Home बातम्या गोव्याच्या मातीत गझलेची पदचिन्हे…

गोव्याच्या मातीत गझलेची पदचिन्हे…

0

राजय पवार

गझल आणि कोंकणी यांचा संबंध तसा खूप जुना नाही. तरीही कोंकणी भाषेच्या नवायतीबोलीत या काव्यप्रकाराच्या पहिल्यावहिल्या पावलाचा ठसा नजरेस पडतो. या बोलीतील जिव्रा बजाय’ (१८३५) (म्हणजे प्रवचनांची वही) या भक्तिकाव्य संग्रहात ही कोंकणी आणि पर्शियन शब्दांनी नटलेली गझल वाचायला मिळते. या रचनेस कोंकणीच्या बोलीतील पहिली गझल म्हणता येईल. सदर गझलेत एक बाब लक्षात घेण्याजोगी वाटते, ती म्हणजे, या गझलेतील प्रत्येक मिसर्‍यात गझलकाराने अर्धा मिसरा कोंकणी आणि अर्धा पर्शियन भाषेतून लिहिला आहे. जाणीवपूर्वक केलेला हा प्रयोग लक्षात घेण्याजोगा आहे.

अज शौक तू ऐ शह परी व्हावता रखत गालावरी

ऐ लब चूं शहदो शक्करी जलतां सदां उजा परी

गो चंद गिर्यम हम चुनीं रडटा डोळे चारों कोनी

हर्गीज न दीदम एं चुनी व्हावता डोले मळबा परी

(मोहलीस जाफर अली, भटकळ, कर्नाटक)

१८३५ मधील अशा प्रकारची ही प्रायोगिक गझलरचना कोंकणी गझलरचनेच्या इतिहासाच्या नजरेतून उल्लेखनीय ठरते. कोंकणीची नवायती बोली बोलणार्‍या मुसलमान समाजाचे गझल, शेरोशायरी, मुशायरा इत्यादींशी आधीपासूनच नाते असल्याकारणाने गझलेचा आकृतिबंध त्यांना परका नव्हता. परंतु गोव्यातील कोंकणी भाषेला पोर्तुगीजकालीन अत्याचारांना सामोरे जाताना कित्येक संकटांना तोंड द्यावे लागले. १६८४ साली कोंकणी भाशेच्या मर्णाचे फर्माणनिघाल्यानंतर येथे भाषेच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उभा राहिला. मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतरच्या काळात कोंकणीमराठी भाषावादाला राजकीय वळण लागल्यामुळे लेखकांची अर्धीअधिक शक्ती त्याच कारणी खर्ची पडली. अशा वातावरणात गझलेसारख्या काव्यप्रकाराचा अभ्यास करण्याचा विचारही अंकुरला नव्हता.

कोंकणी गझलेचे वर्तमान

स्वातंत्र्योत्तर गोव्यातील कवितेचा इतिहास पाहताना काही कवींनी एकदोन गझलसदृश्य रचना लिहिल्याचा संदर्भ सापडतो. आधुनिक कोंकणी काव्यातील गझल म्हणून काही रचना येथे उदाहरणादाखल पाहू. कोंकणीतील बाकीबाब बोरकर यांनी कोंकणी कवितेत पोवाडा, भजन इत्यादी प्रकार प्रायोगिक तत्त्वावर रचले होते. परंतु गझलेसारख्या प्रकाराकडे त्यांचेही दुर्लक्ष झालेले आढळते. मराठीत त्यांनी गझल लिहिली. बोरकर किंवा चा. फ्रा. डिकॉस्ता यांनी प्रयत्न केल्यास कोंकणीत त्यांना हा प्रकार चांगल्यापैकी जमला असता.

कोंकणी गझल ही मराठीतल्या माधव ज्युलियनांसारखी आहे. माधव ज्युलियन यांनी मराठीत तंत्रशुद्धता बाजूला ठेवून गझलरचना केल्या. अशाच प्रकारे काही रचनाकार कोंकणी गझला लिहिताना आढळतात. मात्र सुरेश भटांनी ज्याप्रमाणे तंत्रशुद्धतेवर भर देऊन गझला लिहिल्या, तसा प्रयत्न कोंकणीत आताआताच होताना दिसत आहे. यात प्रामुख्याने राजय पवार, प्रकाश देसाई, राधा भावे यांचा समावेश आहे. आतापर्यंतची जी गझलरचना कोंकणीमधून होत आली आहे, ती ज्युलियनांच्या गझलेसारखीच आहे.

प्रेमभावना व्यक्त करणारी, आशय भावकवितेप्रमाणे अथवा भावगीताप्रमाणे मांडणारी, थोडीशी वर्णनात्मक स्वरूपाची, एकयमकीपणा कधी पाळणारी कधी न पाळणारी, काफियारदीफ वापरण्यात तंत्रशुद्धता न बाळगणारी अशीच आहे.

आधुनिक काळातील कोंकणी गझलांच्या या इतिहासावर नजर मारताना एवढं नक्कीच जाणवतं की बहुतेकांचा फक्त दोन ओळींच्या शेरांची मांडणी म्हणजेच गझल असाच समज झालेला आहे. परंतु हेही नसे थोडकेया उक्तीप्रमाणे कोंकणी गझलेचा इतिहास जाणून घेताना किंवा वर्तमानाची अवस्था स्पष्ट करताना कोंकणीतील या रचनांचाही उल्लेख तेवढाच महत्त्वाचा समजावा.

