कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज

0
9

>> अशोक गेहलोत, शशी थरुर शर्यतीत;१७ ऑक्टोबरला निवडणूक

कॉंग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार हे नक्की झाले असून, अध्यक्षपदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी शनिवार दि. २४ ते शुक्रवार दि. ३० सप्टेंबर या काळात अर्ज भरण्यात येणार असून, कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे दि. १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी काल याविषयीची अधिसूचना जारी केली. त्यात कॉंग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची वेळ ८ ऑक्टोबरपर्यंत असेल.
या काळात जर एकापेक्षा अधिक अर्ज उरले असतील, तर अध्यक्षपदासाठी दि. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीचा निकाल दि. १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

कॉंग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे राहुल गांधी यांनी या आधीच जाहीर केले आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असून, हे दोन्ही नेते ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या शर्यतीत २ माजी मुख्यमंत्री व एका माजी मंत्री असून, तीन नवी नावे उजेडात येत आहेत. त्यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह व माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे २०१४ नंतर कॉंग्रेस पक्षाची सर्व निवडणुकांमध्ये पीछेहाट सुरू आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष आता कॉंग्रेसला तारणार का हे पाहावे लागेल.

एक व्यक्ती, एक पद : राहुल गांधी
कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक कॉंग्रेस नेते इच्छुक असून, त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही समावेश आहे. मात्र राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे अशोक गेहलोत या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आपण कॉंग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमाशी सहमत आहोत, असे केरळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष होणार्‍या व्यक्तीला आपले दुसरे पद सोडावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.