चौथी लाट येणार?

0
29

देशातील आणि राज्यातील कोरोना महामारीची स्थिती सध्या नियंत्रणात दिसत आहे ही आश्वासक बाब आहे. मात्र, कोरोना अजूनही संपलेला नाही, किंबहुना तो यापुढेही कायम राहील, मात्र त्याची तीव्रता कमी होत गेलेली असेल असेच चित्र सध्या तरी दिसते आहे. सध्या गोव्यात अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार सक्रिय रुग्णसंख्या केवळ ६७ आहे. एकाही रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागलेले नाही वा एकाचाही मृत्यू ओढवलेला नाही. गोव्यातील कोरोनाची सद्यस्थिती अशी सौम्य आहे, कारण या विषाणूचा जो व्हेरियंट सध्या लोकांना येथे बाधित करीत आहे, तो ओमिक्रॉन बीए.२ हा आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ओमिक्रॉन बीए.२ हा कोरोनाचा सौम्य व्हेरियंट मानला जातो. गेल्या जानेवारीपासून राज्यात उफाळलेल्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती दिलासादायक जरी असली तरी चौथ्या लाटेची टांगती तलवार मात्र आपल्यावर राहणारच आहे असे दिसते. जून अखेरीस चौथी लाट राज्यात उसळू शकते असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेला होता. अद्याप अशा प्रकारची चिन्हे जरी दिसत नसली, तरी अशी एखादी लाट उसळण्यास अवघा आठवडा पुरेसा असतो हे यापूर्वी वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या डिसेंबर अखेरीस गोव्यात अशीच सामान्य परिस्थिती होती, परंतु नववर्षात नवी लाट अचानक उसळली आणि बघता बघता गंभीर बनली. ही अनिश्‍चितता यापुढेही कायम राहणारच आहे.
देशामध्ये सध्या रोज सरासरी तीन हजारच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यात चढउतारही दिसतात. सरकारी आकडेवारीनुसार सध्या देशात अवघे साडेएकोणीस हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. अर्थात, ही आकडेवारी फसवी असू शकते, कारण मुळात सध्या कोरोनाची बाधा सौम्य स्वरूपाची असल्याने चाचणी न करताच घरच्या घरी उपचार करण्याकडेच नागरिकांचा कल दिसतो. त्यात या विशाल देशाच्या ग्रामीण भागांमध्ये कुठली आली आहे कोरोनाबाबतची जागृती? त्यामुळे सामान्य सर्दी पडशाप्रमाणेच कोरोनाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाणही निश्‍चित मोठे असेल. भारतात कोरोनाने झालेल्या मृत्यूंचे सरकारने जरी चार लाख ऐंशी हजार सांगितले असले, तरी प्रत्यक्षात ते ४७ लाख असू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेचा हा दावा अतिरंजित व पूर्वग्रहदूषित दिसत असला तरीही कोरोना मृत्यूंची सरकारी आकडेवारी विश्वासार्ह म्हणता येत नाही. कोरोना रुग्णांचा वा मृत्यूंचा शंभर टक्के विश्वासार्ह आकडा कधीच कळणार नाही. परंतु साधारणतः त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे तरी नक्की कळत असते. आकडेवारीचे खेळ केले म्हणून त्याचे गांभीर्य लपवता येत नसते.
कोरोनाची चौथी लाट आली तर त्याचा धोका लहान मुलांना अधिक असेल असे राज्याचे लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर नुकतेच म्हणाले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ या मुलांचे लसीकरण झालेले नसल्याने त्यांना संसर्गाची अधिक शक्यता असेल असाच आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य संचालकांनी केले आहे. लशीचे दोन्ही डोस घेतले तरी त्याला आता कित्येक महिने उलटून गेलेले असल्याने त्या लसीकरणातून शरीरात निर्माण झालेली कोरोना प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत गेलेली असेल. त्यामुळे पुन्हा ती निर्माण घेण्यासाठी बुस्टर डोस म्हणजे वर्धक मात्रा घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या राज्यातील परिस्थिती बहुतांशी सामान्य दिसत असल्याने ही वर्धक मात्रा घेण्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. सरकारने साठ वर्षांखालील नागरिकांसाठी ती मोफत उपलब्ध केलेली नाही हेही त्याला प्रतिसाद न मिळण्यामागचे एक कारण आहे.
मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अजूनही गरजेचे आहे, मात्र मास्क सदासर्वकाळ परिधान करण्याची गरज दिसत नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मात्र तो परिधान करणे हितकरच असेल. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र तो सदासर्वकाळ वापरावाच, कारण त्यांची प्रतिकारशक्ती मुळातच वयानुरूप क्षीण झालेली असते. सॅनिटायझरचा वापरही सार्वजनिक ठिकाणी व्हायला हवा तसा तो होताना दिसत नाही. विशेषतः व्यावसायिक आस्थापने, दुकाने, बँका, सार्वजनिक कार्यालये आदी ठिकाणी सॅनिटायझर असणे आणि तो वापरला जाणे गरजेचे आहे. प्रशासनाने कोरोना त्रिसूत्रीची कार्यवाही किमान गर्दीच्या ठिकाणी होईल हे पाहिले पाहिजे, अन्यथा पुन्हा आपण चौथ्या लाटेच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण करण्याची भीती नाही म्हटले तरी आहेच.