एवढे सोपे नाही!

0
10

गोव्यातील पोर्तुगिजांच्या खाणाखुणा पुसून टाकण्याची गर्जना मुख्यमंत्र्यांनी केल्याने त्यावरून राज्यात वादाचे मोहोळ उठले आहे. पोर्तुगिजांच्या खुणा पुसणे म्हणजे ‘गोंयकारपण’ नष्ट करणे असा युक्तिवाद पुढे केला जाताना दिसतो. पोर्तुगिजांनी गोवे बेट, इल्हास म्हणजे तिसवाडी, बार्देश आणि सालसेत या गोव्याच्या जुन्या काबिजादींवर जवळजवळ साडे चार शतके राज्य केले. उर्वरित प्रदेश म्हणजे नव्या काबिजादी मात्र त्यांच्या ताब्यात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आल्या, म्हणजे तेथे त्यांचा कब्जा केवळ दीड शतक होता. या फरकाची मोठी छाप या प्रांतांवर आजही दिसते आणि त्यामुळेच गोव्याच्या एकूणच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर मोठे परिणाम झाले आहेत. पोर्तुगिजांनी आणि त्यांच्या जोरावर जेजुईट मिशनऱ्यांनी सुरवातीच्या काळात येथे जो धर्मच्छळाचा आणि धर्मांतरांचा उच्छाद मांडला तो इतिहास सर्वज्ञात आहे. येथील मूळ संस्कृती नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी करून पाहिला. लोक तर बाटवलेच, पण मंदिरे काय फोडली, जुन्या पोथ्या काय जाळून टाकल्या, सणा – उत्सवांवर बंदी काय घातली, अगदी लग्न आणि मुंजीच्या समारंभांपासून भाषेच्या वापरापर्यंत एकही गोष्ट करायची या पांढऱ्या पायाच्या आक्रमकांनी मागे ठेवली नाही. परंतु आपल्या भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती त्यालाही पुरून उरली. शेवटी पोर्तुगिजांनाच मराठी भाषेचा आधार घ्यावा लागला. पोर्तुगीज राजपत्रात मराठी जाहिराती छापण्यासाठी मुंबईहून टाइप आणावा लागला, देवस्थान आणि ग्रामसंस्थांच्या मराठीतून चालणाऱ्या व्यवहाराच्या जाहिराती राजपत्रातून मराठीतून छापाव्या लागल्या, मराठी बाराखडी, इसापनीती, पाठ्यपुस्तके छापावी लागली, पोर्तुगीज – मराठी भाषांतरकार नेमावा लागला, मराठीचे वर्ग सुरू करावे लागले. हा सारा इतिहास लपवण्याचा कोणी कितीही प्रयत्न जरी केला तरी तो लपणारा नाही. गोवा मुक्तीसाठी झालेला संघर्ष आणि त्यानंतर भारतीय सैन्याने काही तासांत संपुष्टात आणलेला शतकांचा बंदिवास मुक्तीनंतरही अनेकांच्या पचनी पडलेला नव्हता. गोवा मुक्तीनंतरही येथे बॉम्बस्फोटांच्या मालिका घडवल्या गेल्या. पोर्तुगीज परत येतील या आशेने अनेकजण तिकडे नजर लावून बसले होते. त्यांच्या खाणाखुणा जपणारेच नव्हे, तर ते मिरवणारे आजही अधूनमधून डोके वर काढत असतात. फुटबॉलमधील पोर्तुगाल आणि ब्राझीलचा विजय त्यांना मग आपला विजय वाटतो, पोर्तुगिज नावांच्या पाट्या घरावर लावण्यात त्यांना धन्यता वाटते. राजधानी पणजीच्या रस्त्यारस्त्यांवर पोर्तुगीज गव्हर्नरांच्या नावांच्या पाट्या आजही आहेत. मळा भागातल्या पाट्या फोडण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांना पुढे सरसावावे लागले होते. गोव्याच्या गावांची आणि माणसांची पोर्तुगिजांनी भ्रष्ट रूपात कागदोपत्री नोंदवलेली शेकडो नावे आजही सरकारदरबारी तशीच प्रचलीत आहेत. कामतचे कामोतीम झाले आहे आणि चोडणचे शोरांव. हे सगळे बदलण्याची धमक सरकारमध्ये आहे काय? ती दाखवली जाणार असेल तर आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू. पण केवळ पोर्तुगिजांनी पाडलेली मंदिरे बदलण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. पोर्तुगिजांनी सुरुवातीच्या राजवटीत अक्षरशः शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. अनेक मंदिरांच्या जागी चर्च उभारल्या गेल्या. जुन्या गोव्याच्या चर्चखालीही शिवमंदिर होते असा दावा केला जात असतो. ही सगळी मंदिरे पुन्हा त्या त्या ठिकाणी उभारणे खरेच शक्य आहे? सप्तकोटीश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार सरकारने केला. आम्ही त्याचे स्वागत केले, कारण तो आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय होता. वेर्ण्याच्या महालसा मंदिराची दिमाखदार पुनर्उभारणी झाली, तेही स्वागतार्ह आहे. परंतु पोर्तुगिजांनी पाडलेल्या प्रत्येक मंदिराची फेरउभारणी व्यवहार्य नाही. पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांची संख्या कमीत कमी आठशेच्या घरात आहे. ही सगळी पुन्हा उभी करणे निव्वळ अशक्यप्राय आहे. पोर्तुगिजांनी बाटवलेल्या आणि ख्रिस्ती बनवलेल्या घराण्यांच्या याद्या उपलब्ध आहेत. आजही यातील अनेक कुटुंबे आपल्या मूळ हिंदू दैवतांना भजतात. सरकार ह्या साऱ्या घराण्यांचे शुद्धीकरण करायला घेणार काय? पोर्तुगिजांनी काजू आणले, पाव आणले, मिरची, बटाटे भारतात आणले. जागतिकीकरणाच्या आजच्या जमान्यात हे सगळे परत पाठवता येणार आहे का? त्यामुळे पोर्तुगिजांच्या खाणाखुणा नष्ट करू असे म्हणत असताना त्याबाबत दिखाऊ अभिनिवेश नव्हे, तारतम्य हवे आहे. पोर्तुगिजांच्या या खुणा पुसायच्या असतील तर आधी सरकारी पातळीवरचा कार्निव्हल बंद करा, गावांची भ्रष्ट नावे बदला, सरकारी दस्तऐवजांतील नावा आणि आडनावांचे चुकीचे स्पेलिंग दुरुस्त करा. या साऱ्यामागचा हेतूही शुद्ध असावा. धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि त्यातून मतांचा स्वार्थी हिशेब त्यामागे नसावा.