गणेशोत्सवाचा गोमंतकीयांत उत्साह

0
8

>> राजधानीसह सर्वच बाजारांत भक्तांची खरेदीसाठी गर्दी

गोव्यातील सर्वांत मोठा सण असलेला गणेश चतुर्थी उत्सव उद्या दि. 19 रोजी साजरा केला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल गोवाभरात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. राजधानी पणजीसह मडगाव, फोंडा, म्हापसा, वास्को अशा राज्यातील सर्वच प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये सामानाच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उडाली होती. राज्यातील ग्रामीण भागांतही लोक महागाई विसरून खरेदी करताना दिसत होते.

मिठाई, सजावटीचे सामान, फटाके, माटोळीचे सामान, रोषणाईसाठीचे विजेचे सामान, कपडे, विविध खाद्यपदार्थांसाठीची सामुग्री अशा खरेदीत भाविक गुंतलेले दिसून येत होते.
माटोळी सामानाचे दर चढे
यंदा माटोळीच्या सामानाचे दर चढेच असल्याचे आढळून आले. ग्रामीण भागातील विक्रेते माटोळीचे सामान घेऊन दोन दिवसांपूर्वीच विक्रीसाठी विविध शहरात पोचले होते. राजधानी पणजीत माटोळीच्या सामानाचा बाजार गेल्या शुक्रवारीपासूनच मासळी मार्केटजवळ भरला होता. महागाई असली तरी खरेदी करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. गणरायाचे आमच्या घरी आगमन होणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी काहीही कमी पडता कामा नये. वर्षातून एकदा येणारी चतुर्थी आनंद घेऊन येते. अशा भावना लोक खरेदी करताना व्यक्त करीत असल्याचे दिसून येत होते.

पणजी फेरीबोट धक्का ते कांपाल आरोग्य खात्यापर्यंत भरलेल्या अष्टमीच्या फेरीत फर्निचरपासून, कपडे, स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, सजावटीचे साहित्य तसेच खाद्यपदार्थांसह नाना तऱ्हेचे स्टॉल्स आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने राज्यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. वस्त्र प्रावरणे, कृषी माल, विजेचे सामान, भुसारी सामान, सजावटीचे सामान, फटाके आदींची जोरदार खरेदी होत असते. त्यामुळे राज्यातील दुकानदारांबरोबरच शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत
असतो.

गणेश चतुर्थीसाठी फराळ बनविण्याची लगबगही घरोघरी सुरू झाली आहे. घरोघरी करंज्या, मोदक बनवले जात आहेत. गणपतीच्या चित्रशाळाही गजबजून गेल्या आहेत. चित्रशाळांमध्ये गणपतीच्या कलात्मक आणि आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत.

घुमटवाद्ये उपलब्ध
गणेश चतुर्थीसाठी घुमटांचे नाद कानावर जागोजागी पडत असल्याचे दिसून येत आहे. घुमट आरती हे गोव्याचे वैशिष्ट्य ठरले असून त्यासाठी घुमट हे वाद्य प्रमुख मानले जाते. घुमट आरती पथकांनीही तयारी केली आहे. अनेक मार्गांवर घुमटवाद्ये विक्रीसाठी ठेवलेली दिसून येत आहेत.