Home बातम्या चांदण्याचे (तीन) कवडसे

चांदण्याचे (तीन) कवडसे

0

डॉ. सचिन कांदोळकर

आज ८ जुलै.

कविश्रेष्ठ बा. . बोरकर यांची आज पुण्यतिथी. बोरकर जाऊन पाव शतक लोटले. गतवर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. त्यानिमित्त त्यांचे काव्यसंग्रह, संदर्भग्रंथ वगैरे प्रकाशित करण्यात आले. कविता, कादंबरी, ललितनिबंध, कथा यांसारखे वाङ्‌मयप्रकार हाताळणार्‍या बोरकरांच्या कवितेवरच काही ठिकाणी चर्चा झाली. नियतकालिके, गौरवग्रंथ इत्यादी माध्यमांतून त्यांच्या कवितेवर समीक्षात्मक लेख लिहिण्यात आले; बोरकरांच्या ललितनिबंधलेखनाकडे मात्र थोडेफार दुर्लक्षच झाले आहे.

बोरकरांनी खरे तर विपुल प्रमाणात ललितनिबंधलेखन केले आहे. त्यांच्या काही ललितनिबंधांनी तर अतिशय देखणे रूप धारण केले आहे. ललितनिबंध म्हणताच फडकेखांडेकरकाणेकर हे सुरुवातीच्या काळातील तीन लेखक किंवा कुसुमावती देशपांडे यांचे चंद्रास्त’, ‘मध्यान्हमध्यरात्रहे तीन ललितनिबंध आठवावेत, तसे बा. . बोरकर यांच्या माझा मौनवार’, ‘सहजसुंदर वार्धक्यहरवलेली आंगठीया सुंदर ललितनिबंधांचे येथे सहज स्मरण होते.

बोरकरपूर्व ललितलेखन

माझे लेखन हे आत्मचित्रण आहे, या भूमिकेतून सुरुवातीच्या काळात ना. सी. फडके यांनी गुजगोष्टी लिहिल्या आहेत. त्याआधी साहित्याच्या विविध प्रांतांत त्यांनी मुशाफिरी केली होती. त्यामुळे साहजिकच लेखकासंबंधीचे कुतूहल वाचकांच्या मनात जागे झाले. त्याच सुमारास इंग्रजी लेखकांचे लघुनिबंध फडक्यांच्या वाचनात आले होते. आपणही मराठीत असे लेखन करावे या इच्छेने त्यांनी सुहास्यहा पहिला लघुनिबंध (गुजगोष्ट) लिहिला. तो लिहिताना मीच्या अंतरंगात उठणार्‍या विचारविकार तरंगांचे वाचकांना दर्शन घडावे, याकडे त्यांचा कटाक्ष होता. ‘मीच्या व्यक्तिमत्त्वाची, त्याच्या आवडीनिवडींची ओळख वाचकाला खेळकरपणे करून देणे हा गुजगोष्टी लिहिण्यामागील त्यांचा मुख्य हेतू होता.

कथा, कादंबरी, नाटक इत्यादी वाङ्‌मयप्रकार हाताळणारे फडके गुजगोष्टींसारखे ललितनिबंध लिहू लागले याचे कारण या वाङ्‌मयप्रकारात आत्मचित्रणाला अधिक वाव आहे. त्यांच्या गुजगोष्टी स्वरूपाच्या ललितनिबंधांमधून इतर वाङ्‌मयप्रकारांमध्ये अप्रकट राहिलेल्या लेखक मीची एक विशिष्ट वृत्ती प्रकट झाली. ललितनिबंधातील विषयाच्या अनुषंगाने लेखकाच्या स्वभावाची, त्याच्या आवडीनिवडीची वाचकांना ओळख झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पण ललितनिबंध लिहिताना फडके या भूमिकेशी ठाम राहिलेले दिसत नाहीत. त्यामुळे ललितनिबंधांमधून त्यांचा खराखुरा मीप्रकट होताना दिसत नाही. ललितनिबंधामध्ये सत्यापेक्षा सत्याभासाचा मुलामा चढविण्यावर त्यांनी अधिक भर दिला आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या ललितनिबंधातील मीकृत्रिम बनला. याउलट खांडेकरकाणेकर यांच्या ललितनिबंधातील मी.’ त्यांचा मीहा खरा मीच आहे. ललितनिबंधाची रंगत तो लिहिणार्‍या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. काव्य, विनोद, सामाजिक दृष्टी इत्यादी गोष्टींचा ज्या प्रमाणात व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्भाव असतो, तेवढा त्याचा ललितनिबंध आकर्षक होत असतो. शिवाय ललितनिबंध हा मित्राशी केलेल्या संभाषणासारखा असतो. त्यामुळे आपल्या लेखनाला संभाषणाची ऐट कशी प्राप्त होईल, याचा विचार या काळातील अनेक लेखकांनी केला. काहीजण चुटके, विनोद, गमतीदार गोष्टी वगैरे सांगण्यास रंगून गेले. विषय कितीही क्षुल्लक असला तरी त्यातून जीवनविषयक थोडेतरी चिंतन यायलाच हवे, या गैरसमजाच्या आहारीदेखील ललितनिबंध गेला आणि अशा काही कारणांमुळे या वाङ्‌मयप्रकारामध्ये साचेबंदपणा आला.

