‘गोवा माईल्स’कडून साडेतीन कोटींचा महसूल

0
57

‘गोवा माईल्स’ या राज्यातील ऍपआधारित टॅक्सी सेवेमुळे राज्य सरकारला दोन वर्षांच्या काळात तब्बल ३ कोटी ३४ लाख एवढा महसूल जीएसटीच्या रुपात मिळाल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत दिली. गोवा माईल्सच्या १५०० टॅक्सींकडून सरकारला मिळणारा हा कोट्यवधी रुपयांचा महसूल लक्षात घेतल्यास सरकारचा किती कोटींचा महसूल बुडवला जात आहे, ते लक्षात येेते, असे गोव्यातील टॅक्सीचालकांचा उल्लेख न करता खंवटे म्हणाले. यावेळी विरोधकांनी गोवा माईल्स कंपनीने सरकारच्या महसूल वाटणीतील ५ टक्के एवढी रक्कम सरकारला दिली नसल्याचा आरोप केला व सरकारनेच त्यांना ती सूट दिल्याचा दावा केला. फेब्रुवारी २०२१ नंतर हे घडले असल्याचे विरोधकांनी नजरेस आणून दिले. त्यावर उत्तर देताना हे पैसे फेडण्यासाठी कंपनीला नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती खंवटे यांनी दिली. गोवा माईल्स यांच्याकडून जो ५ टक्के एवढा महसूल प्राप्त झालेला आहे, तो टॅक्सीचालकांच्या कल्याणावर खर्च करण्यास सरकार तयार असल्याचे खंवटे यांनी यावेळी सांगितले.