एनआयएच्या रडारवर ‘पीएफआय’; देशभरातून १०६ सदस्यांना अटक

0
15

>> गोव्यासह १२ राज्यांत छापेमारी; दहशतवाद्यांशी संबंध आणि टेरर फंडिंगचा आरोप

राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने काल दिवसभरात देशातील वेगवेगळ्या राज्यांत छापेमारी केली. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध आणि टेरर फंडिंग केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १०६ सदस्यांना अटक केली. देशभरातील १२ राज्यांत एनआयएने ही छापेमारी केली. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह १२ राज्यांत छापे टाकण्यात आले. दरम्यान, गोव्यात बायणा-वास्को या ठिकाणी एनआयएने पीएफआय सदस्यांची शोधाशोध केली. एनआयएने गोव्यात अन्य काही ठिकाणी देखील कारवाई केली; मात्र या कारवाईचा अधिकृत तपशील समोर येऊ शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यांत छापेमारी केली. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक करण्यात आली.

पीएफआय संघटनेचा अध्यक्ष ओमा सालेम याच्या केरळमधील मांजेरी येथील घरावर सुद्धा एनआयएने छापेमारी केली. मध्यरात्री ही छापेमारी करण्यात आली. यावेळी पीएफआय संघटनेच्या सदस्यांनी सालेम याच्या घराबाहेर एनआयएविरुद्ध निदर्शने केली. या छाप्यात ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. ओमा सालेमसह पीएफआयच्या केरळ राज्याचा प्रमुख मोहम्मद बशीर, राष्ट्रीय सचिव वी. पी. नजरुद्दीन आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी. कोया यांना ताब्यात घेतले.

महाराष्ट्रात देखील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या ठिकाणी कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशात इंदुरमध्ये पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला, तर उज्जैनमधून ४ जणांना ताब्यात घेतले. बिहारमधील पूर्णियामध्ये देखील अशीच कारवाई करण्यात आली.

तेलंगणामध्ये एनआयएने हैदराबाद आणि चंद्रयानगुट्टा येथील पीएफआयचे कार्यालय सील केलेे. तसेच तामिळनाडूत देखील पीएफआय कार्यालय सील करण्यात आले. या कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’
काय आहे?
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची स्थापना २००६ साली केरळमध्ये झाली. १९९२ मध्ये बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर ज्या काही मुस्लीम संघटना स्थापन झाल्या होत्या, त्यापैकी नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि मनिथा नीथी पसराय ऑफ तमिळनाडू या तीन संघटनांच्या विलिनीकरणातून ही संघटना स्थापन झाली. ही संघटना दहशतवादी कृत्यांसाठी निधी, सदस्यांसाठी प्रशिक्षण देणे, संघटनेत सामील करून घेण्यासाठी धर्मांतर करणे आदी मार्गांनी सक्रिय असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

गोव्यातून आतापर्यंत २२ बांगलादेशी ताब्यात

गोवा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाईत आतापर्यंत २२ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

राज्यातील विविध भागांत बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. साखळी, वाळपई, डिचोली, कोलवाळ, वार्का आदी भागांतून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही बांगलादेशी नागरिकांकडे बोगस आधारकार्ड आढळून आली आहेत. या प्रकरणी सविस्तर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अवैध वास्तव्य प्रकरणी हरवळे-साखळी येथून ५, बोर्डे-डिचोलीतून ४, तर वाळपईतून दोघा बांगलादेशींना अटक करण्यात आली होती.