अन् कोंडी फुटली!

ललितनिबंध हा स्वतःचा शोध असतो, या गोष्टीचा सुरुवातीच्या काळातील लेखकांना विसर पडला. पुढे कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या अनुभूतीचा शोध घेतला तेव्हा कुठे तंत्राच्या चौकटीत सापडलेला ललितनिबंध मुक्त झाला. ललितनिबंधलेखन हे विशिष्ट आकाराचे वा प्रकाराचे लेखन नसून ही विशिष्ट भाववृत्तीच असते. मध्यरात्रीचा आश्‍वासक वात्सल्यभाव, अस्ताला जाणार्‍या चंद्रकोरीने केलेली हुरहुर आणि नंतरची शांती आणि माध्यान्हीच्या वेळेत जाणवणारे समतोल वृत्तीचे स्वारस्य आणि गंभीरतेचा आनंद ही निसर्गाचीच नव्हेत तर स्वतः लेखिकेच्याही मनाची स्पंदने शब्दरूप झालेली दिसली. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत व इरावती कर्वे यांनी ललितनिबंधाला मुक्त वळण दिले.

वाङ्‌मयप्रकार जिवंत ठेवला!

फडकेखांडेकरकाणेकर यांच्यानंतर ललितनिबंध हा वाङ्‌मयप्रकार संपुष्टात येतो की काय असे वाटत असतानाच काहींनी हा वाङ्‌मयप्रकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा लेखकांमध्ये बा. . बोरकर यांचे नाव घ्यावे लागेल.

बोरकरांच्या कागदी होड्याहा ललितनिबंधसंग्रह १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी त्यांचे प्रतिभाजीवनसंगीतहे काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. ‘मावळता चंद्रही त्यांची कादंबरी कागदी होड्याबरोबरच प्रसिद्ध झाली होती. उमेदवारीच्या या काळात त्यांनी ललितनिबंध लिहिले. ते लिहिताना त्यांच्यासमोर फडकेखांडेकरकाणेकर यांचे लघुनिबंध होते. त्यांचे ललितनिबंधलेखन मुक्तीनंतरच्या काळातच खर्‍या अर्थाने बहरले.

चांदणे झाले उन्हाचे

बोरकरांचा चांदण्याचे कवडसेहा संग्रह केवळ गोमंतकीयच नव्हे तर एकूण मराठी ललितलेखनाचा विचार करताना महत्त्वाचा वाटतो. यात कवी बोरकरांचा आत्माविष्कार आढळतो. यातील काही ललितनिबंधांमधून ते आपल्या कवितांची उगमस्थाने सांगतात. या संग्रहातील अनेक ललितनिबंधांमधून गोव्यातील माणसे, निसर्ग, चालीरीती यांवर ते लिहितात. अशा लेखनामधून त्यांची गोव्याविषयी असलेली ओढ व्यक्त होते. ‘गोव्याची ओढयात ते म्हणतात की, चिनारच्या झाडाप्रमाणेच सृजनशील माणसालाही स्वतःची भूमी लागते. काश्मीरमधील चिनार वृक्षाचा अनेकांना मोह पडतो. या वृक्षाच्या सौंदर्याला भाळून अनेकांनी त्याची रोपटी आपापल्या देशांत लावली. पण त्यांनी काश्मीरबाहेर कुठे मूळ घेतले नाही. ती झुरली. बोरकरांची पाळेमुळे गोव्यासारख्या निसर्गरम्य भूमीत रुजल्यामुळे त्यांच्याकडून सुंदर निर्मिती होऊ शकली असे म्हणता येईल.

