- ज. अ. रेडकर
दीनदयाळ यांनी मुलांची नावे आश्रम शाळेत घातली. आक्कीच्या डोक्यावरचे ओझे एकदम हलके झाले. परमेश्वराने एक दार बंद केले तरी दुसरे दार तिच्यासाठी खुले केले होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांचे शिक्षण याची सोय झाली होती. आक्कीची चिंता मिटली होती.
‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ असे म्हटले जाते. अनेकदा त्याचा प्रत्येय येत असतो. आक्की हीदेखील त्याला अपवाद नाही. रोजंदारीवर काम करणारा तिचा नवरा तीन पोरांना पदरी टाकून अचानक देवाघरी गेला. आक्कीच्या डोक्यावर जणू आकाशच कोसळले. नवऱ्याच्या रोजच्या मेहनतीवर चालणारे घर आता कसे चालवायचे हा प्रश्न तिच्यासमोर ‘आ’ वासून उभा होता. तीनही मुले शाळेत जाणारी. उत्पन्नाचे कोणतेच साधन हाताशी नाही. जगायचे कसे या प्रश्नाचे उत्तर तिच्यापाशी नव्हते. कुणाचा आधार नसलेल्या या कुटुंबावर सामूहिक आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नव्हता. याचवेळी आक्कीच्या सुदैवाने एका सामाजिक संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबाचे सर्वेक्षण करणारे दोन कार्यकर्ते तिच्या झोपडीपाशी पोहोचले. झोपडीच्या एकूण अवस्थेवरूनच हे कुटुंब कोणते हलाखीचे जीवन जगते आहे याची कल्पना त्यांना आली. हे कार्यकर्ते दयाळू अंतःकरणाचे होते. कारण दीनदयाळ वर्तक यांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यांनी त्वरित संस्थाप्रमुख असलेल्या दीनदयाळ वर्तक यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सगळी हकिगत सांगितली.
संस्थाप्रमुख दीनदयाळ वर्तक हे आपल्या नावाप्रमाणेच गरिबांचे कैवारी होते. दयाळू होते. ते त्वरित आक्कीच्या झोपडीपाशी आले. झोपडीची अवस्था अशी होती की येत्या पावसाळ्यात ती कधीही जमीनदोस्त झाली असती. आक्की आणि तिच्या तिन्ही पोरांची खपाटीला गेलेली पोटे पाहून दीनदयाळ यांच्या हृदयात कालवाकालव झाली. त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला. आश्रमातील एक खोली साफसूफ करून ठेवायला सांगितली. आक्की आणि तिच्या तीनही पोरांना आपल्या गाडीत घातले आणि तडक ते आपल्या सेवाभावी आश्रमापाशी पोहोचले. आश्रमाच्या नोंदवहीत त्यांनी आक्की आणि तिच्या तीनही मुलांची नावे नोंद केली.
आक्की अशिक्षित असली तरी आश्रमाची साफसफाई किंवा पडेल ते काम ती करू शकणार होती. आश्रमासाठी सफाई कामगार होते, त्या ताफ्यात दीनदयाळ यांनी तिला सामील करून घेतले. जेवणखाणाची सोय आश्रमाच्या स्वयंपाकघरात होती. दीनदयाळ यांनी मुलांची नावे आश्रम शाळेत घातली. आक्कीच्या डोक्यावरचे ओझे एकदम हलके झाले. परमेश्वराने एक दार बंद केले तरी दुसरे दार तिच्यासाठी खुले केले होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांचे शिक्षण याची सोय झाली होती. आक्कीची चिंता मिटली होती.
आश्रमात विविध उपक्रम चालत. पालेभाजीचे मळे, गो-पालन, मधुमक्षिका पालन, गांडूळ खतनिर्मिती इत्यादी इत्यादी. परिसरातील अनेक दानशूर लोकांचा या आश्रमाला हातभार लागत होता. काही स्वयंप्रेरणेने येथे आपली विनामूल्य सेवा देत असत. यातील बरेच स्त्री-पुरुष सेवानिवृत्त होते. आपले उर्वरित आयुष्य सत्कारणी लागावे म्हणून या आश्रमाशी ते जोडले गेले होते. दीनदयाळ यांनी एका उदात्त हेतूने हा आश्रम सुरू केला आहे याची कल्पना परिसरातील लोकांना होती आणि म्हणूनच त्यांच्या सत्कार्याला हातभार लागावा म्हणून ही मंडळी आपसूक आश्रमाशी जोडली गेली होती.
या आश्रमात निराधार वृद्ध, परित्यक्ता स्त्रिया, विनापाश विधवा, अनाथ मुले यांचा भरणा होता. ही सगळी माणसे मिळून आश्रमाची देखभाल करीत असत. पालेभाजीचे मळे फुलवत असत. गो-शाळेची निगा राखीत असत. जे-जे शक्य असेल ते-ते काम हे आश्रमवासी करीत असत. आश्रमात तयार होणारी उत्पादने घाऊक मार्केटमध्ये जाऊन विक्री करीत असत. दर महिन्याला स्थानिक आरोग्य अधिकारी या सर्वांची तपासणी करून जात. आवश्यक ते औषधोपचार करीत.
