– गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
राजा असूनही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाही पद्धतीने निवडून येऊन राजासारखे वागणारे आजचे राजकारणी यांच्यामधील तुलना करणे हा फार मोठा चिंतनाचा अन् चिंतेचा विषय आहे. शुद्ध, पवित्र हेतूने प्रेरित होऊन केलेले, ईश्वरी अधिष्ठान असलेले, धर्माचे अधिष्ठान असलेले कोणतेही कार्य हे चिरंजीवी स्वरूपाचे असते, आणि अशी कार्ये करणारेही चिरंजीवी ठरतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती महाराज होय! अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन असे अनेक पराक्रमी, शूरवीर जगात होऊन गेले. परंतु, पवित्र तथा शुद्ध हेतूने कार्य करणारा राजा म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहेत ते फक्त एकटे शिवाजी महाराजच! अलेक्झांडरने आपल्या सोबत्यांना मारले. सीझरने आपल्या बायकोला सोडले, तर नेपोलियनने डफ डांगियांचा वध केल्याचे इतिहास सांगतो. परंतु आप्तेष्टांचा घात शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही. राज्याची शिस्त म्हणून काही कठोर निर्णय शिवाजी महाराजांनी अवश्य घेतले, परंतु आपल्या स्वार्थासाठी त्यांनी राजेपदाचा उपयोग केल्याचे उदाहरण इतिहासात सापडत नाही. आजच्या राजकारणात सगळं स्वार्थासाठी चालू असल्याचे आपणास ठायी ठायी दृष्टीस पडते.
सत्ता संपादन करणे हा आजच्या राजकारणातील प्रमुख भाग समजला जातो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेच, परंतु त्या काळात सर्वसामान्यांच्या डोक्यावर आरूढ झालेली पराभूत मनोवृत्ती नाहीशी करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. वास्तविक राज्य स्थापन करण्यापेक्षाही मनोवृत्तीत बदल घडवून आणण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे आणि कठीण असते, जे छत्रपतींनी सहजपणे केले. माणसांची मने घडवून ती आत्मविश्वासाने भरण्याचे आणि भारण्याचे काम महाराजांनी सातत्याने केल्याचे इतिहास सांगतो. शिवाजी महाराजांनी स्वत: झटून, इतरांना प्रेरणा देऊन कार्यरत केले. आजचे राजकारणी स्वत: किती झटतात? आणि किती जणांना प्रेरणा देतात? काही अपवाद सोडले तर आजच्या काळातील सगळ्याच राजकारण्यांच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित होतो.
आधुनिक काळातल्यासारखी कोणत्याही प्रकारची साधनसामग्री नसताना आपल्या सवंगड्यांच्या मनात ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन’ अशी प्रतिज्ञा रुजवून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सगळ्या संकटांना तोंड देत कायमस्वरूपी उरेल असे संघटन महाराजांनी उभे केले. अष्टप्रधान मंडळाच्या रूपाने त्यांनी जी राज्यव्यवहाराची नवी आदर्श पद्धती तयार केली, ती आधुनिक लोकशाही पद्धतीतील मंत्रिमंडळासारखीच होती. महाराजांचा राज्यव्यवहार नेहमीच धर्म तथा संस्कृतीवर आधारित होता. छत्रपतींच्या एकूणच द्रष्टेपणामुळे आणि प्रजेकडे बघण्याच्या ममत्वपूर्ण दृष्टिकोनामुळे राजा असूनही, लोकशाहीवर विश्वास असणारा राज्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा जगात तयार झाली. अशा प्रकारचा व्यापक दृष्टिकोन आजच्या काळात आपल्याला क्वचितच दिसतो. राज्य हे स्वार्थ साधण्याचे नव्हे, तर ध्येयप्राप्तीचे साधन असते, राज्यकर्ता हा ईश्वराच्यावतीने राज्य चालवणारा विश्वस्त असतो, हा अत्यंत व्यापक विचार शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीमधून जगाला दिला. ‘‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे’’, ‘‘हिंदवी स्वराज्य व्हावे, ऐसे श्रींचे मनात फार आहे’’, ‘‘हे राज्य धर्माचे आहे, शिवबाचे नव्हे!’’ किंवा ‘‘आम्हांला हे राज्य श्रीशंभूने दिले आहे’’ ही भाषणामध्ये पेरून टाळ्या मिळवण्याची वाक्ये नव्हेत! ती राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन दर्शवणारी विचारपुष्पे आहेत!
