क्रीडा संघटनेच्या अध्यक्षासह खेळाडू ठार

0
10

>> बांबोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकरची रेंट-अ-कारला जोरदार धडक; टँकरचालकाला जुने गोवे पोलिसांकडून अटक

पणजी ते मडगाव या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 66 वर बांबोळी येथील उतरणीवर सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास एका भरधाव टँकरने रस्ता दुभाजक ओलांडत विरुध्द दिशेने येणाऱ्या रेंट-अ-कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. या अपघातात अखिल भारतीय सेपॅकटॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र कर्तार सिंग (42, रा. पश्चिम दिल्ली) आणि खेळाडू अंकित विनोदकुमार कौर (34, रा. बागपत, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला. या दोघांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. जुने गोवे पोलिसांनी टँकरचालक राहुल नवनाथ सरवडे (36, रा. सोलापूर महाराष्ट्र) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

सविस्तर माहितीनुसार, मडगाव येथून पणजीच्या दिशेने जात असताना बांबोळी येथील उतरणीवर टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने (क्र. एमएच-45-एएफ-7720) पहिल्यांदा रस्ता दुभाजकाला धडक दिली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेवर जाऊन पणजीहून बांबोळीच्या दिशेने जाणाऱ्या रेंट-अ-कारला (क्र. जीए-08-व्ही-7674) जोरदार धडक देऊन तो पलटी झाला.

या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसाने झाले. परिणामी ही कार नेमकी कोणती हे ओळखणे देखील कठीण बनले होते. टँकरच्या धडकेने रस्ता दुभाजकाला लागून असलेला विजेचा खांबही कोसळला.
जुने गोवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखीली हवालदार चतुर सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील पाठविण्यात आले.

योगेंद्र सिंग आणि अंकित कौर हे दोघेही ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रीय सेपॅकटॅकरो स्पर्धेसाठी आले होते. ही स्पर्धा संपल्यानंतरही गोव्यातच सेपॅकटॅकरोचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याने ते थांबले होते.

टँकरचालकाला अटक
जुने गोवे पोलिसांनी टँकरचालक राहुल नवनाथ सरवडे (36, रा. सोलापूर महाराष्ट्र) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 (बेपवाईने वाहन चालवून जीव धोक्यात घालणे) आणि 105 (सदोष मनुष्यवध) कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जस्विता नाईक पुढील तपास करीत आहेत.

क्रीडा विश्वावर शोककळा
या अपघातात मृत पावलेले दोघेही क्रीडा क्षेत्राशी संबंधित होते. योगेंद्र सिंग हे अखिल भारतीय सेपॅकटॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष होते, तर अंकित कौर हा सेपॅकटॅकरो खेळाडू होता. त्या दोघांच्या अपघाती निधनाने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

टँकरच्या धडकेने कारचा चेंदामेंदा
टँकरची रेंट-अ-कारला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की, त्याबरोबर कारचा चेंदामेंदा झाला. त्याचबरोबर अपघातग्रस्त कारण नेमकी कोणती हे ओळखणे देखील अवघड बनले होते. धडकेनंतर टँकर रस्त्याबाजूचे रेलिंग तोडून खालील भागात कोसळला.

गोवा सेपॅकटॅकरो असोसिएशनच्या अध्यक्षांकडून शोक व्यक्त
गोवा सेपॅकटॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग आणि खेळाडू अंकित यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गोव्यात आलेले योगेंद्र सिंग आणि अंकित कौर हे दोघेही मंगळवारी सकाळी नवी दिल्लीला रवाना होणार होते. त्याआधीच सोमवारी मध्यरात्री त्यांच्या कारगाडीला भीषण अपघात झाला. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचे पार्थिव विमानाने नवी दिल्लीला नेण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.