Home बातम्या गोमंतकाची स्वयंभू नाट्यपरंपरा

गोमंतकाची स्वयंभू नाट्यपरंपरा

0

– विष्णू सूर्या वाघ

डोंगरीच्या कृष्णंभट्ट बांदकरांपासून प्रेरणा घेऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी १८८० साली ‘शाकुंतल’ नाटक सादर केले. त्याचे सक्रिय पडसाद लगेच गोमंतकात उमटले. गोव्यातील काही व्यापारी खरेदीसाठी मुंबई किंवा कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी जात असत. म्हापशातील काही व्यापार्‍यांनी संगीत नाटकांचे लोण गोव्यात आणले. १८८५ च्या आसपास म्हापसेकरांनी रामनवमीच्या वार्षिकोत्सवात ‘शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग केला. तो किर्लोस्करांच्या तोडीचा वठला अशी नोंद एका दफ्तरात आढळते. पोषाख आणि रंगसंगती याबाबतीत म्हणे तो किर्लोस्करांहून काकणभर अधिकच भरला. म्हापशातील या नाट्यवेड्या मंडळीनी पुढे किर्लोस्करांचे सगळे नाट्यप्रयोग तंतोतंत वठवून दाखवले. शिवराम आळवी, नारायण सावकार, गोविंद फळारी, भगवंत मुंज, अर्जुन कर्पे, गंगाधर मुंज, सुब्राय डांगी, अनंत सावकार, उत्तम वागळे, राजाराम नाईक असे एकाहून एक सरस नट त्याकाळी गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही गाजले.

म्हापसेकरांचे प्रयोग पाहून मग इतर गावच्या लोकांनी स्फूर्ती घेतली व सालोसाल होणार्‍या जत्रौत्सवांतून ते आपल्या मगदुराप्रमाणे नाटके करू लागले. ही प्रयोगप्रथा आजदेखील पाळली जाते.
दरम्यान, कळंगुट येथील गोविंद साळकर व राया साळकर यांनी एका संगीत नाटक कंपनीची स्थापना केली व गोव्याबाहेर जाऊन नाटकांचे खेळ केले. या कंपनीत काही काळ विख्यात नट दत्तोपंत हल्याळकर व बाळकोबा नाटेकर होते. गोमंतकातील हीच पहिली सुसंघटित नाटक मंडळी. पुढे मग कासारपालकर, पार्सेकर, म्हार्दोळकर, पर्वतकर, नावेलकर अशा अनेक कंपन्या निघाल्या, परंतु त्यांचे क्षेत्र गोव्यापुरते मर्यादित होते.
गोमंतकीय उत्सवी रंगभूमीवर १८१८ साली कार्यरत असलेल्या धारगळच्या श्रीशांतादुर्गा नाट्यसमाज आणि १८३१ साली मडगाव येथे स्थापन झालेल्या रामनाथ दामोदर प्रासादिक नाट्यमंडळीप्रमाणेच इतर अनेक संस्था नंतरच्या काळात उदयाला आल्या. बांदकरांनी स्थापन केलेली रघुनाथ प्रासादिक नाट्य मंडळी (१८७०), शांतादुर्गाप्रसाद कळंगुटकर गोवा संगीत नाटक कंपनी, गोवेकर स्त्री संगीत मंडळी, शारदा संगीत मंडळी, प्रभात संगीत मंडळी अशा अनेक संस्थांनी आकार घेतला. काही कंपन्यांनी गोव्याबाहेर जाऊन चांगला व्यवसाय केला. त्यात ललितप्रभा, प्रभात, नाट्यकलादर्श, प्रतिभा, नाट्यजीवन, जगदीश, नाट्यविकास आणि रंगबोछेच्छू इत्यादी नाट्यमंडळींचा समावेश होता. सखारामबापू बर्वे यांची ‘प्रतिभा नाटक मंडळी’ तर महाराष्ट्रीय लेखकांची नाटकं न करता खास नाटकं लिहून त्यांचे प्रयोग करू लागली. वळवईच्या ‘ललितप्रभे’नेही एक खंड गाजवला. पार्सेकर संगीत मंडळी, पार्सेकर महिला नाट्यमंडळी, घोडशीकर संगीत मंडळी, बाल नाट्य समाज, अप्सरा संगीत मंडळ, भावीण संगीत मंडळी अशा नाटक कंपन्यांचं पेवच गोव्यात फुटलं होतं. याचा पुढचा टप्पा म्हणून जिथं जिथं देवस्थान होतं तिथं त्या-त्या देवस्थानची स्वतंत्र संस्था स्थापन झाली. आज गोव्यातील प्रत्येक गावात कमीत कमी तीन ते चार नाट्यमंडळे आहेत. दुर्दैवाने पूर्वीचा जोम त्यांच्यात आज राहिलेला नाही. एकंदर ‘नाटक’ हा कलाप्रकारच जरा क्षीण झाल्यासारखा वाटतोय. संगीत नाटकांविषयी तर याहून दारूण परिस्थिती दिसतेय.
