गणपतीची शाळा

0
40
  • – पौर्णिमा केरकर

आज गणपतीच्या शाळेचे नियम शिथिल झालेले आहेत. पारंपरिक संकेत, नैतिकता, दैवताविषयीची उत्कट श्रद्धा या भावना विज्ञानाच्या कसोटीवर घासून-पुसून बघताना त्यातील जिव्हाळा, आत्मीयता आणि समूहिकता हरवू द्यायची नाही! गणपतीच्या शाळेत नव्या पिढीला अनुभवाचे संचित मिळवून देत, त्यांच्या जगण्याला प्रेरित करायचे आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागाची मूर्ती आणण्यासाठी मिर्झलवाड्यावरील गणपतीच्या शाळेत सकाळी-सकाळी भाईबरोबर निघण्याची आम्हा मुलांची घाई असायची. नागोबाची मूर्ती कशी असावी? ती कशी दिसावी? ती किती मोठी घ्यायची? याबद्दल खूप स्वप्ने रंगवून शेवटी प्रत्यक्षात मूर्तीची निवड करताना मात्र सगळे नागोबा एकसमान भासायचे. ज्या दिवशी नागपंचमी असायची त्याच दिवशी एका महिन्याने येणार्‍या चतुर्थीची तयारी गणेशमूर्तीची निवड करून केली जायची. ही निवड नागाची मूर्ती आणण्यासाठी जातानाच केली जायची.

आतासारख्या मूर्ती त्याकाळी विक्रीसाठी सहज उपलब्ध होत नसत. त्यामुळे मूर्तीचा आकारप्रकार निवडून- मूर्तीकारांना सांगून- पाटावर नाव लिहून ठेवणे गरजेचे होते. मूर्ती जेवढी सुबक, मोठी, मोरावर- उंदरावर- कमळावर बसलेली तेवढीच तिची किंमत जास्त असायची. अशा मूर्ती आपल्या घरी असणे हे मोठेपणाचेच लक्षण असायचे.
सर्वसामान्य मूर्तीपेक्षा वेगळी मूर्ती सांगितली तर तिला वेळ लागायचा आणि तिची किंमतही जरा जास्तच असायची. ज्या चवईवर गणपती पूजायचा असेल ती चवई गणपतीच्या शाळेत नागपंचमीच्या दिवशीच नेऊन द्यायची ही पद्धत होती. गणपतीची मूर्ती कशाप्रकारची हवी ते यावेळी सांगितले जायचे. चतुर्थीची तयारी ही अशी सुरू व्हायची. एकदा का मूर्ती करायला सांगितले की मग चवथीचा दिवस येईपर्यंत चार ते पाच वेळा तरी आम्हा मुलांची पलटण चित्रशाळेला भेट द्यायची. आपल्याच गणपतीची मूर्ती खूप सुंदर अशीच भावना प्रत्येकाचीच असायची. दुसर्‍याची गणेशमूर्ती मोठी आणि सुबक दिसली की मग सूक्ष्मसा मत्सर वाटायचा. असे असले तरी मूर्तीचे डोळे उघडले रे उघडले की तिला डोळ्यात साठवून ठेवत घरी परतणे व्हायचे. गणपती घरी पूजनासाठी आणताना स्नान करून नारळ-तांदळाची तळी, पैसे, पानविडा गणपतीच्या शाळेत नेणे बंधनकारक असायचे. ती सर्वसामान्यांची श्रद्धा होती. निरागस आनंद पुरविणारे ते वेगळेच दिवस होते. उत्सवाचा उत्साह म्हणजे काय असतो हे अनुभवण्याची संधी चवथीचा सण देतो. ही परंपरा काही आजकालची नाही.
