याप्रकरणी काल दुपारी १२ वा. राष्ट्रपतींची भेट घेतलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजपच्या गोवा प्रभारी आरती मेहरा, भाजपचे गोवा अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्तर गोवा खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, आमदार फ्रान्सिस डिसोझा, वासू मेंग गावकर, भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर व भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या तसेच राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर, कोषाध्यक्ष संजीव देसाई यांचा समावेश असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले.
गोव्यातील खाण घोटाळ्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, ज्योकिम आलेमाव, विश्वजित राणे, दिनार तारकर, जितेंद्र देशप्रभू आदींचा हात असल्याचे शिष्टमंडळाने एका लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींच्या नजरेत आणून दिले असल्याचे ते म्हणाले.
या घोटाळ्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बडे राजकारणी असल्याने गोवा पोलीस या घोटाळ्याचा तपास करू शकणार नाहीत. त्यामुळे घोटाळ्याचे तपासकाम विशेष चौकशी पथकाकडे अथवा सीबीआयकडे द्यावे अशी मागणी पथकाने राष्ट्रपतींकडे केल्याचे ते म्हणाले. खाण माफियांपासून राज्याला वाचवावे तसेच कायदेशीर खाण व्यावसायावर अवलंबून असलेल्या लोकांचे हित जपावे अशी मागणीही शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.