Home बातम्या चित्रपटगृहांतून लघुपट न दाखवणार्‍यांविरुद्ध न्यायालयात धाव घेणार : माईक पांडे

चित्रपटगृहांतून लघुपट न दाखवणार्‍यांविरुद्ध न्यायालयात धाव घेणार : माईक पांडे

0

बर्‍याच वर्षांपूर्वी देशातील चित्रपटगृहांतून फिल्मस् डिव्हिजनचे लघुपट दाखवले जात असत. मात्र, आता लघुपट दाखवले जात नाहीत असे सांगून ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नाही. उपग्रह वाहिन्यांनीही सामाजिक बांधिलकी म्हणून माहितीपट दाखवायला हवेत, परंतु एक – दोन वाहिन्या सोडल्यास कोणीही ते दाखवीत नाहीत, अशी तक्रारही पांडे यांनी केली.

दरम्यान, येत्या एक जानेवारीपासून दूरदर्शनवर लघुपटांसाठी रोज अर्धा तास राखून ठेवला जाईल, अशी माहितीही पांडे यांनी दिली. पुढील पाच वर्षे पर्यंत लघुपटांसाठी रोज अर्धा तास राखून ठेवण्याचा व निर्मात्यांना लघुपट निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला असल्याचे ते म्हणाले. भारतीय लघुपट निर्माता संघटनेने दूरदर्शनकडे तशी मागणी केली होती, असे त्यांनी सांगितले. दूरदर्शनच्या निधीसाठी कोणत्या लघुपटांची निवड करावी हे ठरवण्यासाठी लघुपट निर्माता संघटनेने एक निवड समितीही स्थापन केली असल्याची माहिती त्यांनी दिली. २२ मिनिटांचा लघुपट बनवण्यासाठी निर्मात्याला साडे नऊ लाख रुपये मिळायला हवेत अशी संघटनेची मागणी असल्याचे पांडे यांनी सांगितले. तेवढा निधी मिळाला तरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट बनवणे शक्य होईल असे ते म्हणाले.

इफ्फीसाठी नवे परिषदगृह उभारणार

‘इफ्फी’ साठी पणजीत सुमारे बाराशे प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेचे एक परिषदगृह बांधण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, त्याशिवाय तेथेच प्रत्येकी दोनशे लोक बसू शकतील अशी प्रेक्षागारे बांधण्याचाही प्रस्ताव आहे, अशी माहिती ‘इफ्फी’चे संचालक शंकर मोहन व गोवा करमणूक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी काल दिली. इफ्फीसाठी मडगावात दोन सिनेमागृहे बंधली जातील असेही त्यांनी सांगितले. शंकर मोहन यांनी यावेळी ‘इफ्फी’ संदर्भातील समस्या ऐकून घेतल्या.