– विष्णू सूर्या वाघ
गोमंतकातील उत्सवी रंगभूमी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे अनेक स्वयंसिद्ध पैलू आहेत. या रंगभूमीची आपली अशी बलस्थाने आहेत तशाच काही उणिवाही आहेत. नव्या तंत्राच्या, नव्या अभिरूचीच्या जमान्यात ही रंगभूमी दुबळी झाल्यासारखी वाटतेय खरी, पण काळाचेही बदल पचवून आपलं मूळ स्वरूप राखण्याचं सामर्थ्य तिच्यात नक्कीच आहे.
गोमंतकीय उत्सवी रंगभूमीवर एक आरोप आपल्याच काही माणसांकडून (विशेषतः कोंकणीवादी म्हणवणार्यांकडून) वारंवार केला जातो. त्यांच्या मते ‘मराठी नाटक हे काही गोव्याचं नाटक नव्हे. मराठी नाटक गोव्याने महाराष्ट्राकडून उसनं घेतलं. महाराष्ट्रात जे पिकलं ते आमच्या पूर्वजांनी इथं आणून शिजवलं! मराठी नाटकांची परंपरा इथली नाही. तिची मुळं या मातीत रुजलेली नाहीत. हे कलम शेजारच्या प्रांतातलं… आमच्याकडे स्वतःची रोपं नाहीत म्हणून ते इथं आणून लावलं!….’’ असे अनेक आरोप गोमंतकीय रंगभूमीवर सतत केले जातात- केवळ त्यांचा पूर्वग्रह बळकट करण्याच्या उद्देशानं- की मराठी नाटकांची परंपरा ही या मातीत रुजलेली नाही!
ऐतिहासिक संंदर्भ असलेलं कुठलंही विधान वास्तवाच्या कसोटीवर घासून पाहावं लागतं. मी व्यक्तिशः एखाद्या माणसाचा दुस्वास करतो म्हणून तो माणूस थोडाच वाईट असेल? माझ्या पाहण्यातच काही खोटं असण्याची शक्यता आहे. मराठी रंगभूमीच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडलाय.
फार पाल्हाळ न लावता सुरुवातीलाच सांगून टाकतो. गोव्याची उत्सवी रंगभूमी (अर्थात मराठी रंगभूमी, कारण ‘कोकणी माची’चा इतिहास अगदी अलीकडचा.) महाराष्ट्राकडून उसनवार घेतलेली नाही. ती स्वयंभू आहे. सहजस्फूर्त आहे. वेलीवर फूल फुलावं तितक्याच सहजतेनं इथल्या कलावल्लरीवर मराठी नाट्यपुष्प विकसित झालं, हे सिद्ध करणारे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत.
गोमंतक आणि नाट्याचा संबंध स्वर आणि लय यांच्यातल्या अंगभूत संबंधासारखा आहे. इतरत्र नाटकाकडे ‘करमणुकीचे साधन’ म्हणून पाहिले गेले. गोमंतकात मात्र नाटक हा धार्मिक आन्हिकाचा एक भाग बनल्याचे दिसते. देवस्थानांच्या धार्मिक कार्याशी नाटकांचा संबंध जोडला गेल्यामुळे नाटकाला इथे नेहमीच ‘एक अनिवार्य धर्मकृत्य’ म्हणून मान दिला गेला. त्यामुळेच पुरातन कालापासून गोमंतकात जागर, त्राटिका, वीरभद्र, पुतना, रणमाले, विविध प्रकारचे काले इत्यादी नाट्यप्रकार मोठ्या श्रद्धेने देवस्थानांच्या प्रांगणात होत आले आहेत.
गोमंतकात नाट्यकला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात होती याचे काही महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. डॉ. पांडुरंग पिसुर्लीकर यांनी संपादित केलेल्या ॠेर झीश-र्झेीींीर्सीशीर रींीर्रींशीर वेी एीलीळींेीशी र्ङीीळींरपेी वेी ीशर्लीश्रेी दतख श दतखख या पुस्तकात पान ४४ वर गोमंतकीय नाटकाबद्दलचे दोन उल्लेख आढळतात.
१. गोमंतकातल्या एम. एस. दप्तर खात्यातील १५६७ च्या ‘फोराल’मध्ये ‘जागोर’ या नावाच्या हिंदूंच्या नाटकाचा उल्लेख सापडतो. (ज ऋेीशश्र वश डरश्रलशींींश वश १५६७ च.ड. वे र्ईिीर्ंळींे वश ॠेर षरू ीशषशीशपींळर रे ींशरींीे हळपवे लहरारवे यनरसेी’ र्िींश र्लेीींीार्रींरा ीशरश्रळूरी शा ॠेर शा लशीींरी षशीींर्ळींळवरवशी ीशश्रळसळेीरी.)