गणपती हा देवाधिदेव. सुखकर्ता तसेच विघ्नहर्ता. तो येणार ही चाहूलच सर्वांगाने मोहरून काढणारी आहे. घरचे पुरुष-बायका यांची तर लगबग सुरू होते. संपूर्ण घराची साफसफाई, रंगरंगोटी व्हायची. मातीच्या भिंतीच्या घरांना बाजारातील विकत घेतलेल्या रंगांची सवय लागण्यापूर्वी ‘रेवू’ या मऊसूत पिवळसर रंगाच्या मातीचा गिलावा दिला जात असे. गणपतीच्या मूर्तीवर उजेड फाकविणारा लामण दिवा चकचकीत दिसण्यासाठी चारपाच दिवस शेणाच्या गायरीत पुरून ठेवला जायचा. तिथे जवळपास ओळखीची खूण करून ठेवली जायची. पितांबरी न लावताही हा लामणदिवा चकचकीत होऊन जायचा. पूजेचे साहित्य, नैवेद्य तयार करण्यासाठी लागणारी सामग्री, भाजीपाला- खास करून रानभाज्या, घरात- बाहेर शेणसडा करणे, कडेकुशीला असलेले मातलेले गवत काढून जागा नितळ करणे इत्यादी सारीच कामे खास स्त्रियांची असायची. घराला नवा रंग देणे, पताक्यांची सजावट, दिव्यांची रोषणाई, माटोळीसाठीचे सामान रानात जाऊन जमवून आणणे, ते स्वच्छ करून माटोळीला बांधून मूर्ती पूजेला लावीपर्यंतची सारी जबाबदारी घरच्या पुरुषांची असायची. रात्र-रात्रभर जागरणे व्हायची. शेताभाटांत वावरून तिन्हीसांजेला घरी पोहोचल्यावर गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू केली जात असे. हे सर्व करण्यामागे उत्साह होता आणि मुख्य म्हणजे आपल्या लाडक्या दैवताविषयीची असीम श्रद्धा! या श्रद्धेपोटी तर सगळीच कामे स्वच्छ मनाने शुचिर्भूत होऊन करण्याकडे कल असायचा. माटोळीसाठी रानात भटकून, पारंपरिक फुले-पत्री आणून ती धुवायची. स्वतः आंघोळ करून ठराविक वेळीच ती बांधायची. बांधताना मनात मत्सर, द्वेष भावना असता कामा नये हे कटाक्षाने पाळले जायचे. एकदा का माटोळी बांधून पूर्ण झाली की तिच्या खालून कोणीही जाता कामा नये हा दंडक असायचा. पताका लावण्यासाठी अगोदरपासून खूप रात्री जागविल्या जायच्या.
चवथीची आतुरतेने वाट बघत असायची ती लहान मुले. उत्सवाच्या दिवसात त्यांच्यासाठी सगळे रान मोकळे होते. शेजार्‍यांच्या घरी जाऊन त्यांची सजावट पाहायची. त्यांच्यापेक्षा आपली बरी व्हावी म्हणून मग सारखी मोठ्यांजवळ भुणभुण लावली जायची. लताचा आबा खूप छान पताका कापून लावायचा. त्यांचे कुटुंब जसे मोठे, तसा त्यांचा चौकसुद्धा मोठा होता. त्यांच्याच घरात गणपतीसमोर ठेवलेली ‘दवली माण’ मी पहिल्यांदा बघितली. काकी आणि आवय या दोघीही जाऊ-जाऊ आळीपाळीने दवली-माण वाजवयाच्या. गणपतीला जागविण्यासाठीची ती नौबत आहे असे त्या सांगत.
जेवणासाठी मोठी पंगत तर होतीच, त्याशिवाय रात्रीचे भजन, आरत्यासुद्धा खूपच तन्मयतेने म्हटल्या जायच्या. गणपतीसमोर जी आरती-भजन केले जायचे ते सामूहिक असायचे. वाड्यावरील प्रत्येक घरातील एखादी तरी व्यक्ती या समूहात असायला हवी हा शिरस्ता होता. त्याचे पालन सगळीच करायची. गणपती पूजनापासून ते मूर्ती विसर्जित करेपर्यंत सर्वच कामे सामूहिकतेने व्हायची. उत्साही वातावरणात पार पाडली जायची. फटाके, नवीन कपडे यांची एक वेगळी नशा या सणाच्या निमित्ताने मनावर चढायची. चवथीच्या दुसर्‍या दिवसापासून वाड्यावरील, गावातील, शेजारच्या गावी, नातेवाईकांच्या घरी गणपती बघायला जायची ऊर्मी स्वस्थ बसू देत नसे. कोठे आणि कोणाकडे सजावट सुंदर आहे? अधिकची चित्रे कोणाकडे आहेत याचा शोध चालूच असायचा. पेडणे-पालयेच्या शेजारील गाव महाराष्ट्रातील आरोंदा तेथीलच आगराळी येथील गणपतीची चित्रे तेव्हा प्रसिद्ध होती. खास तेथीलच चित्रे बघण्यासाठी आमची पलटण होडीतून प्रवास करून आरोंदा येथे जायची व अगदी चालून पाय दुखेपर्यंत ती सगळी चित्रे पाहिली जायची. कोणी कधी गाडीची लिफ्ट दिली नाही की कोणती प्रवासी बस भेटली नाही. गणपतीच्या ओढीनेच ती कलात्मकता अनुभवण्याचे वेड घेऊन
ही पायपीट व्हायची. गणपतीच्या मूर्ती आणायच्या तर त्या पेडणे तालुक्यातून. त्यातही पालये गावच्या शाळेत ज्या मूर्ती केल्या जायच्या त्या खूप सुबक, सुंदर आणि मुख्य म्हणजे जिवंत भासत, हे अनेकांच्या तोंडून ऐकताना ऊर अभिमानाने भरून यायचा.
