लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा गावात गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी चोरीचे अनेक प्रकार घडल्यानंतर तसेच अजूनही काही ठिकाणी रात्रीची दारे ठोठावण्याचे प्रकार घडत असल्याने गावातील युवा शक्ती संघटित झाली असून त्यांनी गटागटाने रात्रभर गावाच्या परिसरात पहारा ठेवण्यास प्रारंभ केला आहे.
१५ दिवसांपूर्वी गावात चोरीचे प्रकार घडले त्यात एका मंदिराबरोबरच काही घरांमध्ये चोरी होऊन किमती ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यानंतरही रात्रीच्यावेळी गावात दरवाजे ठोठावणे, संघटित माणसे फिरण्याचे प्रकार वाढीस लागले. यामुळे गावातील तरूणाई एकटवली व त्यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी गटांची नियुक्ती केली असून गेल्या काही दिवसांपासून हे युवक रात्रभर या भागात पाहारा देत आहेत.
कानोळकरवाडा, गावकरवाडा, खालचावाडा, पिस्तेवाडा, भटवाडी आदि परिसरात युवकांनी वेगवेगळे गट स्थापन केले असून आळीपाळीने रात्रभर पहारा ठेवण्यात येत आहे.
डिचोली पोलीसांनी चोरीचे प्रकार घडल्यानंतर या भागात गस्त वाढवली असली तरी युवकांनी आपणहून गावाच्या रक्षणासाठी गस्त ठेवण्याचा निर्णय घेतलेला असल्याने पंचायत सदस्य बाबलो गावकर यांनी सांगितले.
दरम्यान, काही ठिकाणी मध्यरात्री दारे ठोठावत असल्याने भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डिचोली पोलीस निरिक्षकांनी बैठक बोलावली असून चोरी करणार्यांना गजांआड करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
गावातील युवा शक्तीच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.