२. दुसरा उल्लेख कृष्णदास शामा या कवीने १५२६ सालच्या आपल्या ग्रंथात केलेल्या लेखनाबद्दल आहे ः
कृष्णदास शामा नावाचा कवी हा १५२८ साली नटांबद्दल (नटधर) लिहितो. (ज झेशींर ॠेशी उीळीपरवरी दरार- १९२६- ऋरश्रर वश रलींेीशी (छरींींरवहरीर)).
मूळ ग्रंथातील ओवी अशी आहे-
जैसा का नटधर| तैसे रंगामाजी दोघे वीर|
वस्त्रे भूषणे अलंकार| सोबते झाले॥
(रंग म्हणजे सभागृह, सभामंडप किंवा नृत्यस्थान. याचा अर्थ गोमंतकात नाट्यकला १५२६ पूर्वी प्रचलित असली पाहिजे.)
असाच आणखी एक उल्लेख पाद्री दियोगु बर्व्हित यांनी लिहिलेल्या डायरीत आहे. त्यात एका पडद्याची व अन्य नाटक सामानाची माहिती दिली आहे.
जागर (पेरणी जागर, गावडा जागर व ख्रिश्चन जागर), बाळ क्रीडाकाला, गौळणकाला याप्रमाणंच वीरभद्र, पुतनाख्यान, त्राटिकावध इत्यादी नाट्यप्रकारही काही देवस्थानांत नित्यनेमाने होत. आज यातील बहुतेक प्रकार अस्तंगत झालेले आहेत. पेरणी जागर हा पूर्वी वाघुर्मेकर व मळकर्णेकर या दोनच घराण्यांकडून होत असे. आता तो लुप्तच झाला आहे. गौळणकाला म्हणजे आधुनिक नाटकाची पूर्वावृत्ती. त्यात अभंग, भक्तिगीते, श्लोक, आर्या, व्रजगीतेेेेे, मध्यंतरात ख्याल व धृपद, मग द्वंद्वगीत, भावगीत, नाट्यगीत, नृत्य, कृष्ण व सवंग ज्यांचे तोतरे गीत वगैरे प्रकार होत. १९०५ साली विश्वनाथ पांडुरंग हेदे यांनी गौळणकाल्याचे छापील पुस्तक काढल्याची नोंद आहे. त्याहीपूर्वी बा. ज. नाटेकर यांनी १८९० साली ‘श्रीकृष्ण लीलामृत’ ही गौळणकाल्याची पुस्तिका प्रकाशित केली होती. म्हापशातील दीड शतकापूर्वीचे प्रसिद्ध हरिदास चन्नाप्पा यांनीही बरीच आख्याने लिहिल्याचे संदर्भ सापडतात.
काल्याचा दुसरा प्रकार म्हणजे दशावतारी. हा प्रकार कोकण सीमेवरील मोचेमाडकर, आजगावकर, वालावलकर या मंडळींनी आणून गोव्यात सोडला. दशावतारी नाट्यप्रकाराची रुजवण गोव्यात सगळीकडे झालेली दिसत नाही, पण सत्तरी व डिचोली या दोन तालुक्यांत दशावतारी नाटकांचे खेळ मोठ्या प्रमाणात होत असत.
