– हरी दाणी, वेलिंग-म्हार्दोळ
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ अशा अर्थाने एक कविता इयत्ता २ रीच्या क्रमिक पुस्तकात होती. त्या कवितेची आठवण झाली. हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने एखादा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो. गांधी जयंती, नेहरु जयंची वगैरे वगैरे. तसाच टिळक पुण्यतिथीचा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. हे एक औचित्य साधून सार्या पत्रकारांना एकत्र आणण्याचा एक दिवस. या दिवशी फोंडा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास योगायोगाने मित्राच्या बरोबरीने मीही हजर होतो.
लोकशाहीत पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. टिळकांची पत्रकारिता व त्यावेळच्या सर्व पत्रकारांची पत्रकारिता वाखाणण्यासारखीच होती. परकीय सत्ता अंमलात असूनही परकीय सत्तेला न जुमानता या पत्रकारांनी आपल्या विचारांची अभिव्यक्ती करून जनजागृतीची मशाल पेटविली. पत्रकार हा एका अर्थाने समाजशिक्षकच. चार भिंतींच्या मर्यादेत जागेत ४० मुलांना घेऊन शिक्षणाने ज्ञानाचे धडे देऊन मुलांना माणूस घडविण्याचे शिक्षण शिक्षक देतात. पण पत्रकार हा समाजजागृती करणारा समाज शिक्षक बनला पाहिजे व समाज प्रबोधनाचे कार्य करणे हे त्यांचे काम झाले पाहिजे. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय विषयांत पत्रकाराने आपली लेखणी चालविली पाहिजे. याचे भान असणे जरुरीचं आहे. पत्रकार, पत्रकारिता ही सुळावरची पोळी, सतीचे वाण आहे. याकरिता पत्रकार हा निर्भिड, निर्भय, निःसंग असणे व सत्याची कास धरून घटनेची सत्यता उघड करणे हे काम पत्रकाराने कोणाची भीड न धरता करणे अपेक्षित आहे. पत्रकारामध्ये कोणते गुण असावेत व कोणते गुण नसावेत? ज्यांच्या नावाने हा कार्यक्रम आपण आयोजित करतो, ती व्यक्ती त्या क्षेत्रातील आदर्श म्हणून आपल्या डोळ्यांसमोर असते. तेव्हा त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा अनुभव पत्रकारांत असला पाहिजे. जसे ज्ञानेश्वरीतील ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे नामदेवांनी, एकनाथ महाराजांनी म्हटले आहे. ‘अनुभवावी’ म्हणजे ‘आचरणात आणावी’ असा अर्थ होतो. तसे पत्रकारितेचा हा दिवस साजरा करताना टिळकांच्या गुणाचे आचरण करणे, निदान तसा संकल्प करणे हे पत्रकाराने लक्षात ठेवून पत्रकारितेची वाटचाल केली पाहिजे.
टिळकांचा निर्भिडपणा, निर्भयता, स्पष्टता, धडाडी तसेच देशप्रेम व राष्ट्रनिष्ठा या गोष्टी नजरेसमोर ठेवून पत्रकारांनी कोणाचीही मुलाहिजा न बाळगता समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी, अन्याय, समाजकंटकांकडून होणारे अत्याचार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार, अत्याचार, अन्याय यावर परखडपणे विचार मांडून ही कृष्णकृत्ये करणार्यांची कृती वेशीवर टांगली पाहिजे व त्यांचे शाब्दिक वाभाडे काढून त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. हे करत असताना आपली लेखणी तिखट बनली पाहिजे. कोणत्याही राजकीय पुढार्यांचा, सामाजिक पुढार्यांचा दबाव अथवा भीती न बाळगता सत्यता प्रकाशात आणणे हे पत्रकारांचे काम असून जनजागृती करणे हे मुख्य तत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्यांनी लिहिलेले केसरीतील अग्रलेख परकीय सत्ताधीशांना न जुमानता व त्याच्या परिणामांनाही न घाबरता लिहिले. त्यांचा अग्रलेख ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ अशासारखे तसेच शि. म. परांजपे यांच्या ‘काळ’ या वर्तमानपत्रातील ‘ध्रुवाची गोष्ट खोटी असावी’ हा लेख परकीय सत्तेची पाठराखण करणार्या देशवासियांचे वाभाडे काढणारा होता. अशी पत्रकारिता पत्रकारांच्या अंगी असणे आवश्यक आहे. केवळ त्यांच्या जयंतीचा किंवा पुण्यतिथाचा उत्सव साजरा करून भागणार नाही. स्वातंत्र्यानंतर तर या लोकशाहीत, तुम्हांस भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानात बहाल केलेले आहे. त्याचा पुरेपूर उपयोग निर्भयपणाने करणे ही पत्रकारिता आहे.