बोरकरांचे मन केवळ माणसे, झाडे, वेली, पशूपक्षी यांतच रमते असे नाही; त्यांचे सौंदर्यासक्त मन प्रत्येक स्थळात रमते. त्यांचा निखळ आत्माविष्कार माझा मौनवार’, ‘सहजसुंदर वार्धक्य’, ‘हरवलेली आंगठीयांसारख्या ललितनिबंधांमध्ये झाला आहे.

मौन न हे संगीत परिणति!

बोरकरांनी मौनवारचा संकल्प सोडला, आणि सुरुवातीला प्रयास पडले तरी काही आठवडे क्रमाने त्यांनी मौनवार पाळला. माणसे अकारण शब्द किती वापरतात हे मौनामुळे त्यांच्या लक्षात येते. शाब्दिक भाषा आपल्याला निर्बुद्ध बनविते असा त्यांचा समज होतो. ‘‘एका दिवसाचे मौन सुटल्यावर आपणही या निर्बुद्धांत सामील होणार आणि नव्या निर्बुद्धतेची भर घालणार. यापेक्षा मी मुका का झालो नाही?’’ पण विचाराअंती त्यांना मुकेपणाचे देणे नकोसे वाटते. एक दिवस जगाचा वाचाळपणा सहन करणे आपल्याला जमत नाही, मग तो जन्मभर कसा सहन करणार, असा त्यांना प्रश्‍न पडतो. शहाणा होऊन दुःख भोगण्यापेक्षा मूर्ख होऊन दुःखातून सुटणे त्यांना चांगले वाटते. मुकेपणा आणि वाचाळपणा यांच्यातील मधला मार्ग हाच शहाणपणाचा आहे असे त्यांना वाटते. मनुष्य शहाणा होत जातो तसा कमी का बोलतो, लेखक परिपक्व झाला म्हणजे थोडक्यात का लिहितो, अरण्यात राहणार्‍या ऋषींच्या अल्पाक्षरी उद्गारांत शेकडो पुस्तकांत नसलेले तेज का असते, पूर्वीचे आचार्य निःशब्द बसलेले असताना प्रश्‍न विचारण्यापूर्वीच त्यांचे शिष्य छिन्नसंशय का होत, मुलांना आणि पाळीव जनावरांना मनातील भाव मुद्रेवरून चटकन का समजतात, भावना उत्कट झाल्या म्हणजे माणसाची वाचा का मावळते, नाजूक आणि कोमल हृदयसंकेत मनुष्य शब्दांशिवाय का करतो इत्यादी अनेक समस्यांचा त्यांना उलगडा होत जातो. मग ते स्वतःचीच समजूत काढतात– ‘‘भाषा ही ईश्‍वराने दिलेला शाप असेल, पण मौन हा त्यावरचा उःशाप आहे. स्वेच्छेने तो न पाळणार्‍या मानवासाठी निद्रेच्या रूपाने तो त्याने देऊन ठेवला आहे. ते तरी मी पाळतो आहे, आणि तेही नियमाने, हे काय थोडे झाले?’’

हरवलेली आंगठीया ललितनिबंधाकडे बोरकरांचे चिंतनशील कविमन पारदर्शीपणे व्यक्त झाले आहे. बोरकरांची लग्नातील आंगठी घरात कोठेतरी हरवते. सत्तेचाळीस वर्षे सोबत करीत असलेली ही अंगठी हरवली म्हणून बोरकर अस्वस्थ होतात. मन म्हणते, ‘‘तुमचे वय संन्यस्ततेत प्रवेश करण्याचे झाले, असा संकेत तर या निमित्ताने नियतीने आपल्याला केला नसेल?’’ बोरकरांना हा संकेत रुचिर वाटतो. ‘‘संन्यस्ततेत प्रवेश मिळविण्यासाठी भगवी वस्त्रे चढवली पाहिजेत असे थोडेच आहे? सगळ्यांत असावे, जीवनाचा नित्यक्रम निर्वेध चालू राहावा, पण कशातच जिवेभावे गुंतू नये,’’ हा विचार त्यांच्या मनात स्थिर होतो आणि आंगठी हरवल्याचा विषाद नाहीसा होतो. ‘हरवलेली आंगठीहा बोरकरांचा एक उत्कृष्ट ललितनिबंध आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये यात एकवटलेली आहेत.