मूर्तीकारांच्या मांदियाळीतील परबवाड्यावरील सदाशिव परब हे एक भारदस्त नाव फक्त मूर्तींसाठीच नाही, तर कलेचा एक मोठा कॅनव्हास या नावाने व्यापलेला आहे. आमच्या घरात आणि एकूण वाड्यावर मूर्ती आणल्या जायच्या त्या मिर्झलवाड्यावरून. सोनू परब आणि त्यांच्या घरच्या मंडळीनी बनवलेल्या. चतुर्थी जवळ येऊ लागली की सोनू काकांचे घर आमचेच होऊन जायचे. त्यांचे चौकपडवी- राजांगणसदृश्य मोठे घर होते. इंग्रजीतील ‘एल’ आकार धारण केलेले हे घर. अंगणात मोठे तुळशीवृंदावन आणि फणसाचे डेरेदार झाड. या घरातील माणसेही अशीच मोठ्या मनाची. आम्ही घरभर कोठेही फिरायचो, धावायचो. कसलेच बंधन नसे. एखादी मूर्ती घडविलेली तिथं असायची, तिला सुरुवातीचा रंग द्यायची इच्छा या चित्रशाळेने पूर्ण केली. मूर्तींसाठी मातीचा ढीग अंगणात असायचा. त्यातील माती अळवाच्या पानावर घालून घरी घेऊन येताना कोणीच कधी अडवले नाही. तिथेच अंगणात बसून माती घेऊन पक्षी-प्राणी तयार केले. काही घरी आणले.

मनासारखा आकार आला नाही ते तिथेच मोडून त्याच मातीत मिसळून टाकले. हे असे एक-दोनदा नाही तर कित्येक वेळा झाले.
बालमनावर ठसा उमटला होता की गणपतीची मूर्ती ही गणपतीच्याच शाळेत करायची असते. ती कोठेही उघड्यावर विक्रीसाठी मिळत नसे. तिचा कधी व्यवसाय झालेला त्या वयाने
अनुभवलं नव्हतं. मूर्ती घडविण्यापासून ते ती प्रतिष्ठित होऊन परत विसर्जित होईपर्यंत लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचं पावित्र्य जतन करायचे. तशी परंपराच निर्माण झाली होती.
जिथं गणपतीच्या मातीच्या मूर्तींना आकार दिला जायचा ती ‘गणपतीची शाळा’ हे नावच मनात सत्यम्-शिवम्-सुंदराची भावना जागं करायचं. हे असे एक नातं मातीचं-मूर्तीचं आणि त्या मूर्तीत जीव ओतणार्‍या कलाकारांचं! श्रीगणेश हा कलांचा अधिपती. निसर्गदेवता. त्याची सार्थता बालपणीच पटली होती. भजन, आरती, फुगडी, सभोवतालची सजावट, माटोळीतील जैवविविधता यातून या सणाने पूर्ण कुटुंब एकत्रित बांधून ठेवले. चाकरमान्यांना गावकडची ओढ लावली. समूहिकतेचा आविष्कार घडविला. महिला स्वयंपाकघरात व्यस्त असायच्या तरीही फुगडीसाठी कितीही उशीर झालेला असला तरी वेळ राखून ठेवला जायचा. बाईबाय, ताईबाय, उजूची आई, दाजीकाकाची बायल, कुमुदबाय, पुष्पाबाय ही वाड्यावरील फुगडीसाठी असलेली प्रसिद्ध नावे. त्यांच्या भारदस्त आवाजाने रात्री जिवंत होऊन उठायच्या. फुगडीची आवड आणि ओळख ही इथूनच सुरू झाली.

