषाय वस्त्रे फेकून स्त्रीवेष धारण करून त्यांना पलायन करावे लागले. पण त्यांचा तोही प्रयत्न फसला. पोलिसांनी त्यांना पकडलेच. पण उगाच बिलामत नको म्हणून सहीसलामत त्यांना हरिद्वारच्या आश्रमात रवाना केले. परंतु त्यांचा हा पलायनवाद त्यांच्या समाजातील प्रतिमेला धक्का देणारा ठरला. हवेतून चालणारा त्यांचा रथ जणू भूतलावर आदळला! सरकारने अशी काही खेळी केली की ‘साप भी मरे लेकिन लाठी ना तुटे!’ त्यानंतर तर सरकारने त्यांच्या योगपीठाच्या अर्थव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांना मिळालेल्या लाखोच्या देणग्या हा भ्रष्ट पैशातील वाटा होता. त्यामुळे भ्रष्टाचाराविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही अशी दवंडी पिटवली गेली. ज्यांनी भल्या मोठ्या देणग्या दिल्या होत्या त्यातील काहींनी तर वेगळेच आरोप करायला सुरुवात केली. रामदेवबाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्णन् यांना पारपत्राच्या जंजाळात अडकवले गेले. चहूबाजूंनी चीत झालेले बाबा हतबल झाले. आम जनतेच्या मनातले त्यांचे स्थान डळमळले. ‘योग आणि आरोग्य’ याबद्दल त्यांचे अभियान उत्तुंग असूनही ‘भ्रष्टाचार’ या एकाच मुद्यावरून त्यांना दोन घरे मागे जावे लागले.
अण्णा हजारेंचे आंदोलनही आपण असेच मोडीत काढू या भ्रमात सरकार राहिले. नियमभंगाचे कारण दाखवून त्यांना तिहार जेलच्या कोठडीत टाकले. ज्यात चोर, दरोडेखोर, लुटारू, खुनी, देशद्रोही बंदिस्त होते. हीच सरकारची कृती महागात पडली आणि अण्णांच्या आंदोलनाने जोर पकडला. तब्बल तेरा दिवसांच्या उपोषणानंतर सरकार अण्णांपुढे नमले. खुद्द पंतप्रधानांचे आश्वासक पत्र अण्णांना मिळताच त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. पण त्यांच्या मते, आपण लढाई अर्धी जिंकली. जनलोकपाल जोपर्यंत येत नाही तोवर आंदोलन थांबणार नाही.
प्रचंड व अभूतपूर्व प्रतिसाद अण्णांना मिळाला. याचे कारण अण्णांचा साधेपणा, सच्चेपणा. निरपेक्षता व राष्ट्रीयहिताची भावना सार्या देशाला भावली. जयप्रकाशजींच्या १९७७ च्या आंदोलनानंतर स्वातंत्र्यकाळातील हे दुसरे यशस्वी आंदोलन म्हणता येईल. या यशामागे वृतवाहिन्यांचा फार मोठा वाटा आहे. अण्णांच्या उपोषणकाळातील ‘आँखो देखा हाल’ विविध वाहिन्यांवरून चोवीस तास चालू होता. वाद–विवाद, क्रिया–प्रतिक्रिया, परिसंवाद सतत झडत होते. त्यातून समाजमन घडत गेले. गावागावांतून सभा, मिरवणुका सुरू झाल्या. पंढरीच्या वारीला जनसागर लोटावा तसा रामलीला मैदानावर लोटला. दिल्लीतील कर्मचारी कार्यालयीन वेळेनंतर आपल्या परिवारासह अण्णांच्या दर्शनाला येत होते. नितीन मेखिया हा संगणक अभियंता कॅलिफोर्नियातील आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून आंदोलनात सामील झाला. रवी सारंगन या वास्तुविशारद आपले कार्यालय बंद ठेवून कर्मचार्यांसह आंदोलनात उतरला. तीस हजारी कोर्टाचे जज्ज अजय पांडे शासकीय सेवाशर्ती बाजूला ठेवून व्यासपीठावर आले. दिवसेंदिवस आंदोलन जोर पकडत होते, पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अपवाद फक्त बेळगाव इथल्या काही अतिउत्साही तरुणांनी आवेशाच्या भरात किरकोळ दगडफेक केली याचा! त्याचेही दुःख अण्णांना झालेच!