मिर्झा राजे जयसिंह यांना लिहिलेल्या एका पत्रात छत्रपतींनी व्यक्त केलेले विचार, राजा म्हणून त्यांच्यामधील थोरवी दाखवणारे आहेत. या पत्रात छत्रपती मिर्झा राजेना म्हणतात, ‘‘तुम्ही परक्याची सेवा का करता? मला दिल्लीचे राज्य नको आहे. तुम्ही येथे या. आपण दोघेही एकत्र येऊ. मी सर्व दक्षिण निष्कंटक करतो आणि माझ्या सेनेसह, दलबलासहीत मी आपल्या चरणी रुजू होतो. तुमच्या नेतृत्वाखाली आपण दिल्लीवर चाल करून जाऊ. तिथे उदयपूरच्या राण्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करू!’’ त्यांचे विचार आजच्या राज्यकर्त्यांनी समजून आचरणात आणण्यासारखे आहेत. ‘‘मला दिल्लीचे राज्य नको आहे’’, ‘‘माझ्या सेनेसह, दलबलासहीत मी आपल्या चरणी रुजू होतो’’, ‘‘तुमच्या नेतृत्वाखाली आपण दिल्लीवर चाल करून जाऊ’’, ‘‘उदयपूरच्या राण्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करू’’ ही वाक्ये एक अनभिषिक्त राजाही किती कमालीचा विनम्र असू शकतो आणि अहंकाराचा वाराही लागू न देता स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी किती लीन होऊ शकतो याचा दाखला देतात.
समर्थ रामदासांसारख्या अत्यंत नि:स्पृह आणि स्पष्टवक्ता संताने ज्यांच्यावर यशवंत, कीर्तिवंत, समर्थवंत, नीतिवंत, जाणता, आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, सुशील, धर्ममूर्ती, निश्चयाचा महामेरु, अखंड निर्धारी, राजयोगी अशाप्रकारच्या सगळ्या भरजरी विशेषणांची मुक्तकंठाने उधळण केली आहे, असे शिवाजी महाराज मिर्झा राजे सारख्या कितीतरी सामान्य व्यक्तींच्या चरणी रुजू होण्याची, त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची आणि तितक्याच सामान्य असलेल्या उदयपूरच्या राण्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची भाषा लिखित स्वरूपात वापरतात, हे सगळे अवाक् करणारेच आहे. खुर्चीसाठी, नेतृत्वासाठी कसल्याही प्रकारच्या तडजोडी करणारे आजचे राज्यकर्ते छत्रपतींच्या किती कोस दूर आहेत, याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी!