म्हापसा हे कलाप्रिय लोकांचे शहर. म्हापसेकरांचे नाट्यप्रेम कसे आहे याची पक्की माहिती महाराष्ट्रातील नाटक कंपन्यांनादेखील होती. एकदा गणपतराव काळसेकर यांची देशबंधू संगीत नाटक कंपनी सावंतवाडीत खेळ करायला आली. या कंपनीचे काही खेळ म्हापशात करता येतील का ते पाहावे हे बघायला तिथले एक नाट्यप्रेमी अनंत रघुनाथ टोपले सावंतवाडीला गेले. त्यावर खुद्द काळसेकर काय म्हणाले पहा- ‘‘माफ करा टोपलेसाहेब, पण म्हापशाला येण्यासारखा माझ्याकडे नटसंच नाही!’’
एकदा महाराष्ट्र नाटक मंडळीचा गोव्याला मुक्काम होता. त्याचवेळी म्हापशात हनुमान जयंती सुरू होती. उत्सवाप्रीत्यर्थ ‘बेबंदशाही’ या नाटकाचा प्रयोग म्हापसेकरांनी ठेवला होता. अर्जुन कर्पे (संभाजी), भगवंत मुंज (गणोजी), शंभू नाटेकर (शाहीर), रामचंद्र सिरसाट (खंडोजी) हे प्रमुख नट या नाटकात होते.
महाराष्ट्र नाटक मंडळीचे नट मुद्दाम म्हापसेकरांच्या त्या प्रयोगाला गेले. एक अंक झाल्यावर रंगपटात जाऊन त्यांनी सर्वांना शाबासकी दिली. वर विचारणाही केली, ‘‘तुम्ही किती दिवस नाटकाच्या तालमी घेता?’’ कलाकार म्हणाले, ‘‘फार तर दोन-तीन महिने.’’ त्यांनी पुन्हा प्रश्‍न केला, ‘‘दिग्दर्शक कोण?’’
म्हापसेकर म्हणाले, ‘‘कोणी नाही. आमचे आम्हीच!’’
या उत्तरानं त्यांना आश्‍चर्य वाटलं व इतक्या चांगल्या तर्‍हेनं नाटक सादर केल्याबद्दल त्यांनी सर्व कलाकारांचं कौतुक केलं.