गोवा मुक्तीनंतरच्या काळात कोंकणी गझल लिहिणार्‍यांमध्ये शैलेंद्र मेहता (आंकुर), प्रभाकर नाडकर्णी (गजलप्रभा, शिशिरांतलीं शेंवते फुलां), विष्णू वाघ, राजय पवार (पावसफुलां), नागेश करमली, प्रकाश देसाई, पुंडलिक नाईक, पूर्णानंद च्यारी, माधव बोरकर, मॅल्वीन रॉड्रिगीज, प्रकाश पाडगावकर, राधा भावे, शीतल भांडारे, अजय नाईक इत्यादींचा समावेश आढळतो. पैकी काहीजणांच्या रचनांमधून मोठ्या प्रमाणात तांत्रिक चुका आढळतात. प्रामुख्याने काफियारदीफ यांचे उपयोजन करताना झालेला घोळ आणि भावकविता अथवा भावगीताप्रमाणे केलेली वर्णनात्मक आशयरचना हे कोंकणी गझलेचे महत्त्वाचे दोष म्हणावे लागतील. भविष्यात होणार्‍या कार्यशाळांमधून त्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ते कोंकणी गझलांच्या आणि पर्यायाने भाषेच्या हिताचे ठरेल.

गझलीमधून व्यक्त होणार्‍या विषयांत मदिरा, दारू यांचा उल्लेख खूप आधीपासून पाहायला मिळतो. गोवा हे मद्यनिर्मितीचे केंद्र असूनही कोंकणी गझलेत मात्र आतापर्यंत चारपाच गझलांमधूनच असा उल्लेख आढळतो.

पुंडलिक नाईक आणि राजय पवार यांच्या रचनांतून हा उल्लेख सापडतो.

लकता खांबो जाल्यार सांग म्हाका

कितलो पिला तें विचारूं नाका

बळयां वाजयलें दार तिगेलें

कितलो बडयलो विचारूं नाका

(पुंडलिक नाईक)

हांव पिलां इल्लोसो जीव जाला भिल्लोसो

तुमचे लगाडेन ओडून आयलों गादयेर जल्लोसो

(पुंडलिक नाईक)

पिया रे पिया तुमी जिया भरून

नी जाम म्हजोय बी दिया भरून

रावंक उबो सोरो धिटाय दिता

जिणेंत जर तूं पडलो निसरून

पितां पितां एक जाण्टो म्हातारो

पिराय आपली गेलो विसरून

(राजय पवार)

आशयाच्या चौकटीतून कोंकणी गझलेकडे पाहिल्यास ती प्रामुख्याने प्रेमभावना आणि सामाजिक अवस्था या दोन विषयांना प्राधान्य देते, असे म्हणता येईल.

विष्णू वाघ, माधव बोरकर, नागेश करमली यांच्या गझलांमधून जास्त प्रमाणात प्रेमभावना तर पुंडलिक नाईक, राजय पवार, प्रकाश देसाई, पूर्णानंद च्यारी यांच्या गझलांमधून सामाजिक अवस्था व्यक्त होताना जाणवते.

हाय ते म्हगेले सुख पोखरून गेले

दोळ्यांतुल्या दुकांचें आचमन करून गेले

(पूर्णानंद च्यारी)

केन्ना अशें केन्ना तशें

तुजें हाशें लायता पिशें

पावस झडटा पातकड्यांनी

भिजून ओलें जालें उशें

(विष्णू वाघ)

जायते जाण अशें म्हज्या घरा येवन गेले

सोंपलें घरांतलें तेन्ना घरूच घेवन गेले

ताटभर वाडलें तांकां पोटभर जेवले ते

तरीय वतना वाडटल्यांचे हात ल्हेंवन गेले

(राजय पवार)

गोव्यातील गझलविश्‍वात कोंकणी किंवा मराठी गझलांचे मुशायरे होण्याची उदाहरणे नाहीत. या संमेलनाच्या निमित्ताने होणार्‍या मुशायर्‍यांची यापुढे गोव्यातील गझलेचा इतिहास लिहिताना नोंद घेतली जाणार आहे. परंतु कोंकणीच्या नवायती या दुर्लक्षित बोलीत मात्र आजही मुशायर्‍यांचे आयोजन केले जाते, ही बाब दुर्लक्षित राहिली नसती तर कोंकणी गझलनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिशील होऊ शकली असती.

गझलेची तंत्रशुद्धता स्पष्ट करणारी पुस्तके, आकृतिबंध आणि इतर बाबींची तांत्रिक माहिती देणारी पुस्तके अजून कोंकणीतून उपलब्ध नाहीत. तरीसुद्धा मराठीहिंदी भाषांमधून उपलब्ध असलेल्या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळविता येईल. मात्र तशी आंतरिक इच्छा असणे आधी गरजेचे आहे. कोंकणी भाषेतील लेखकवाचकांमध्ये गझलेविषयी साहित्यिक रुची निर्माण होणे आवश्यक आहे. गायक व संगीतकारांनी गझलेप्रति थोडी जास्त निष्ठा दाखविल्यास कोंकणी गझलेसाठीचे पोषक आणि आशादायी वातावरण निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.