‘गोब्राह्मणप्रतिपालक’ असे एक अर्थपूर्ण विशेषण छत्रपतींच्या नावामागे नेहमीच वापरले जाते. ‘गो’ म्हणजे गाय आणि ‘ब्राह्मण’ म्हणजे भटजी किंवा पुजारी अर्थ लावूनच या विशेषणाकडे सामान्यपणे बघितले जाते. परंतु ‘गो’ म्हणजे गाय असली तरी फक्त गायीचे रक्षण करणारा राजा इतकाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. गाय हे हिंदूंचे पूज्य दैवत असल्यामुळे हिंदवी स्वराज्यात तिचे रक्षण करणे हे महाराजांचे कर्तव्य तर होतेच. परंतु, गाय ही शेतकर्यांची पालक आहे, तिचे रक्षण करणे हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. शेतीप्रधान देशात शेतकर्यांचे हित जपणे, म्हणजेच देशाच्या आर्थिक स्थितीचे रक्षण करणे हा विचारही या विशेषणाच्या वापरामागे आहे. ‘ब्राह्मण’ हा शब्द इथे ‘भटजी’ किंवा ’पुजारी’ या मर्यादित आणि कुपमंडुक अर्थाने वापरलेला नाही. ‘ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण’ या अर्थाने इथे ‘ब्राह्मण’ हा शब्द वापरला आहे. ‘ब्रह्म’ म्हणजे हे विश्व, हे जग. या विश्वाचे, या जगाचे ज्ञान ज्यांना आहे, त्या ज्ञानवंतांचा, विचारवंतांचा रक्षणकर्ता, त्यांचा पालक म्हणून छत्रपतींना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटले जाते. आज सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी स्वभाषा तथा स्वसंस्कृतीवर नांगर फिरवणारे आणि समाजातील ज्ञानवंतांपेक्षा, विचारवंतांपेक्षा धनवंतांना डोक्यावर घेऊन नाचणारे, त्यांच्यासमोर नांगी टाकणारे राज्यकर्ते बघितले की छत्रपतींना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ का म्हटले जाते त्याचा अधिक चांगल्या रितीने उलगडा होतो. राजाने स्वभाषा, स्वधर्म, स्वसंस्कृती आणि ती टिकवणार्या ज्ञानी माणसांचा आदर नेहमीच राखला पाहिजे, हा विचार आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे.
शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात फार व्यापक कार्य केले. सैन्याची, आरमाराची निर्मिती केली. मैदानावर, डोंगरावर, समुद्रतीरावर किल्ले बांधले. सर्वसामान्यावर अन्याय होणार नाही यासाठी कायदे केले. स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृतीचे रक्षण करून तिला प्रोत्साहन दिले. ज्ञानवंतांना, विचारवंतांना, कवींना प्रोत्साहन दिले. आदर्श राज्यपद्धती निर्माण करून ती चालवून दाखवली. आर्थिक स्थितीचे चिंतन केले. अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन २२७ लढायांपैकी २२३ लढाया महाराजांनी जिंकल्या. फक्त सुरतेवरच्या स्वारीच्या वेळी छत्रपतींकडे शत्रूपेक्षा अधिक सैन्य होते. अन्य सगळ्या लढाया शत्रूपेक्षा कमी सैन्य असतानाच त्यांनी जिंकल्या आहेत. शाहिस्तेखानावर स्वारी केली त्यावेळी तर शाहिस्तेखानाच्या एक लाख तीन हजार सैन्याबरोबर छत्रपतींच्या केवळ साडेचारशे सैनिकांनी दोन हात करून विजय मिळवला होता. इतकी मोठी कामगिरी करून आणि इतके मोठे विक्रम करूनसुद्धा इतिहासात शिवाजी महाराजांचा उल्लेख कुठेही ‘विक्रमादित्य’ असा नाही. शिवाजी महाराज हे एक उत्कृष्ट राजा म्हणूनच सगळ्यांच्या स्मरणात आहेत. योद्धा म्हणून नव्हेत! महाराजांनी नेहमीच चांगल्या कामांचा पाठपुरावा केला. चांगल्या माणसांचे संरक्षण केले. दुष्टांचे निर्दालन करून सद्धर्माची स्थापना केली. म्हणूनच महाराजांना ‘छत्रपती’ म्हटले जाते. ‘छत्र’ म्हणजे आश्रय, संरक्षण किंवा छाया, आणि ‘छत्रपती’ म्हणजे आश्रय देणारा, संरक्षण करणारा!
निष्ठा असेल तर सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊनसुद्धा मोठी, कठीण कामे यशस्वी करता येतात याचा वस्तुपाठ भगवान श्रीकृष्णानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा घालून दिला आहे. आजच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती महाराजांच्या कार्याचा सखोल विचार करताना समर्थांनी त्यांच्या नावामागे लावलेल्या भरजरी विशेषणांची महती लक्षात येते. आणि आजच्या राजकारण्यांनी शिवरायांच्या आदर्शाचा पाठ गिरवावा, असे का म्हटले जाते त्याचीही प्रचिती येते.