मराठी नाट्यसृष्टीत ५ नोव्हेंबर हा दिवस ‘रंगभूमीदिन’ म्हणून साजरा होतो. १८४३ साली याच दिवशी सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग करून विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असा महाराष्ट्रातील नाट्यसंशोधकांचा दावा आहे आणि बहुसंख्य जनतेनं तो मान्यही केला आहे. पण हा दावा वस्तुस्थितीला धरून नाही. विष्णुदास भावे यांच्या नाटकातील संवाद लिखित स्वरूपात नव्हते. बुकीश नाटकं त्यानंतर आली. पण भावे यांचं ‘सीतास्वयंवर’ रंगभूमीवर येण्याआधी लिखित स्वरूपातील मराठी नाटकांचे प्रयोग गोव्यात होत होते. तेही तब्बल पाऊणशे वर्षांपूर्वी! १७७८ साली धारगळी येथील श्रीशांतादुर्गा देवस्थानात शिमगोत्सवाच्या काळात नाटकांचे प्रयोग होत असत. धारगळच्या शांतादुर्गा मंदिरात १८१८ साली रघुनाथ शेट सावंत व व्यंकटेश रघुनाथ सावंत या पिता-पुत्रांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग झाला होता अशी नोंद या नाटकाच्या छापील प्रतीवर असल्याचा निर्वाळा एक गोमंतकीय नाट्यसंशोधक सीताराम गणपती मणेरीकर यांनी दिला होता. नाट्यसमीक्षक व संशोधक ज. वि. कामत यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. १८४० पासून होऊन गेलेल्या २९ नाट्यलेखकांची व त्यांनी निर्माण केलेल्या ८८ नाट्यकृतींची यादी त्यांनी १९५० साली मुंबईतील समाजसुधारक मासिकाच्या अंकात प्रसिद्ध केली होती. केपे तालुक्यातील पारोडा गावचे चंद्रेश्वर देवस्थानातील कीर्तनकार व तेथील पर्वतकर नाट्यमंडळात सूत्रधाराचे काम करणारे ह.भ.प. वामनबुवा गोसावी १८४१ सालात सूत्रधाराचे व हरदासाचे काम करीत होते व या साली त्यांनी एक पद्यमय नाटक लिहिले होते असा सरकारी दप्तरात दाखला आहे. कवळे येथील श्रीशांतादुर्गा देवस्थानात १८२५ सालच्या जत्रौत्सवात नाटके झाली होती व त्यातील पात्रांकरता फुलांचा खर्च अमुक झाला होता अशी हिशेबाच्या वहीत नोंद आहे. म्हापसा येथील प्रसिद्ध व जुने व्यापारी खलप यांच्या घराण्यातील मोडी लिपीत व मराठी भाषेत लिहिलेल्या कीर्दवहीत १७७८ सालच्या धारगळच्या देवस्थानातील शिमगोत्सवाकरता दिलेल्या वर्गणीची नोंद आहे.
धारगळ येथे १८१८ साली सावंत पिता-पुत्रांनी जे नाटक केलं त्यातील संवाद व पदं लिखित स्वरूपात होती. आधुनिक नाटकाप्रमाणेच या नाटकालाही बांधिव रूप होतं. हरदास- विदूषक, संकासुर- विदूषक व कंस-चाणूर अशी तीन प्रकरणं या नाटकात होती. भाव्यांचं ‘सीतास्वयंवर’ नाटक जन्मालाही आलं नव्हतं त्याकाळी हे नाटक धारगळला झालं आणि १७७१ साली जन्मलेल्या रघुनाथ शेट सावंतनी आपल्या चिरंजीवासमवेत (व्यंकटेश शेट सावंत) ते रंगभूमीवर आणलं हा इतिहास किती जणांना माहीत आहे?
ज्या धारगळच्या श्री शांतादुर्गा देवस्थानाशी या नाट्यकृतीचा संबंध आहे त्या मंदिराचा इतिहासही खूप प्राचीन आहे. धारगळची देवी मूळची म्हापशाची. या देवीचं मूळ स्थान म्हापशात ‘धा जाणांची चौकी’ या नावानं प्रसिद्ध होतं. तिसर्या किंवा चवथ्या शतकापासून ही चौकी अस्तित्वात होती. या चौकीवर भारुड, लळीत, आख्यानं होत असत. पोर्तुगिजांनी गोवा प्रांत जिंकल्यावर जो धार्मिक उच्छाद चालू केला त्यापासून रक्षण करण्यासाठी शांतादुर्गेची मूर्ती प्रथम साखळीला नेण्यात आली. ही घटना साधारण १५५४ मधली. नंतर वीसेक वर्षांनी म्हणजे १५७४ साली हे देवस्थान धारगळला हलवण्यात आलं. म्हणजे या देवस्थानशी निगडीत असलेला वार्षिक उत्सवही फार पुरातन आहे हे स्पष्ट होतं. या उत्सवात होणार्या नाटकांचं स्वरूप काळाप्रमाणे बदलत गेलं असावं.
गोमंतकीय म्हणजेच मराठी रंगभूमीच्या प्राचीनत्वाचा आणखी एक दाखला मणेरीकरांनी दिला होता. मडगाव शहरात १८३१ साली श्री रामनाथ दामोदर प्रासादिक नाट्यमंडळ या संस्थेची स्थापना झाल्याची नोंद त्या संस्थेच्या दप्तरात मणेरीकर यांना सापडली. एकूण १४ जणांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केलं होतं. १८३१ पासून म्हणजे भावेप्रणित नाट्यप्रयोगाच्या किमान १२ वर्षं आधीपासून रामनवमीच्या उत्सवात या संस्थेतर्फे नाट्यप्रयोग होत असल्याची नोंद दप्तरात सापडते. याखेरीज १८१८ साली जन्माला आलेल्या एका मराठी नाटकाचं हस्तलिखितही सापडल्याची नोंद मणेरीकर यांनी केली होती. ‘सुदर्शन शशिकला स्वयंवर’ हे त्या नाटकाचं नाव!
