गर्भाशयातील हितगुज

0
6

योगसाधना- 610, अंतरंगयोग- 195

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आम्हा बहुतेकांना वाटते की हे संस्कार मुलाच्या जन्मानंतर करायचे असतात; गर्भावस्थेत नव्हे! पण हा समज अज्ञानामुळे आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे नव्या अर्भकावर संस्कार गर्भावस्थेतच होत असतात आणि मुख्य म्हणजे ते मातेच्या विचारांतूनदेखील होतात.

प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते की आपले जीवन सुखी-आनंदी असावे. त्यासाठी तो लहानपणापासून शिकतो, कष्ट करून एखादी नोकरी मिळवतो. थोडी आर्थिक स्थिरता आली की मग आयुष्याचा विचार करू लागतो- स्वतःचे वाहन, दुचाकी, नंतर गाडी, एखादा फ्लॅट अथवा बंगला… त्याचबरोबर तो लग्नाचा विचार करू लागतो. लग्न झाले की दांपत्याला वाटते की त्यांना मुले व्हावीत. हे अगदी साहजिक व नैसर्गिक आहे. समाजमान्य आहे.
त्यानंतर विचार सुरू होतो तो आपल्या मुलांचा. मुख्य म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांचा. आम्हा बहुतेकांना वाटते की हे संस्कार मुलाच्या जन्मानंतर करायचे असतात; गर्भावस्थेत नव्हे! पण हा समज अज्ञानामुळे आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे नव्या अर्भकावर संस्कार गर्भावस्थेतच होत असतात आणि मुख्य म्हणजे ते मातेच्या विचारांतूनदेखील होतात. वैज्ञानिक संशोधनामुळे या सिद्धांताला दुजोरा मिळतो.

डॉ. थॉमस वर्नी हे ‘जन्मपूर्व व जन्मपश्चात मनोविज्ञान’ या संस्थेचे संस्थापक म्हणतात- ‘मातेच्या विचारांचा प्रभाव गर्भावस्थेत असताना गर्भावर होऊ शकतो. माता जसा विचार करते अथवा तिचा जसा भाव असतो, भावना असतात- संप्रेरकांच्या माध्यमाने (न्यूरोहॉर्मोन्स) हा परिणाम दिसून येतो. हा प्रभाव अतिसूक्ष्म असतो, त्यामुळे सहसा लक्षात येत नाही.’
मातेच्या भोजनाचा, व्यसनांचा (तंबाखू, सिगरेट, दारू) परिणाम सहज दिसून येतो. कारण गर्भाची वाढ खुंटण्याची शक्यता असते. म्हणून मातेला चांगले पौष्टिक भोजन करण्यास सांगितले जाते. तसेच तिला व्यसनांपासून मुक्त होण्याचा उपदेश केला जातो. हल्ली अध्यात्म व विज्ञान या दोहोंचा परस्पर विचार केला जातो. त्यासंदर्भात विश्वातील मोठमोठ्या केंद्रांतून फार सखोल संशोधन केले जाते. पण हे ज्ञान वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करताना आवश्यक तेवढे दिले जात नाही.

योगसाधनेत ‘गर्भसंस्कार’ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण बहुतेक योगसाधक व शिक्षक या विषयाचा अभ्यास करत नाहीत. खरे म्हणजे हे ज्ञान घेण्यासाठी फार मेहनत घेण्याची गरज नाही. तसेच गर्भवती स्त्रियांपर्यंत पोचविण्याकरिताही आर्थिक ताण नाही. काहीही कष्ट नाहीत. फक्त शास्त्रशुद्ध योगसाधनेचा अभ्यास आवश्यक आहे व त्याप्रमाणे गर्भसंस्कारांसाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते गर्भवती स्त्रियांना नियमित द्यायला हवे.
वैद्यकीयशास्त्राने फार मोठी प्रगती केली आहे, तसेच विविध क्षेत्रांत संशोधन चालू आहे, ही गोष्ट भूषणावह आहे. पण सुलभ प्रसूतीसाठी गर्भवती स्त्रीला योगसाधना अत्यंत उपयोगाची आहे. तसेच बाळाचे संस्कार गर्भावस्थेत सुरू झाले तर माता व बालक यांसाठी उपयुक्त आहे. परंतु हे ज्ञान दिले जात नाही.

यासाठी योगसाधनेचे सर्व पैलू समजले- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक- तर दोघांचा सर्वांगीण विकास सहज होऊ शकतो. विवेकानंदांना या विषयावर संपूर्ण ज्ञान होते म्हणून ते म्हणतात- ‘आज जगाला पाश्चात्त्य तंत्रज्ञान व भारतीय आध्यात्मिक ज्ञान जोडणे आवश्यक आहे.’ आपण पाश्चात्त्य तत्त्वज्ञान घेतले व घेतो पण. भारताच्या अध्यात्माची आम्हाला फार मोठी जाणीव नाही. अर्थात अपवाद आहेत. अनेक संस्था- भारतात व अन्य देशांत- या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात. त्यामानाने पाश्चात्त्य देश या विषयात जास्त रस घेतात. याचे एक कारण असे असेल की भौतिकतेकडे त्यांचा जास्त कल होता. अध्यात्म क्षेत्राची त्यांना जास्त माहिती नव्हती. आता त्यांना भौतिकतेचे दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत. वाढते मनोदैहिक रोग, कौटुंबिक तंटे, घटस्फोट, लढाया, आतंकवाद, लाचलुचपत, महिलांवरील अत्याचार त्यांना आता पटायला लागले आहेत. आता त्यांना वाटते की अध्यात्मशास्त्राशिवाय पर्याय नाही.

