अशी शस्त्रक्रिया करणारे पहिले सरकारी इस्पितळ
* रुग्ण २४ तासात चालू शकतो
* शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी होते.
* तंतूंची हानी नाही
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात काल संगणकाच्या मदतीने एका ७५ वर्षे वयाच्या महिलेवर गुडघारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. राजन कुंकळकर व डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
या आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रिया केल्यानंतर २४ तासात रुग्ण चालू शकतो. यामुळे तंतुंचीही विशेष हानी होत नाही, रक्तस्त्रावही कमी होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी होते, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
संगणकाच्या मदतीने यशस्वी शस्त्रक्रिया करणारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे भारतातील पहिले सरकारी इस्पितळ असून या इस्पितळात अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. वरील शस्त्रक्रिया सद्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असून भविष्यकाळात वरील अद्ययावत संगणक खरेदी करणार असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. आतापर्यंत आपण हजारावर गुडघारोपण शस्त्रक्रिया केल्या असून दर दिवशी किमान दोन ते तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बांदेकर हे गोमेकॉच्या अस्थिरोग उपचार विभागाचे प्रमुख असून त्यांनी या विभागात महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांचेच प्रमाण अधिक असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.