पत्रकाराला चमचेगिरी, लाचारी, हुजरेगिरी, भाईगिरी हे गुण शोभा देणारे नाहीत. आजकाल बरीच वर्तमानपत्रे कुठल्या ना कुठल्या राजकीय पुढार्यांच्या मालकीची झालेली आहेत. त्यामुळे पत्रकार आपले विचार स्वातंत्र्य प्रगट करू शकत नाहीत ते राजकीय पुढार्यांच्या दबावामुळे. राजकारण्यांतील नैतिकता, चारित्र्य – चरित्र, सभ्यता या शब्दांची गच्छंती झाली आहे. त्यामुळे पत्रकाराला सत्यता चव्हाट्यावर आणणे अवघड काम झाले आहे. तेव्हा या चौथ्या खांबाला डळमळीतपणा आल्याची शंका निर्माण होते. लोकशाहीत ही भीती वाटते. स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्याने चालण्याची मोकळीक झाली. त्यामुळे स्वैराचाराचे रूप स्वातंत्र्याला आले आहे. स्वातंत्र्यातून ‘स्वराज्य’ निर्माण करण्याची ताकद पत्रकारात आहे. या शक्ती दबावामुळे दबून गेल्या आहेत.
लोकमान्य टिळक, आगरकर, परांजपे, खाडिलकर यांची निर्भय व निर्भिड, सडेतोड पत्रकारिता आता जवळजवळ लुप्त झालेली आहे. परकीय सत्ता, ब्रिटीश पोर्तुगीज सत्ता जरी इथून घालविण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी आजही आम्ही परकीय सत्तेच्या दबावाखाली आहोत. परकीय सत्तेने देशावर सत्ता गाजविली, ती इथल्याच स्वाभिमानशून्य लोकांच्या मदतीनेच आणि आजही ती स्थिती बदललेली नाही. सत्ता गाजविणे, स्वार्थ साधणे या मोहोळापुढे, देशभक्ती, स्वाभिमान, अस्मिता, राष्ट्रभक्ती याला तिलांजली मिळाली आहे. यासाठी लाचारी, हुजरेगिरी, चमचेगिरी, भाटगिरी करून स्वार्थ व सत्ता उपभोगायची कला प्राप्त करून घेतली आहे. तेव्हा स्वातंत्र्यातून स्वराज्याकडे नेण्याची किमया पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेतून करणे गरजेचे आहे. जनजागृती, समाजप्रबोधन करून देशप्रेम वाढीस लावणे हे पत्रकाराचे आद्य कर्तव्य आहे. केवळ टिळकांची जयंती, पुण्यतिथी, उत्सव साजरे करून भागणार नाही. असा आदर्श पत्रकाराचे गुण अंगी बाणवले पाहिजेत. तसच असे उत्सव साजरे करण्याचे सार्थक होईल. पत्रकारिता ही पत्रकाराने दर्पण बनविली पाहिजे. तरच या दर्पणात सर्व काही प्रतिबिंबित होईल.