जनभावना पाहून सरकार नमले आणि येत्या हिवाळी अधिवेशनात मजबूत जनलोकपाल विधेयक आणू अशी इच्छाशक्ती तरी दाखवली हेही नसे थोडके!
अण्णांमागचे शुक्लकाष्ट
अण्णांमागचे शुक्लकाष्ट अद्याप संपलेले नाही. कोअर कमिटीतील श्रीमती किरण बेदींची खोटी प्रवास बिले, श्री. केजरीवाल यांनी आंदोलनात जमलेला निधी आपल्या ट्रस्टमध्ये वळता केल्याचा आरोप, श्री. प्रशांत भूषण यांनी काश्मीरविषयी प्रकट केलेले जाहीर मत व त्यातून त्यांना झालेली मारहाण अशी प्रकरणे उद्भवली. एकेकाळी कोअर कमिटीत असलेले, परंतु अण्णांच्या उपोषणकाळात बाजूला पडलेले स्वामी अग्निवेष यांनी आंदोलनच मोडीत निघावे म्हणून केलेले प्रत्यक्ष–अप्रत्यक्ष प्रयत्न यांनी अण्णा दुखावले. स्वकीयांनीच चालवलेला हा गोंधळ त्यांच्या मनाला रुचला नाही आणि म्हणूनच की काय अण्णांनी मौनव्रत घेतले.
अण्णांचा जीवनपट
अण्णांचे पूर्ण नाव ः किसन बाबुराव हजारे
जन्मगाव ः भिंगार (नगर जिल्हा)
जन्मतारीख ः १५ जून १९३७
शिक्षण ः प्राथमिक शिक्षण पूर्ण
नोकरी ः १९६३ साली सैन्यदलात वाहनचालक म्हणून १५ वर्षे
सेवा. १९६५ च्या भारत–
पाक युद्धात सहभाग/जखमी.
अण्णांचे प्रमुख समर्थक
१) श्री. शांती भूषण (माजी न्यायमंत्री तथा सुप्रसिद्ध वकील)
२) श्री. प्रशांत भूषण (प्रसिद्ध वकील)
३) श्री. अरविंद केजरीवाल (निवृत्त सनदी अधिकारी)
४) श्रीमती किरण बेदी (निवृत्त आय.पी.एस.)
५) श्री. सतीश सोनक (गोव्याचे प्रसिद्ध वकील)
अण्णांचे प्रमुख टीकाकार
१) श्री. मनीष तिवारी (कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते)
२) श्री. दिग्विजय सिंग (कॉंग्रेसचे प्रमुख नेते)
३) श्री. कपिल सिब्बल (मानव संसाधन मंत्री)
४) श्री. स्वामी अग्निवेष (माजी मंत्री)
५) श्री. गो. रा. खैरनार (निवृत्त नगरपालिका आयुक्त)
६) श्रीमती अरुणा रॉय (सदस्य, राष्ट्रीय सल्लागार समिती)
सामाजिक कार्य
• स्वेच्छा निवृत्तीनंतर संन्यस्तपणे राळेगण शिंदी याचे रूपांतर अवघ्या आठ वर्षांत सुजलाम् सुफलाम् राळेगण सिद्धीत केले.
• १९९१ साली भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन.
• २००३ साली माहिती अधिकारासाठी १२ दिवसांचे उपोषण.
• १६ ऑगस्ट २०११ रोजी जनलोकपाल विधेयकासाठी प्राणांतिक उपोषण. १३ दिवसांनी सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती माघार.
मिळालेले पुरस्कार
१) पद्मभूषण (१९९२)
२) पद्मश्री (१९९०)
३) प्रियदर्शनी वृक्षमित्र.
४) कृषिभूषण.
५) यंग इंडिया पुरस्कार.
६) मॅन ऑफ द इयर (१९८८)
७) पॉल मित्तल ऍवॉर्ड (२०००)
८) टी. आय. आय. ऍवॉर्ड (२००३)
९) तामिळनाडू येथील गांधी ग्राम विद्यापीठाची डॉक्टरेट ही मानद उपाधी.
१०) विवेकानंद सेवा पुरस्कार (१९९४)
११) महावीर पुरस्कार (१९९७)
१२) केअर इंटरनॅशनल ऍवॉर्ड (१९९८)
१३) राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (१९९९)
१४) जनसेवा पुरस्कार (१९९८)
१५) शिरोमणी पुरस्कार (१९९६)
१६) रोटरी इंटरनॅशनल मानवसेवा पुरस्कार.