खनिज लीजांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु

0
13

>> मुख्यमंत्री; आगामी सहा महिन्यात खनिज लीजांचा लिलाव

राज्यातील खनिज लीजांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या सहा महिन्यांच्या आत खनिज लिजांचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरील चर्चेचा समारोप करताना काल दिली.
राज्यातील खनिज लीज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खनिज लीज ताब्यात घेतल्याशिवाय खनिज लीजांचा लिलाव केला जाऊ शकत नाही. खनिज लिजांच्या लिलावाच्या प्रक्रियेसाठी एसबीआयची मदत घेतली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोवा राज्य हे शैक्षणिक हब बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, खासगी विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मान्यता दिल्यानंतर एका खासगी विद्यापीठाचे उद्घाटन सुध्दा करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील कॅन्सर रुग्णांना मेडिक्लेेम योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्यातील उद्योग धोरणात नवीन दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात नवीन उद्योगाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

युवा वर्गाला स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी उपाययोजना हाती घेतली जात आहे. कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जात असून, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून (आयटीआय) ४२ अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. त्यात १० ते १२ नवीन अभ्यासक्रम आहेत. आयटीआयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जवळच्या औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळवून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील संघटनांशी सामंजस्य करार केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समाज कल्याण, महिला व बाल कल्याण खात्याच्या योजनांचे मानधन लाभार्थ्यांना वितरित करण्याच्या प्रक्रियेत पुढील तीन महिन्यांत सुसूत्रता येणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा करण्यापूर्वी त्याला एसएमएसच्या माध्यमातून मानधनाबाबत माहिती दिली जाणार आहे. सरकारकडून विविध योजनांसाठी दिले जाणारे अनुदान सुध्दा वेळेवर वितरित केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.