गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टीस करू नये अशी सूचना करणारे एक परिपत्रक गोमेकॉचे डीन व्ही. एन. जिंदाल यांनी काढले आहे. गोमेकॉतील बरेच डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक काढण्यात आले असल्याचे समजते.
गोमेकॉतील बरेच वरिष्ठ डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करीत असल्याने ते गोमेकॉतील रुग्णांना हवे तेव्हा मिळत नसतात. परिणामी या रुग्णांना तपासणीसाठी कमी अनुभव असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांकडे जावे लागते, असे गोमेकॉतील सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जिंदाल यांनी काढलेल्या वरील परिपत्रकामुळे गोमेकॉतील डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.