Home बातम्या गोव्याचे वैभव कॉंग्रेसच टिकवेल : विलासराव

गोव्याचे वैभव कॉंग्रेसच टिकवेल : विलासराव

0

देशभरात भाजपाने अनेक घोटाळे केले. सत्तेसाठी धर्माचा व जातीचा आधार घेऊन फूट पाडली व जनमानसात विद्वेश निर्माण केला. काही काळ त्यांना सत्ता मिळाली असली तरी अशी सत्ता टिकत नाही हे जनतेने दाखवून दिले. आज कॉंग्रेसने जगात भारताला मानाचे स्थान दिलेले असून गोव्यात कामतानी स्थिर सरकार देताना चौफेर विकास साधला. पुन्हा एकदा गोव्याला नवी दिशा नवी भरारी देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व डिचोलीतून राजेश पाटणेकर यांना बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले.

गोव्यासारख्या छोट्या राज्यात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळणे तसे सोपे नाही त्यामुळे दिगंबर कामत यांनी उत्तम प्रशासन देताना सर्वांगीण विकास साधला असे ते यावेळी म्हणाले.

प्रतापसिंह राणे म्हणाले, राजेश पाटणेकर ही व्यक्ती अतिशय लोकप्रिय असून त्यांचा विजय निश्‍चित आहे. भाजपात असताना त्यांची सतत घुसमट व्हायची याचे कारण पर्रीकरांनी कधीच या आमदारांना विश्‍वासात घेतले नाही. विधानसभेतही कधी बोलायची संधी दिली नाही.

कॉंग्रेसचे निरीक्षक रेड्डी यांनी भाजपावर टिकेची झोड उडवताना भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपाने खोटा प्रचार व अफवा पसरवण्याचे काम आरंभले आहे. मात्र जनता त्यांना ओळखून असून कॉंग्रेसचा विजय ठरलेला असल्याचे सांगितले.

पाटणेकरांची भाजपावर टीका

दहा वर्षात भाजपात बरीच घुसपट झाल्याचा उल्लेख करताना भाजपाचे नेते प्रत्येक विधानसभा अधिवेशनात आरोप करत प्रश्‍न उपस्थित करायचे मात्र एकाही नेत्याच्या आरोपाची सिद्धता करण्यात आली नाही. अफवा पसरवणे व हवे तसे हवे तेव्हा फिक्सिंग करणे हीच त्यांची नीती असल्याचे पाटणेकर म्हणाले. मला कॉंग्रेसमध्ये जनतेचा पूर्ण पाठिंबा असून मी चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. काही योजना पूर्ण व्हायच्या आहेत परंतु मला प्रत्येक घरातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांचे भवितव्य जनतेच्या हाती

फॅमिली राजवर प्रतिक्रिया

प्रचारासाठी गोव्यात येणार्‍या बाहेरील कॉंग्रेस नेत्यांना फॅमिली राजया विषयावर विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देणे कठीण झाले असून त्यामुळे काही स्थानिक नेते अडचणीत आले आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांना काल पत्रकारांनी या मुद्यावर भंडावून सोडले. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना निवडून आणणे किंवा पराभूत करणे हे मतदारांच्याच हातात आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

पक्षाने उमेदवारी दिली असली तरी त्या उमेदवारांचे भवितव्य जनतेवरच अवलंबून असून पक्षाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे देशमुख यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देणे हा विषय कॉंग्रेसपुरता मर्यादित नसून अन्य पक्षही कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देत आहेत. प्राप्त परिस्थितीनुसार पक्षाला धोरण बदलावे लागते, असे सांगून कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देताना जिंकून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष असतो, असे त्यांनी सांगितले. समाजात फूट पाडणे हे कॉंग्रेसचे धोरण नसून सर्वांना घेऊन पुढे जाणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे ते म्हणाले. गोव्यात निवडणुकीत कॉंग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.