म्हापसेकरांना नाटकाची आवड होती खरी, पण या आवडीचं रूपांतर कालांतरानं चुरस व चढाओढीत व्हायला लागलं. महारुद्र प्रासादिक संगीत नाटक मंडळी व श्रीशांतादुर्गा प्रासादिक संगीत नाटक मंडळी अशा म्हापसेकरांच्या दोन संस्था होत्या. या दोन्ही संस्थांमध्ये आपलंच नाटक चांगलं व्हावं अशी प्रचंड ईर्ष्या होती. दोन्ही संस्था परस्परांच्या चुरशीनं नाटक सादर करीत व ती पाहायला सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला या भागातले लोक धारगळ व म्हापशाला येत. त्यावेळच्या नटांत मधल्या वाड्यावरील शिवराम आळवी, अर्जुन कर्पे, मुंज बंधू, नारायण सावकार, अनंत सावकार, दत्ताराम सावकार, नाटेकरबंधू, रामचंद्र सिरसाट, काशिनाथ कवळेकर हे प्रमुख होते. पेठवाड्यात लक्ष्मण नाटेकर, रघुवीर मणेरकर, यशवंत धावजेकर, बाब्रीन कामत मळयेकर, सीताराम मणेरकर इत्यादी कलावंत प्रख्यात होते.
म्हापशातील सावकारांचे घराणे त्यांच्या नाट्यसेवेबद्दल प्रसिद्ध आहे. प्रारंभीच्या पर्वकाळापासून सावकार घराण्यात नाट्यकलेची पूजा चालू आहे. नारायण सावकारांपासून ही परंपरा चालू होते. त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघुवीर सावकार यांना तर ‘रंगदेवता’ हे अभिधान रसिकांनी बहाल केले. दत्ता सावकार हेदेखील उत्कृष्ट नट होते. अनंत सावकारांच्या लक्ष्मीधर व कांचनभट या भूमिका एकेकाळी गाजल्या होत्या. काशीनाथ कवळेकरांची ‘इंदिरा’ही सर्वतोमुखी झाली होती. नंतरची पिढी वसंत, गोपीनाथ, सांबप्रसाद व मनोहर यांची. या चौघांनीही दिग्गज कलाकार म्हणून ख्याती प्राप्त केली. गजानन भर्तू, श्रीरंग नार्वेकर, शंभू कोरगावकर या पुढच्या पिढीतील कलाकारांनी नाटकाचा वसा आणि वारसा पुढे चालवला.
मराठी रंगभूमीला गोमंतकाची देणगी
गोवा आणि महाराष्ट्र हे दोन प्रांत राजकीयदृष्ट्या आज अलग झालेले असले तरी मराठी रंगभूमीच्या रेशीमधाग्याने गोवा आणि महाराष्ट्राला पुरातन काळापासून एकत्र बांधून ठेवले आहे. संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात गोव्यानेच महाराष्ट्राला मा. दीनानाथ यांच्यासारखं संगीतरत्न बहाल केलं. सुरंगाबाई पर्वतकर, केशरबाई बांदोडकर, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, गिरिजाताई केळेकर यांसारख्या अभिनेत्री हीसुद्धा गोमंतकाची देणगी. नंतरच्या काळात सुधा करमरकर, ललिता केंकरे, सुहासिनी मुळगावकर, आशालता वाबगावकर, इंदुमती पैंगीणकर, माया गुर्जर, मनोरमा वागळे यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या वर्षा उसगावकर, कविता लाड, पल्लवी नेवरेकर या अभिनेत्रीही मूळ गोमंतकातल्याच. मराठी रंगभूमीवर खर्‍या अर्थानं ‘नटसम्राट’ म्हणून ज्यांना गौरवित करण्यात आले ते मा. दत्ताराम हे फोंडा तालुक्यातील वळवई गावचे. मा. गंगाराम, भिकू पै आंगले, मोहनदास सुखटणकर, महेश नमशीकर, गिरिराज, श्रीपादराव नेवरेकर, रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, रघुवीर नेवरेकर असे कितीतरी उत्तमोत्तम कलाकार गोव्याच्या भूमीतून निपजले व महाराष्ट्रात लोकमान्य झाले. रामदास कामत यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर मराठी मुलूख डोलावला. फार्सचे बादशहा बबन प्रभू व हिराकांत कलंगुटकर यांचंही गोव्याच्या मातीशीच नातं आहे. दिग्गज दिग्दर्शक दामू केंकरे, मो. ग. रांगणेकर हेसुद्धा मूळचे गोंयकार. नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांचं मूळ घर आजही पेडण्यातल्या पणशीवाड्यावर आहे. दसर्‍याच्या निमित्तानं सगळे पणशीकर वर्षातून एकदा भगवतीच्या पायापाशी येत असतात. प्रसिद्ध नेपथ्यकार बाबा पार्सेकर हेसुद्धा गोव्याला अजून विसरलेले नाहीत.