गणपतीच्या शाळेने खूप काही शिकवले. जिथं शिकता येतं, शिकवलं जातं, संस्कार दिले जातात आणि असे वातावरण तयार केलेले असते की त्या वातावरणात राहून बर्‍याच गोष्टी
सहजपणे शिकता येतात ती जागा म्हणजे शाळा असते, हे कळण्यासाठी वर्षे जावी लागली. गणपतीच्या शाळेत कलाकारांनी मातीच्या मूर्तीच केल्या की या शाळेने आमच्या पिढीला घडवलं? मातीच्या गोळ्याला फक्त आकार देऊन भागत नसते, त्यात प्राण ओतावा लागतो. त्याचे पावित्र्य जतन करावे लागते. पैशांसाठी नाही तर जगण्याच्या आनंदासाठी श्रद्धेने केलेला प्रवास महत्त्वाचा असतो. अशा आंतरिक श्रद्धेचा हा प्रवास होता. मूर्ती घडविताना हे त्या-त्या कलाकाराकडून शिकता आले. रानफुलांसाठी, पानांसाठी, भाज्यांसाठी रानोमाळ तहानभूक हरपून भटकणार्‍या पावलांना, पताकांची आकर्षक सजावट करणार्‍या हातांना, स्वयंपाकघरात अहोरात्र वावरत असताना तन-मन-धनाने श्रीगणेशाशी समरस झालेल्या हृदयाला, बाप्पाच्या येण्याची अनिवार ओढ लागलेल्या बाल-वृद्धांना गणपती कधी मातीची मूर्ती वाटलीच नाही. तो सखा, मित्र, शिक्षक, घरचा कर्ता, आधारस्तंभ, सुखकर्ता दुःखहर्ता वाटला. स्त्रियांनी आपल्या लाडक्या गणोबाला मखरात बसविले. त्याला दागिन्यांनी मढविले, दवली-माण वाजवून जागृत केले, फुगडी-भजन-आरतीतून अजरामर केले. त्याचे स्थान हृदयात म्हणूनच विसर्जनाची रात्र जड व्हायची. डोळ्यांत पाणी आणून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात निरोप दिला जायचा. विसर्जन तेही सामूहिक. उत्स्फूर्त उत्साहात! आये सांगायची, ‘‘गणपती बुडविल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी तळीवर जाऊन त्यांच्या गजाली ऐकायच्या. गणपती बोलतत… कोणागेर कितके नेवरे खाल्ले? कोणी मनातल्यान पूजा केली? सगळे एकमेकांक सांगतात. पावला वाजोवच्या पयली तळयेर चल, मागीर आयकांक येतले…’’ गजाली ऐकण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण कधी ऐकू आल्याच नाहीत. फक्त हा आमचा गणपती आणि तो त्यांचा गणपती अशी ओळख करून घेत मूर्ती पाण्यात विरघळून जाईपर्यंत डोळे पाण्याचा तळ शोधीत. विसर्जित केलेल्या मूर्ती फुगून मऊ झालेली ती माती आणून नव्याने मूर्ती घडविण्याचा प्रयत्न केला जायचा. ती एक वेगळीच अनुभूती होती.

आज रस्त्याच्या बाजूने, अर्धवट बांधलेल्या इमारतीत, दुकानात, बाजारात कोठेही तयार मूर्ती पैसे दिले की विकत घेता येतात. मातीचे पावित्र्य आणि तिची सर्जकता यांचे नाते, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींत शोधूनही सापडणार नाही. माती- गणपती- नाती म्हणजेच ऊर्जा. सकारात्मकता, नितळ-निरागस आनंद! हे आनंदकण वेचलेले पेरीत जायचं. आज गणपतीच्या शाळेचे नियम शिथिल झालेले आहेत. पारंपरिक संकेत, नैतिकता, दैवताविषयीची उत्कट श्रद्धा या भावना विज्ञानाच्या कसोटीवर घासून-पुसून बघताना त्यातील जिव्हाळा, आत्मीयता आणि समूहिकता हरवू द्यायची नाही! गणपतीच्या शाळेत नव्या पिढीला अनुभवाचे संचित मिळवून देत, त्यांच्या जगण्याला प्रेरित करायचे आहे.