सहजसुंदर वार्धक्याचा लोभ

हरवलेली आंगठीपेक्षा सहजसुंदर वार्धक्यया ललितनिबंधामध्ये बोरकरांचे मन अधिक मोकळे होताना दिसते. त्यांच्या एका मित्राने वार्धक्याचा धसका घेतला होता. तसे त्याने आमी आता जाण्टे जाले, न्हंय?’ अशा शब्दांत बोरकरांना बोलूनही दाखवले. वार्धक्याचे सहजतेने स्वागत करण्याऐवजी तारुण्याचा आविर्भाव का घ्यावा? तारुण्याला जसे स्वतःचे स्वाभाविक सौंदर्य असते, तसेच वार्धक्यालाही स्वतःचे सहजसौंदर्य नाही काय? असे बोरकरांना प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांबरोबर आपल्या तारुण्यकाळातील चित्तवेधक वृद्ध स्त्रीपुरुष त्यांना आठवतात. मग बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थांसंबंधी त्यांचे चिंतन सुरू होते. ही एकाच जीवनातील तिन्ही अंगे एकमेकांच्या साहचर्याने फुलत असतात, असे ते म्हणतात. मग त्यांना स्वाभाविक तारुण्याइतकेच वार्धक्य अभिलषणीय वाटते. त्यामुळेच ते शेवटी म्हणतात ः ‘‘मला या सहजसुंदर वार्धक्याचा लोभ आहे आणि ते माझ्यातून बहरत आहे, या जाणिवेने मी प्रसन्न आहे.’’ ‘सहजसुंदर वार्धक्यया ललितनिबंधावरही फडक्यांचा प्रभाव जाणवतो. वार्धक्याची जाणीव हा या ललितनिबंधाचा जसा विषय आहे तसाच तो पहिला पांढरा केसया फडक्यांच्या लघुनिबंधाचाही विषय आहे. ‘आम्ही आता वृद्ध झालोहे मित्राचे उद्गार ऐकून बोरकरांना वार्धक्याची जाणीव होते, तर दाढी करताना पांढरा केस दिसताच फडक्यांना तशी जाणीव होते. ही दोन अवतरणे वाचा ः

‘‘माझ्या लहानपणी दोन पिढ्यांमध्ये भिंती होत्या. मी त्या मोडून टाकल्या. प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्र मित्रवदाचरेतहे जीवनसूत्र मी मनोभावे पाळले. त्यामुळे माझी मुलेमुली, भाचेभाच्या, पुतणेपुतण्या आणि भाऊबहिणी माझ्याशी निःसंकोचपणे चर्चावादविवाद करतात. आपले कठोर आणि नाजूक निर्णय घेण्याच्या प्रसंगी त्यांनी मला सदैव विश्‍वासात घेतले आहे. अजून घेतात. नातवंडे माझ्याशी रमी खेळतात. कथाकहाण्या सांगण्याबद्दल मला धोशा लावतात. कोणत्या मुलाने आपल्याला मागणी घातली, हे आपले नाजूक इंगित माझ्या नातीने मला सर्वप्रथम सांगितले आणि माझा सल्ला घेतला. आज समाजातल्या कितीतरी तरुण मुलामुलींनी हे असे नाते माझ्याशी जोडलेले आहे.’’ (‘सहजसुंदर वार्धक्य’)

‘‘मला माझी जवानी कायम ठेवायची असेल तर मला खरी काळजी घेतली पाहिजे माझ्या अंतःकरणाची. तरुण पिढीच्या विचारांशी, भावनांशी, महत्त्वाकांक्षांशी, सुखस्वप्नांशी समरस होण्याची माझी हौस आणि ताकद मी कायम ठेवली पाहिजे. नव्या जगात उदय पावणार्‍या नव्या कल्पनांचं, तत्त्वांचं आणि सिद्धांतांचं मर्मग्रहण करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी सतत राहिलं पाहिजे. नव्या सामाजिक अगर राजकीय प्रयोगांची मला भीती वाटण्याऐवजी उत्सुकता वाटत राहिली पाहिजे. अशा प्रत्येक जगात मी तरुण वृत्तीने मिसळू शकलो की माझं तारुण्य सतत कायमच राहील. जोपर्यंत तरुण पिढीला माझ्या विचारांनी मी आकर्षित करू शकतो तोपर्यंत मी तरुणच राहणार.’’ (‘पहिला पांढरा केस’)