मराठी रंगभूमीच्या तिसर्‍या पर्वकाळात नाट्यसंगीताला पुनर्जन्म देणारे महान संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांना महाराष्ट्र व गोवा कसा विसरू शकणार? अभिषेकीबुवांची जडणघडण महाराष्ट्रात झाली, पण त्यांच्या स्वरांना लगडलेला म्हार्दोळ मंगेशीच्या जायांचा दरवळ अखेरपर्यंत कायम राहिला. नाटककार विजय तेंडुलकर मागे एकदा कला अकादमीत आले त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की त्यांचेही पूर्वज मूळ गोव्यातलेच होते. मंगेश हे म्हणे त्यांचे कुलदैवत. या अर्थाने तेंडुलकरही गोंयकारच ठरतात! नाटककार गोपाळकृष्ण भोबे, वसंत कामत हेसुद्धा गोमंतकीय. रंगभूमीच्या कक्षेपलीकडे जाऊन ज्यांनी आज नाट्यसंगीत लोकप्रिय केलंय ते प्रभाकर कारेकर व अजित कडकडे हे तर अस्सल गोवेकर! हल्लीच्या काळात संगीत रंगभूमीवर चमकणारे प्रल्हाद हडफडकर, महादेव पेडणेकर हे तरुण कलाकारही गोव्यातूनच मुंबईला येऊन स्थायिक झाले आहेत.
मराठी रंगभूमीला अभिनय आणि आवाज यांचा साज चढवून प्रेक्षणीय व स्वरणीय बनवणार्‍या गोमंतकीय कलाकारांची यादीच द्यायची म्हटली तर अख्खा दिवस पुरणार नाही. त्यामुळे हा नामोल्लेख मी इथेच आवरता घेतो.
मातीचा पाश न तोडणारे कलावंत
रंगभूमीच्या उदयकालापासून आजतागायत गोव्यातून महाराष्ट्रात जाऊन नाव गाजवणार्‍या काही कलाकारांचा उल्लेख मी आताच केला. पण असे अगणित कलाकार आहेत की अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही जे गोव्याच्या मातीतच आपलं नाटक करीत राहिले. या मातीचा पाश त्यांना सोडवला नाही. गोमंतकाचे बालगंधर्व म्हणून ज्यांची सर्वत्र वाखाणणी झाली ते काशिनाथ शिरोडकर हे एका वैभवशाली पर्वाचे साक्षीदार. तातोबा वेलिंगकर हे असेच एक अफलातून कलाकार. दशावतारी काल्यापासून आधुनिक नाटकापर्यंत सर्व प्रकारच्या मंचावर अगदी सहजगत्या वावरलेला. सुकडाराम आडपैकर यांनी तर आपल्या विनोदी भूमिकांनी अख्ख्या गोव्याला वेड लावले होते. तीच गोष्ट कृष्णा लक्ष्मण मोये यांची. त्यांचा तळीराम पाहायला पणजीच्या रथसप्तमी उत्सवासाठी संपूर्ण गोव्यातून प्रेक्षक यायचे असे माझे वडील मला सांगत. त्यांच्याविषयी मी मघाशी बोललोच आहे. पण सूर्या वाघ यांच्यासमवेत जे काही दिग्गज कलाकार मी रंगभूमीवर पाहिले त्यांचीही आज प्रकर्षाने आठवण येते आहे. आवाजाची खोली व नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने कुठलाही खलनायक उभा करताना प्रेक्षकांच्या अंगावर सर्रकन काटा उभा करणारे बाबनी गावकर, देवव्रत-ययातीसारख्या भूमिका गाजवणारे विश्‍वनाथ नाईक, संगीत नाटकात गायन व अभिनय दोन्हीत सारखेच निपूण असलेले तुळशीदास लोटलीकर, शांताराम नाईक, रोहिदास प्रभू, जुन्या जमान्यातले थोर नाटककार व नट सखाराम बर्वे आणि माझ्या वडिलांच्या पिढीतले रमेश बर्वे, वास्कोचे