म्हापसा आणि मडगाव या दोन शहरांतील भावेपूर्वकालीन मराठी नाट्यकृतींचा उल्लेखमला फार महत्त्वाचा वाटतो. कारण ही दोन्ही शहरं जुन्या काबिजादीमधील आहेत. पोर्तुगिजांच्या सत्तेचा फास सर्वप्रथम तिसवाडी, नंतर साष्टी व बार्देश महालांभोवती पडला. त्याही परिस्थितीत धर्मच्छलाचा मुकाबला करीत गोमंतकीयांनी आपली कला, संस्कृती व परंपरा यांची जपणूक केली. साडेचारशे वर्षे परकीय सत्तेच्या हातात राहिलेला प्रदेश भारतात अन्यत्र कुठेच नाही. या प्रतिकूल परिस्थितीत केलेला संस्कृतीचा सांभाळ म्हणजे एक प्रखर अग्निदिव्यच होतं असं म्हणावं लागेल.
आधुनिक मराठी रंगभूमीचं जनकत्व विष्णुदास भावे यांच्याकडे जाऊ शकत नाही हे स्पष्ट करणार्या घटनांचं अवलोकन आपण केलं. असाच वाद मराठी संगीत रंगभूमीच्या आरंभाबद्दलही चालू आहे.
मराठी संगीत रंगभूमीचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर हेच आहेत असं महाराष्ट्रातील नाट्यसंशोधक पुन्हा पुन्हा सांगत असतात. पण त्यांचा हा दावा विपर्यस्त आहे. संगीत रंगभूमीच्या गंगोत्रीचा उगम गोमंतकातून झाला. किर्लोस्करांनी ‘शाकुंतल’ लिहिण्याच्या कैक वर्षांआधी डोंगरी गावातले संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन ‘शुकरंभा संवाद’, ‘अहिल्योद्धार’, ‘नटसुभद्रा विलास’, ‘लोपामुद्रासंवाद’ यांसारखी संगीत नाटकं सादर केली होती. किर्लोस्करांच्या आयुष्याचा बहुतांश काळ बेळगाव परिसरात गेला असल्यामुळे गोव्याकडं त्यांचा वारंवार संबंध येत असे. क्रॉफर्ड नावाच्या इंग्लिश माणसाबरोबर मिठाचा व्यापार करायला ते पणजीला आले. त्यावेळी डोंगरी गावात ‘संगीत नाटक’ या नावाचा खेळ चालतो ही गोष्ट त्यांच्या कानावर आली. कुतुहलानं ते पाहायला गेले. दशावतारी नाट्यपरंपरेपेक्षा समृद्ध, सलग कथानकाचं, ठाशीव संवादांचं ते नाटक किर्लोस्करांना खूप आवडलं. तुम्ही सांगली-पुण्याकडे येऊन या नाटकांचे प्रयोग का करीत नाही? असा प्रश्नही त्यांनी बांदकर महाराजांना केला. त्यावर बांदकर हसून म्हणाले, ‘‘हा सारा खटाटोप मी प्रभू रामाची सेवा म्हणून करतो आहे. मला यातून पैसा कमवायचा नाही. हवं तर तुम्हीच या धर्तीवर एखादं नाटक लिहा आणि व्यवसाय चालवा.’’ असं म्हणत श्रीरामाच्या मूर्तीवरील फुलं उचलून ती एका श्रीफळावर ठेवली आणि प्रसाद म्हणून किर्लोस्करांच्या ओंजळीत टाकली. हीच किर्लोस्करांची मूळ प्रेरणा. दुर्दैवाने किर्लोस्करांच्या चारित्र्यात कुठेही या घटनेचा उल्लेख नाही. ज. वि. कामत, कृष्ण जगन्नाथ थळी, गणेश शर्मा, शशिकांत नार्वेकर इत्यादी गोमंतकीय नाट्यसंशोधकांनी अनेक पुरावे देऊनही मराठी रंगभूमीचं जनकत्व बांदकर महाराजांना द्यायला हवं या सत्याकडे बहुतेक जणांनी कानाडोळाच केला आहे.
मग आता मला सांगा- विष्णुदास भावेंच्याही आधी गोव्यात असलेली नाट्यपरंपरा आणि डोंगरी गावात जन्माला आलेलं मराठी संगीत नाटक यातून आपण निष्कर्ष कोणता काढणार? गोमंतकाची मराठी नाट्यपरंपरा ही स्वयंभू आहे. ती उसनी घेतलेली नाही. गोमंतकानं कधीही महाराष्ट्राच्या ओंजळीतून मराठीचं पाणी प्यालेलं नाही. मूळचा उगमस्त्रोत इथूनच वाहतोय, हाच ना?
(क्रमशः)