गॅस सिलिंडरच्या दरात 50 रु.ची वाढ

0
18

>> व्यावसायिक सिलिंडर 350.50 रु.नी महागला

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता या सिलिंडरची किंमत 1117 रू. एवढी झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेस्टॉरंट व अन्य व्यावसायिक आस्थापनांसाठीच्या एलपीजीची किंमत आता 2268 रु. एवढी झाली आहे.

वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्यांना होळीपूर्वी पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
8 महिन्यांनंतर वाढ
घरगुती सिलिंडरच्या किमती 8 महिन्यांनंतर वाढल्या आहेत. यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

काँग्रेस व आम आदमी पक्षाची राज्य सरकारवर जोरदार टीका

विरोधी पक्षांनी या गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दराविषयी गंभीर चिंता व्यक्त करतानाच या वाढीचा निषेध केला आहे. काँग्रेस व आम आदमी या विरोधी पक्षांनी या एलपीजी सिलिंडर दरवाढीबद्दल सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या दरवाढीचा समाचार घेताना भाजप सरकार जीवनावश्यक व घरगुती वापरासाठीच्या वस्तूंत सातत्याने वाढ करून गरीब व सामान्य जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोप केला आहे. या दरवाढीमुळे लोकांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असून भाजप सरकारने मध्यमवर्गीय व गरीब जनतेवर लादलेली ही आर्थिक आणिबाणी असल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला आहे.

आम आदमीकडून टीका

आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनीही या दरवाढीच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. पगारवाढ मिळत नाही. आणि असे असताना परत परत दरवाढ करून सरकार गरीब लोकांना मेटाकुटीस आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीज, पाणी, दूध, भाजी, मासळी यांची दरवाढ यामुळे लोकांचे जगणे मुष्किल बनले असल्याचे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. सावंत सरकारने मोठमोठ्या कार्यक्रमांवर उधळपट्टी करणे बंद करावे, असा सल्ला कुतिन्हो यांनी दिला.