सखाराम केरकर (बकाल), म्हापशाचे गोपीनाथ सावकार, गोविंद हिरवे व शंभू धारगळकर, माशेलचे वसंत माशेलकर, नरेश आमोणकर, पांडुरंग गावकर हीसुद्धा जुन्या जमान्यातली बुजुर्ग मंडळी. रायबंदरचे खड्या आवाजाची देणगी लाभलेले डॉ. सावळो केणी (माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे सासरे), वामन कळंगुटकर, रघुवीर होबळे, पणजीचे विष्णू कुर्डीकर, रामचंद्र नार्वेकर, दिलीप धारवाडकर, वास्कोचे शशिकांत कुवेलकर, तातू च्यारी, विनय सुर्लकर, सूर्यकांत देसाई, कुठ्ठाळीचे वासू वेर्णेकर, मडगावचे गुरू आडपैकर, कुंडईचे दीना फडते असे कितीतरी हरहुन्नरी कलावंत माझ्या बालपणी मी बघितले आहेत. सावईवेर्‍याचे व्यंकटेश अनंत पै रायकर हे जितके श्रेष्ठ साहित्यिक होते तितकेच थोर नाट्यकलावंतही होते. मदनंत देवस्थानच्या उत्सवात सहसा कुणाला न पेलवणारी ‘ब्रह्मकुमारी’सारखी नाटके ते करीत असत. एकदा तर मला आठवते, ‘मत्स्यगंधा’ या नाटकात व्यंकटेशबाबांनी भीष्म व पराशर अशा दोन्ही भूमिका करून एक विक्रमच केला होता. राम शिलकर, कृष्णनाथ आचार्य हे त्यांचे साथी कलावंत. मूळ सावईवेर्‍याचे पण फोंड्यात स्थायिक होऊन आपल्या नैसर्गिक अभिनयाने उत्सवी रंगभूमी आणि कला अकादमीच्या स्पर्धा दोन्ही गाजवणारे हरहुन्नरी कलाकार जगदीश वेरेकर. त्यांच्या अनेक भूमिका आजही डोळ्यांसमोर उभ्या राहतात. महादेव खानोलकर, सुभाष पारकर व खास करून मधू जोशी यांनीही उत्सवी व स्पर्धात्मक रंगभूमीवर बरंच योगदान केलं आहे.
माझ्या वडिलांच्या पिढीत जन्म घेणारे पण ज्यांची दृष्टी नेहमीच ‘उद्या’च्या नाटकाचा वेध घेणारी होती असं द्रष्टं व्यक्तिमत्त्व म्हणजे किशोर बोरकर. किशोरभैयांची आठवण काढताना आज डोळ्यांत पाणी येतंय. ‘प्रायोगिक रंगभूमी’ हा शब्द कुणीही ऐकला नव्हता अशा काळात रंगभूमीवर नवे प्रयोग किशोरभैयांनी केले. नाटक तांत्रिकदृष्ट्याही चांगलं झालं पाहिजे हा विचार आमच्या मनावर बिंबवला. प्रकाश थळी हेसुद्धा असेच कल्पक दिग्दर्शक. अजित केरकर, विनय गावणेकर यांच्यासारखे कसबी नट त्यांना अभिनयासाठी मिळाले. म्हार्दोळचे विजयकुमार कामत व पणजीचे अविनाश माशेलकर हे दोन समर्थ अभिनेते. पण रंगभूमीसाठी अजून खूप काही देणं त्यांना शक्य होतं. मडकईचे नरसिंह नाईक हे गेल्या पिढीतले दमदार कलाकार. ‘प्रियदर्शन’सारख्या छोट्या भूमिकेतही ते आपली छाप पाडीत असत. पेडण्याचे भालचंद्र  व गणपत हे कळंगुटकरबंधू अख्ख्या गोव्यात ‘फामाद’. चांगल्या नटाला अभिनय उत्तुंग असेल तर उंच शरीरयष्टीचीही गरज नसते याचा प्रत्यय आणून देणारे हे ‘वामनमूर्ती’ कलाकार. तीच गोष्ट मनोहर भोसले यांची. नाटक व तियात्र या दोन्ही प्रकारांत भोसले यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. म्हापशाचे श्रीरंग नार्वेकर हेदेखील असेच हरहुन्नरी कलावंत!