ललितनिबंधात नवताआणली

बोरकरांच्या अशा काही ललितनिबंधांचे फडक्यांच्या लघुनिबंधांशी साम्य असले तरी ते वरवरचे आहे. बोरकरांच्या ललितनिबंधाचे वैशिष्ट्य हे की त्यात काव्यात्मता आहे. शिवाय वृत्तीचा मोकळेपणा आहे. जीवनातील कोवळीकयेथे जाणवते, जी बोरकरपूर्व ललितलेखनात फार थोड्या ठिकाणी आढळते. बोरकरांच्या या किंवा अशा इतर काही ललितनिबंधांमधून लेखकाच्या मनाचे नुसते प्रकटीकरण नाही तर विश्‍लेषण आहे. ‘कागदी होड्यानंतर त्यांचे चांदण्याचे कवडसे’, ‘पावलापुरता प्रकाशघुमटावरले पारवेहे ललितनिबंधसंग्रह प्रकाशित झाले. पैकी नवतेच्या दृष्टीने चांदण्याचे कवडसेहा संग्रह आणि त्यातील माझा मौनवार’, ‘हरवलेली आंगठी’, ‘सहजसुंदर वार्धक्ययांसारखे ललितनिबंध महत्त्वाचे वाटतात. (कविश्रेष्ठ बोरकरांचे हे बायप्रॉडक्टआहे, असे म्हणून या ललितनिबंधांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.) या ललितनिबंधांतील मन इंद्रियांच्या खिडक्यांत बसून रिकामटेकड्या चौकश्या करणारेनाही. ते अंतःकरणाच्या गाभार्‍यातजाणारे आहे.

अभ्यासकांचे दुर्लक्ष

लघुनिबंध हा वाङ्‌मयप्रकार निसरडा कसा असतो, त्यामुळे मीघसरून पडण्याची शक्यता कशी असते, हे मा. ना. आचार्य यांनी या वाङ्‌मयप्रकाराच्या मुक्ततेची कहाणी सांगताना दाखवून दिले आहे. ‘मीला ठामपणे पाय रोवण्याइतके ठाशीव व्यक्तिमत्त्व असेल तर तो या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. बोरकरांना उच्च प्रतीची संवेदनक्षमता, चिंतनशीलता आणि सुसंस्कृतताया देणग्या मिळाल्या होत्या. त्यामुळेच ते कलात्मक ललितनिबंध लिहू शकले. त्यांच्या मराठी कवितेवर भरपूर लिहिले गेले आहे, लिहिले जात आहे. एखाद्याच्या कवितेचा मुक्तपणे आस्वाद घेताना त्याच्या चरित्राचा वा अन्य कुठल्याच बाबींचा विचार करू नये असे काहीजण म्हणतील. पण मला वाटते की, कवी म्हणून बोरकरांचा अभ्यास करताना त्यांच्या माझा मौनवार’, ‘हरवलेली आंगठीसहजसुंदर वार्धक्यया तीन (आणि इतरही निवडक) ललितनिबंधांचा विचार करावा लागेल. हे चांदण्याचे तीन कवडसेच आहेत. ‘विस्तवी येऊन जन्मा चांदण्याचे फूल झालेअसे म्हणणार्‍या बोरकरांच्या कवितेशी हे ललितनिबंध संलग्न आहेत. म्हणून त्यांचे समग्र अथवा निवडक ललितनिबंध प्रकाशित व्हायला हवेत. गो. वि. करंदीकर यांच्या लघुनिबंधांवर असे पुस्तक यापूर्वीच आले आहे. (या पुस्तकाला डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे.) करंदीकर हेही बोरकरांच्या काळात लिहीत होते. त्यांच्या अशा लेखनामध्ये नवता जाणवते. या दोघांनी नवतेच्या दृष्टीने ललितनिबंधाकडे गांभीर्याने पाहिले असते आणि इतरांनी त्यांना योग्य साथ दिली असती तर नवकथेच्या, नवकवितेच्या जमान्यात नवा ललितनिबंधही अस्तित्वात आला असता, एवढे मात्र खरे.