भारतात संस्कारांना फार महत्त्व दिले जाते. पण आम्हाला जन्मानंतरच्या संस्कारांबद्दल माहीत होते. पण अध्यात्मशास्त्राप्रमाणे आत्म्याचेही विविध संस्कार आहेत. जन्मापूर्वीचे (आधीच्या अनेक जन्मांचे संस्कार) गर्भावस्थेत होणारे संस्कार, मातेच्या विचारांमुळे व त्याशिवाय माता काय बघते, वाचते, ऐकते यामुळे होणारे संस्कार, जन्मानंतर लगेच होणारे कौटुंबिक व सामाजिक संस्कार, विद्यार्थी अवस्थेत होणारे संस्कार, वातावरण व पर्यावरण यांमुळे होणारे संस्कार… या सर्व संस्कारांमुळे व्यक्तीचा स्वभाव तयार होतो.

सर्वात मुख्य म्हणजे आत्म्याचे नीज संस्कार, जे परमात्म्याकडून त्याला मिळालेले असतात. पावित्र्य, ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, आनंद, सुख… या विविध शक्तिनिशी आत्मा जन्म घेतो व पुढे त्याची घडण होते.
शास्त्राप्रमाणे संस्कार ग्रहण करण्याची आत्म्याची क्षमता सर्वात जास्त असते ती गर्भावस्थेत व जन्मानंतरच्या एक-दोन वर्षांपर्यंत. कारण त्यावेळी आत्मा व मूल निरागस असतात. त्यांना अहंकाराचा लवलेशदेखील नसतो.
हे सर्व ज्ञान आमच्या पूर्वजांना होते म्हणून त्यांनी गर्भवती स्त्रीबद्दल कसा दृष्टिकोन असावा हे सांगितले होते. विविध कर्मकांडे केली जात असत. उदा. डोहाळ जेवण पाच- सात- नव्या महिन्यात. तसेच पहिली प्रसूती महिलेच्या माहेरी होत असे. कारण तिथे गर्भवतीचे मन शांत असेल अशी अपेक्षा होती. माहेरचे वातावरण महिलेला जास्त आपुलकीचे वाटते.
यामागील शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाचा अभ्यास न केल्यामुळे फक्त शुष्क कर्मकांडेच मागे राहिलेली दिसतात. त्यांतील भाव कमी झाला आहे. नष्ट होत आहे. त्यामागचे तत्त्वज्ञान बहुतेकांना माहीतही नाही. नव्या व जुन्या पिढीलादेखील.

आता तर विचारूच नका. महिला नोकरी व व्यवसायामुळे घराबाहेर कामाला निघते. त्यामुळे तेथील वातावरणाचादेखील परिणाम होतो. यातील काही गोष्टी आजच्या समाजव्यवस्थेमुळे अपरिहार्य आहेत. पण तत्त्वज्ञान समजले व थोडातरी भाव राखला तरी अनेक गोष्टी साध्य होणे शक्य आहे. त्याप्रमाणे दृष्टिकोन व विचार बदलायला हवेत. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास सर्व स्तरांवर आवश्यक आहे. अध्यात्मशास्त्र आत्म्याचा विचार करत असल्यामुळे काही पायऱ्या पुढे जाते- वर जाते.
शास्त्रकार म्हणतात-

  • गर्भावस्थेत असलेल्या नवीन आत्म्याचे अतिथी भावनेने सहर्ष स्वागत करावे. शरीर स्त्रीलिंगी अथवा पुुरुष लिंगी- कुठलेही असो- भगवंताची प्रेमाची देणगी हा उच्च भाव ठेवावा. गर्भवती मातेने त्याला विचारांनी प्रेम, आत्मीयता, वात्सल्य द्यावे. परिवारातील इतरांनीदेखील त्याचे स्वागतच करावे.
  • गर्भावस्थेत येण्याच्या आधी तो आत्मा कुठल्या शरीरात होता हे माहीत होणे शक्यच नाही. कदाचित मागच्या जन्मात त्याचा मृत्यू दुःखद असेल- अपघातामुळे, रोगामुळे अथवा खुनामुळेदेखील होऊ शकतो. आपण त्याबद्दल विचारही मनात आणता कामा नये. सकारात्मक चिंतन केले तर त्याचे तेवढे तरी दुःख कमी होईल. त्याचा विकास होईल.

हा असा सखोल अभ्यास बहुतेक करत नाहीत. त्यामुळे त्या विषयावर चिंतनदेखील केले जात नाही.
बहुतेकांंना माहीत असलेले ज्ञान म्हणजे-

  • अभिमन्यू चक्रव्यूहात (गर्भावस्थेत असताना) कसे जायचे हे शिकला अर्जुन सुभद्रेला सांगताना.
  • बाळ प्रल्हाद ः श्रीविष्णूची भक्ती महर्षी नारदांकडून शिकला. कारण नारद माता कपादूचे गुरू होते.
    हल्ली युरोपात यासंदर्भात संशोधन चालू आहे ः
  • गर्भवती स्त्रीला सातव्या महिन्यात संगीत ऐकायला दिले जाते. मुलाचा जन्म झाल्यावर ज्यावेळी ते संगीत ऐकायला दिले तेव्हा ते मूल आवाजाकडे बघून हसायला लागले. कारण ते संगीत परिचित होते- इतर संगीत नाही.
    सारांश ः मूल गर्भावस्थेत असताना निष्काळजीपणा करू नका. मातेची जबाबदारी जास्त आहे. संस्कार गर्भावस्थेपासून आपण देऊ शकतो हे सत्य आहे.