परंपरा नाट्यलेखकांची
मराठी रंगभूमीला गोमंतकानं खूप काही दिलं आहे. मुंबईची व्यावसायिक रंगभूमी गोमंतकीय कलाकारांनी जगवली आहे हे तर आपण पाहिलंच. मा. दीनानाथ, मा. दत्ताराम, प्रभाकर पणशीकर, रामदास कामत, आशालता, दामू केंकरे ही सगळी गोव्याची देण. कलेच्या या खाणीतून अगणित रत्नांची निर्यात झालीय. पण एका बाबतीत मात्र गोव्याचं वैगुण्य प्रकर्षानं दाखवलं जातं. आम्ही कलाकार खूप घडवले, लेखक किती निर्माण केले हा प्रश्‍न खोचकपणे विचारला जातो. निव्वळ संख्येच्या दृष्टीने विचार केला तर हजारो नाट्यलेखक गोमंतकात होऊन गेले. पण त्यातले किती गुणवत्तेच्या कसाला उतरतात हा संशोधनाचा विषय ठरावा.
कृष्णंभट्ट बांदकर हे आद्य गोमंतकीय नाटककार. पण ‘अहल्योद्धार’ वगळता त्यांच्या नाटकाची एकही संहिता आज उपलब्ध नाहीए. मुकुंद विठोजी प्रतापराव सरदेसाई यांनीही चार-पाच नाटके लिहिल्याचे उल्लेख जुन्या पुस्तकात सापडता. पण या नाटकांविषयी कुणालाच फारशी माहिती असल्याचे जाणवत नाही. जुन्या काळात नारायण कामत (भौमासुर), विश्वनाथ हेदे (नल-दमयंती व श्रीकृष्णलीला), माधव हेदे (सुनिश्चय प्रभाव व भारती वीर), कृष्णराव अस्नोडकर (नवजीवन, हाच परिणाम, भक्तिप्रभाव व इतर), हळर्णकर (कबीर-कमाल, भक्त प्रल्हाद इ.), रामचंद्र वैद्य (मृत्युंजय), भीमाजी देशपांडे (वासवदत्ता, संतापशमन व विकल्पविमोचन), दत्तू काटकर (विरोचन, चंद्रप्रभा इ.), बाळकृष्ण ज. नाटेकर (बाजीराव मस्तानी व हरिश्‍चंद्र), अनंत कामत (समाजलांच्छन व विवाह रहस्य), श्रीधर सावर्डेकर (नामप्रभाव), व्यंकटेश वैद्य (गोमंतक विजय व स्वार्थत्याग), काशिनाथ विर्डीकर (आसुरी आकांशा व भावनेच्या भरात), ना. के. शिरोडकर (समईतील ज्योत), बा. शि. शिरवईकर (कुणासाठी), सखाराम बर्वे (प्रणयी कीटक, बलिदान, मंत्रजाल, नवदृष्टी, जळता गोमंतक), ह. वि. देसाई (जीवनासाठी, कीर्तीमंदिर, एप्रिल फूल, जुने ते सोने, मालवते दिवे, आई. इ.), रामचंद्र केणी (कीचक वध), रमाकांत सरमळकर (चुकलेला वाटसरू, बंदिशाळा, बंधुभाव), काशिनाथ घोडे (भक्तिप्रभाव), अनंत टोपले (बहकलेला ब्रह्मचारी), राजाराम वायंगणकर (कवीचा संसार), शंकर पेडणेकर (उजवा हात), वासुदेव वाघ (बाल धर्मवीर), ज. ग. वळवईकर (कुलक्षेत्राचा मुकाबला), राधाकृष्ण शेट्ये (जातिवंत राजपूत व जळती ज्योत) इत्यादी