Home बातम्या गोव्यातील दोन अपरिचित वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे

गोव्यातील दोन अपरिचित वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे

0

नारायण विनू नाईक, मंगेशी.

मंदिरे ही मनुष्याची संस्कार केंद्रे असून त्या संस्कारातूनच मानवी जीवन सार्थकी लागत असते. देवाच्या भक्तीने मानवामध्ये क्रांती होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक शक्तीच तारक आहे. जनसमुहामध्ये देव भक्ती निर्माण करीत असतात.

जगात विश्‍वशक्ती आहे. तिलाच ईश्‍वर किंवा भगवंत म्हणतात. तिची उत्पत्ती, स्थिती, लय आणि तिचाच अंश प्रत्येकाच्या शरीरात आत्मशक्तीच्या रूपाने वावरत असतो. प्राचीन भारतीयांनी जो आदर्श समोर ठेवला, त्याला त्यांनी देव असे नाव दिले आहे. देव या शब्दाचा अर्थच आहे, प्रकाश देणारा, मार्गदर्शन करणारा. या देवाची भक्ती करावी. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे, मनातले प्रेम व सद्भावना. त्या त्याच्या चरणावर अर्पण करायला हवे.

फोंडा तालुक्यातील प्रियोळ गावच्या मंगेशी या पवित्र स्थळी श्री गणपतीचे मंदिर आहे. त्या स्थळाला गणसा भाटअसे म्हणतात. हे मंदिर खूप प्राचिन असावे असे वाटते. पूर्वी श्री गणपती मूर्तीच्या मागे उंचच उंच असे भव्य वारूळ होते. ते हल्लीच म्हणजे नूतन मंदिराचे बांधकाम करण्यापूर्वी देवाचा कौलप्रसाद घेऊन काढून टाकण्यात आले. अशा वारूळात सर्पाचे वास्तव्य असते. त्याची दुसर्‍या ठिकाणी राहण्याची सोय करावी लागते.

श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावच्या लोकांनी तेथील एक ग्रामस्थ आनंद भावे यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामस्थ, भाविक व इतर लोकांकडून निधी गोळा करून देवालयाच्या बांधकामाची उत्तम कार्यवाही करण्यात आली. काही भाविकांनी वैयक्तीक वस्तूरूपाने देणग्याही दिल्या. डॉ. राजन प्रभाकर शेणवी प्रियोळकर यांनी टाईल्स बसवून दिल्या. देवालयाची वास्तू अत्यंत आकर्षक आणि देखणी झालेली आहे. गर्भगृह, सभामंडप सुबक बनवण्यात आलेला आहे. गावचे ते एक भूषण ठरलेले आहे.

स्व. रामकृष्ण रानडे हे नियमित गणपती पूजेसाठी जात असता, मंदिराच्या परिसरात त्यांना पुष्कळ साप दिसले. एक दिवस त्यांनी देवाला कौल लावला तेव्हा त्या ठिकाणी काही धार्मिक विधी योग्य प्रकारे होत नसल्याचे समजून आले. त्यानंतर रानडे यांनी एक सोन्याचा साप गणपती मंदिरातील गर्भागृहात प्रस्थापित केला, त्यानंतर साप दिसायचे बंद झाले.

१९७५ पासून येथील ग्रामस्थांनी भजनाचा कार्यक्रम चालू केला. शनिवारी वाड्यावरील प्रत्येक कुटुंबाकडून विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. श्रावण महिन्यातही अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. गणेश जयंतीचा विशेष सोहळा असतो. होलीकोत्सवही साजरा करण्यात येतो.

प्रियोळच्या वेताळेश्‍वर देवस्थानच्या पंचायतनामध्ये या देवस्थानाचाही समावेश आहे. दसरोत्सवात वेताळाचा संचार येणारा देव या मंदिरालाही भेट देतो. तेथील पुजारी रानडे आहेत. तेथे वेताळाचे पारंपरिक श्रध्देने स्वागत करण्यात येते. मोठ्या प्रमाणात भाविक यावेळी हजर असतात.

अशाच दुसर्‍या एका मंदिराची ओळखही मी करून देणार आहे. गोव्यातून बेळगांवमार्गे कर्नाटकात जाताना वाटेत चोर्लाघाट ओलांडल्यावर एका पवित्र स्थळी श्री रामेश्‍वराचे सुंदर असे मंदिर आहे. तेथील निसर्ग नयनमनोहर असून चहुबाजूस लहानमोठे डोंगर आहेत. तेथील सृष्टीसौंदर्य विलोभनिय आहे. उंचावरून झेपावणारे पाण्याचे प्रवाह, तसेच सखल भागातून वाहणारे पाणी, म्हणजे नद्या, ओढे, नाले, वहाळ आदी दिसून येतात. हिरवी गर्द शेती, झाडे, कुळागरे, माड, पोफळीच्या बागायती सारे दृष्यच मनोहारी आहे. हा भाग पूर्ण ग्राम्य संस्कृतीचा, आणि केवळ तीनशेचारशे वस्तीचाच आहे.

येथील श्री रामेश्‍वर मंदिर नऊशे वर्षांपूर्वीचे असावे असे तेथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराचे बांधकाम चांगले दिसून येते. येथे नित्य धार्मिक विधीही होत असतात. तसेच येथे विविध वार्षिक उत्सवही साजरे होतात. या देवस्थानात वर्षभरात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रामनवमी, महाशिवरात्री, वार्षिक जत्रौत्सव, शिमगोत्सव, श्रावणी सोमवार या शिवाय नैमित्तिक नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या थाटात आणि भक्तीभावाने व श्रद्धेने साजरे होतात. येथे डोंगर पायथ्याशी दूर दूर अंतरावर ३०० ते ४०० लहान घरे आहेत. तेथे झावळ्यांची तर काही घरे कौलारूही आहेत. त्या लोकांची फारशी प्रगती झालेली नाही. येथे वीज,पाणी, शिक्षण, आरोग्य या मुलभूत सुविधाही अद्याप व्यवस्थितपणे उपलब्ध नाहीत. शिक्षणासाठी तर, मुलांना दूरच्या गावापर्यंत पायपिट करावी लागते. वाहतूक व्यवस्थाही धड नाही. अनेक प्रकारच्या गैरसोयींना या भागातील लोक तोंड देत आहेत. सरकारने या लोकांना योग्य त्या मुलभूत सेवासुविधा उपलब्ध करून दिल्यासच हे लोक प्रवाहात सामील होऊ शकतील आणि सरकारला दुवा देतील.