गोव्यातील काही कॉंग्रेस आमदारांनी पुन्हा एकवार आपल्या विकाऊ वृत्तीचे घृणास्पद दर्शन अवघ्या देशाला घडवले. देवदेवतांच्या शपथा घेऊन आणि पक्षांतर न करण्याची प्रतिज्ञापत्रे भरून निवडून आलेली ही मंडळी व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षाला खुंटीवर मारून उगवत्या सूर्याला दंडवत घालायला निघाली होती खरी, परंतु पक्षांतर बंदी कायद्यातील दोन तृतीयांश संख्याबळ प्रथमदर्शनी तरी निर्माण न होऊ शकल्यानेच हे बंडखोर तूर्त माघारी फिरल्याचे दिसते. ज्यांनी शेवटच्या क्षणी या कथित बंडात खोडा घातला, त्यांना खरोखरच पक्षप्रेमाचे भरते आले आहे की सौदेबाजीचा हा प्रकार आहे हे लवकरच कळेल. मात्र, हे बंड रोखण्याच्या धडपडीत ज्या आततायीपणाने कॉंग्रेस पक्षनेतृत्व वागले, ते शेखचिल्लीगत स्वतःच्याच पायांवर कुर्हाड मारून घेणारे ठरले आहे हेही तितकेच खरे आहे.
आपले सहा आमदार फुटले असल्याचे स्वतःच जाहीर करून आणि या बंडाच्या दोघा सूत्रधारांवर थेट कारवाई करणारी पावले टाकून कॉंग्रेस पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असला, तरी त्या दोघांच्या बंडातील सहभागाबाबतचे ठोस पुरावे त्यांनी अद्याप जनतेसमोर ठेवलेले नसल्याने या घिसाडघाईमुळे, फुटीच्या प्रयत्नात असणार्यांना संभाव्य पक्षांतरासाठी अकारण नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. शिवाय कॉंग्रेस पक्षाने खरेच बंड रोखले आहे म्हणायचे की आत्मघात करून घेतला आहे असे म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे तो वेगळाच. गोव्यात जे चालले आहे त्याला चिखलकाल्याची उपमा आम्ही देणार नाही, कारण माशेलच्या कालच्या चिखलकाल्याला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, येथे तर अवघी लाजलज्जा कोळून प्यायलेल्या विकाऊंचा बाजार भरला आहे.
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पक्ष एकसंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेतृत्वाने चालवलेला असताना मायकल लोबो यांनी निरीक्षकांना गुंगारा देत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठणे, दिगंबर कामत यांनी नॉट रिचेबल होणे याचा अन्वयार्थ हे लोक भाजपात चालले आहेत असा घेतला जाईल हे न कळण्याएवढी ही मंडळी दूधखुळी नक्कीच नाहीत. किंबहुना लोबो आणि त्यांच्या दोघा पंटरांनी केलेला प्रकार तर कमालीच्या उतावीळपणाचा होता. फळदेसाई तर निवडून आल्यापासून कानात वारे शिरलेल्या वासरासारखे सत्ताधार्यांसमवेत हुंदडत आहेत.
लोबो आपल्याविरुद्ध सरकारने खणून काढलेल्या प्रकरणांचा धसका घेऊन घरवापसीच्या तयारीत आहेत हे समजण्यासारखे आहे. परंतु दिगंबर कामत यांना खरोखरीच यावेळी बंड करायचे होते का याविषयी नाही म्हटले तरी साशंकता वाटते, याचे कारण पर्रीकरांच्या आजारपणापासून त्यांना भाजपात प्रवेश करण्याची भरपूर संधी होती. तेव्हाच भाजपात गेले असते तर पर्रीकरांनंतर कदाचित तेच मुख्यमंत्री बनले असते. परंतु कॉंग्रेसची धूळधाण होत शेवटी एकच संख्या उरली तरी कामत निष्ठेने पक्षासोबत राहिले. प्रतापसिंह राणेंनी नामुष्कीची तडजोड केली तरी गेल्या निवडणुकीत पक्षासाठी आघाडीवरून वावरले. मात्र, मायकल लोबोंच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर पक्षाने बाजूला फेकल्याने ते दुखावले आणि हीच आपली वेदना त्यांनी ‘रिटायर्ड हर्ट’ या शब्दांत दिनेश गुंडूराव यांच्यापाशी व्यक्त केली होती. लोबोंनी आपली जागा घेतल्याने दुखावलेले कामत त्यांच्याच नेतृत्वाखालील या बंडामध्ये सामील होणार होते हे पचनी पडायला अजूनही जड वाटते, कारण राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याने मायकल लोबोंच्या नेतृत्वाखाली पक्षत्याग करणे त्यांच्यासाठी मानहानीकारकच असेल.
कॉंग्रेस पक्षापाशी मायकल आणि दिगंबर यांनी या बंडाचे कटकारस्थान रचल्याचे जे काही पुरावे असतील ते त्यांनी जनतेपुढे ठेवले पाहिजेत. आपण या दोन बड्या नेत्यांवर कारवाईस प्रवृत्त झालो तो निव्वळ उतावीळपणा नव्हता, तर भक्कम पुराव्यांच्या आधारेच ही कारवाई केली जात आहे हे त्यांना सिद्ध करावे लागेल अन्यथा पक्षाचे हसे होईल. या कथित बंडाच्या निमित्ताने एक गोष्ट सर्व संबंधितांनी लक्षात ठेवली पाहिजे. या अकरा जणांपैकी तब्बल आठ जण हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यांच्या मतदारांना त्यांचे पक्षांतर पसंत असेल काय? पुढच्या निवडणुकीत ते त्यांना थारा देतील काय? हाच विचार करून दक्षिणेतील ख्रिस्ती आमदार बंडापासून दूर राहिलेले दिसतात. जी मंडळी बड्या बंडवाल्यांमागे फरफटत निघाली आहेत, त्यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा, आपल्याला राजकारणात दीर्घकाळ टिकायचे आहे की अल्पकाळ फायदे मिळवून पुढच्या निवडणुकीत धुळीला मिळायचे आहे याचा विचार एकदा करून पाहावाच!
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.