गोमंतकीय नाटककारांची नाटके बरीच लोकप्रिय झाली होती. गोमंतकीय सुकन्या हिराबाई पेडणेकर यांनी ‘जयद्रथविडंबन’ व ‘यामिनी’ ही दोन नाटकं लिहून पहिल्या स्त्री नाटककार होण्याचा मान मिळवला. या कालखंडात नाटककार म्हणून महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने मान्यता मिळवली ती मो. ग. रांगणेकर यांनी. अस्ताच्या दिशेने वाटचाल करू लागलेल्या संगीत रंगभूमीचे पुनरूज्जीवन रांगणेकर यांनी केले. ‘माझं घर’, ‘कुलवधू’, ‘माहेर’, ‘एक होता म्हातारा’, ‘कन्यादान’, ‘वहिनी’, ‘जयजयकार’ अशी रांगणेकरांची अनेक नाटके लोकप्रिय झाली.
यानंतरच्या पिढीतही अनेक नाटककार उदयाला आले. सी. गो. प्रभू यांच्या पौराणिक नाटकांनी खूप लोकमान्यता मिळवली. ना. र. धारगळकर यांचे ‘युद्धाचे आव्हान’ हे नाटक तब्बल २० वर्षे गोव्याच्या खेडोपाडी केले जात होते. र. अ. टोपले, श्रीशंकर नार्वेकर, अच्युत म्हाडेश्री, राम केळकर, गंगाधर महांबरे, गोपाळकृष्ण भोबे (धन्य ते गायनी कळा), वसंत कामत (अंधारयात्रा) हे त्या काळातले काही गाजलेले लेखक.
रघुनाथ टोपले, रमाकांत पायाजी, जयानंद मडकईकर, सुहास सावर्डेकर, महाबळेश्‍वर रेडकर, देविदास गाड, साईदास आपटे, आर. बी. फडते, प्रसाद सावंत, गोकुळदास मुळवी, कमलाकांत हुम्रस्कर, ध्रुव कुडाळकर, ज्ञानेश्‍वर आजगावकर, कृष्णा मोये, वामन राधाकृष्ण, मोहन बुगडे, परशुराम पाटील, रमेश हळर्णकर, उमाकांत साळगावकर, मुकुंद वायंगणकर, प्रसाद सावंत, तुळशीदास काणकोणकर, विठ्ठल पारवाडकर, मिलिंद म्हामल, अशा अनेक लेखकांनी मराठी नाट्यसृष्टीत भर घातली आहे. कला अकादमीच्या स्पर्धेतून विष्णू वाघ, गोविंद नाईक, राजीव शिंदे, विजयकुमार नाईक, विद्याधर दाते, प्रकाश वजरीकर असे अनेक नाटककार पुढे आले. नवे विशय, नव्या संकल्पना मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
गोमंतकाच्या नाट्यपरंपरेबद्दल खूप काही सांगता येईल. पण नुसतं सांगून काय उपयोग? कुणीतरी म्हणून ठेवलंय- ज्यांचा भूतकाळ गौरवशाली असतो त्यांनाच उज्ज्वल भविष्यकाळ असतो. गोमंतकाची नाट्यपरंपरा ही अशी गौरवशाली आहे. ती स्वयंभू आहे- स्वयंमेव आहे- स्वसंवेद्य आहे. या परंपरेचा अभिमान बोडगेश्‍वराच्या किंवा गोव्यातील कुठल्याही क्षेत्रपालाच्या हातातील मशालीसारखा कायम आपल्या अंतरात पेटत रहायला हवा. (क्रमशः)