दीनदयाळ हे महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेले सद्गृहस्थ. भूदान चळवळीतून त्यांना माळरानावरचा हा विस्तीर्ण भूभाग आश्रमासाठी मिळाला होता. खूप मेहनतीने त्यांनी हा भूखंड विकसित केला. तब्बल बारा वर्षांनी त्यांचे स्वप्न साकार झाले आणि आश्रम स्वतःच्या पायावर उभा राहिला. दीनदयाळ यांच्या कार्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. शासनालादेखील त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि गेल्या वर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे कार्य आणि परिश्रम सफल झाले.
दिवस असेच पुढे सरकत होते. आक्की आणि तिची मुले तिथल्या वातावरणाशी एकरूप झाली होती. मुले अभ्यासात हुशार होती. दीनदयाळ यांचे त्यांच्यावर चांगले लक्ष होते. अशीच एके दिवशी आश्रमात बरीच धावपळ चालली होती. लोकांची वर्दळ वाढली होती. याला कारण होते, दीनदयाळ यांचा 75 वा वाढदिवस! तो थाटात साजरा करायचा घाट सर्व आश्रमवासीयांनी आणि दीनदयाळ यांच्या मित्रपरिवाराने घातला होता. डॉ. सदावर्ते यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती यासाठी कार्यरत होती. स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री या सोहळ्यासाठी येणार होते. मंत्री येणार म्हटल्यावर सगळी शासनयंत्रणा सज्ज झाली होती. समारंभात कोणतीही उणीव राहू नये यासाठी सर्वजण झटत होते.
कार्यक्रम ठीक सहा वाजता आश्रमाच्या प्रांगणात सजवलेल्या मंडपात सुरू झाला. सनई-चौघडे वाजू लागले. स्थानिक कलाकार आपली कला पेश करण्यासाठी सज्ज झाले. दीनदयाळ यांना त्यांच्या निवासस्थानाहून वाजतगाजत एका सजवलेल्या घोडागाडीतून आणण्यात आले. प्रवेशद्वाराशी त्यांचे ओवाळून आणि तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. मंत्री महोदयांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ केले. दीप प्रज्वलन झाले. भला मोठा केक कापण्यात आला. रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. सुगंधी फुलांचा वर्षाव करण्यात आला. नादमधुर आवाजात अभीष्टचिंतन करणारी गाणी म्हटली गेली. ‘हार्दिक अभिनंदन… हार्दिक अभिनंदन’ असा एकच गलका झाला आणि तितक्यात मुख्य अतिथींच्या हस्ते त्यांच्या गळ्यात पंच्याहत्तर हजार मूल्य असलेल्या चलनी नोटांचा हार घालण्यात आला.
आमदार, खासदार, मंत्री महोदय यांची त्यांच्या कार्याचे कौतुक करणारी भाषणे झाली. दीनदयाळ हे आपल्या राज्याचे भूषण असल्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली. त्याचबरोबर या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी त्यांना ‘राज्यभूषण’ किताबाने गौरविले जाणार आहे याची घोषणा केली. हे ऐकताच सभामंडपात एकच जल्लोष सुरू झाला. हे सगळे पाहून दीनदयाळ अक्षरशः भारावून गेले. समारंभाला उत्तर देताना त्यांचा कंठ दाटून आला. दीनदयाळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. आपल्या समाजकार्यात कुणाचा अडथळा येऊ नये यासाठी ते आजन्म अविवाहित राहिले. आपल्या कार्याची पोचपावती जनतेने दिली याचे फार मोठे समाधान त्यांना आज लाभत होते. आपले आयुष्य सत्कारणी लागले याची धन्यता त्यांना वाटत होती. गळ्यातील नोटांची माळ त्यांनी अलगद काढली आणि त्या सर्व नोटा आश्रमासाठी बहाल केल्या. कृतकृत्य झाल्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते.
आक्की आणि तिची तीनही मुले या कार्यक्रमासाठी राबत होती. कारण त्यांच्या आधारवडाचा हा सोहळा होता. आक्कीची मुले आता शिकून मोठी झाली होती. स्वतःच्या पायावर उभी होती. पण आश्रमाशी जोडलेली नाळ त्यांनी तोडली नव्हती. कारण त्यांच्या विपन्नावस्थेत दीनदयाळ यांनी त्यांना आधार दिला नसता तर त्यांचे अस्तित्वच उरले नसते याची पूर्ण जाणीव त्यांना आहे.
समारंभस्थळी सुमधुर आवाजात एक कुमारिका गाणे गात होती-
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे…