– लाडोजी परब
कणकेश्वर म्हणजे प्रती काशिच! शिवाचे जागृत स्थान असलेल्या कुणकेश्वराच्या पायावर अरबी समुद्रही नतमस्तक झाला आहे. महाशिवरात्रीचा येथील उत्सव म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा! प्रत्येक दिवशी ११० हून अधिक असलेल्या शिवलिंगावर अभिषेक सुरू असतो. भाविकांचा अपार उत्साह आणि श्रद्धेचा हा दिव्य उत्सव कोकणची एक वेगळी ओळख सांगून जातो. कुणकेश्वराचे मंदिर हे भव्यता, शिल्पकला यांचा अनोखा संगम आहे. आपल्या देशात शिल्पकला, स्थापत्यशास्त्र व विज्ञान कसे बहराला आले त्याचे साक्ष देणारे हे मंदिर!
देवगड (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील कुणकेश्वर गाव आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. जांभ्या चिर्यांच्या जाड भिंतीच्या आत दडलेले काळ्या दगडांचे प्रचंड कोरीव काम लक्षवेधी आहे. भग्न दगडी अवशेषांवरील प्राचीन कलाकुसर हिंदू वास्तूशैलीचा अनोखा आविष्कार घडवते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखे येथील मंदिराचे अप्रतिम रेखीव प्रमाणबद्ध कोरलेले दगडी खांब, सर्वतोभद्र प्रकारात कोरलेल्या पाषाणी नक्षीदार जाळ्या आदी अवशेषांनी हे मंदिर किती प्राचीन आहे याचे वास्तूशास्त्रीय पुरावे सापडतात. हे मंदिर राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य यांसारख्या हिंदू राजवंशांनी बांधल्याची साक्ष देते. पायरीच्या दोन्ही बाजूला सिंहमुखे कोरलेली आहेत. प्राचीन हिंदू शिल्पकलेत उभारलेल्या मंदिरांमध्ये व्याळ, किर्तीमुखे, अश्वमुखे, नाग, गरुड, वराह यांसारख्या हिंदू पद्धतीच्या वास्तूशैलीची चिन्हे ठळक आढळतात. ही सर्व चिन्हे कुणकेश्वर मंदिराच्या प्राचीन अवशेषांवर असल्याचे आढळून आले आहे. मंदिरातील पाषाण स्तंभ, दगडी जाळ्या व कोरीव दगडी भग्नावशेष मंदिराचे बांधकाम फार प्राचीन असल्याची साक्ष देतात. या मंदिरात चार शिवमंदिरे आहेत. या चारही मंदिरांच्या शिखरांचे बांधकाम प्राचीन वैदिक पद्धतीप्रमाणे कुंभज शैलीचा साक्षात्कार घडवतात. ही चारही मंदिरे प्राचीन आहेत. ती हेमाडपंथी बांधणीची आहेत. श्री कुणकेश्वर, श्री मंडलीक मंदिर व श्री भैरव मंदिर ही त्यातील तीन मंदिरे आहेत. पण, एका शिवमंदिराच्या वास्तूत थडगे कसे? हा प्रश्न एखाद्या भक्ताला पडला नाही तर नवल? हे मंदिर ११व्या शतकापूर्वी दक्षिणेतील नाविक हिंदूराजांच्या काळात बांधले आहे, असे स्पष्ट संकेत देणारे शिल्पकार या मंदिराचे आहेत. मात्र, अरबी व्यापार्याने हे मंदिर बांधले असे दाखविणारा एकही सज्जड पुरावा सापडत नाही. मंदिरावर असणारे गंडभेरुंड व जागोजागी असणारी विशिष्ट शैलीतील सिंहमुखे ही नाविक हिंदू राजसत्तांची राजचिन्हे आहेत. हे स्थळ कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील घाटरस्त्यावरून श्रीदेव कुणकेश्वर मंदिराच्या कलशाचे दर्शन होते आणि नकळत कर जोडले जातात. कुणकेश्वर हे आता एक पर्यटन स्थळ बनले आहे. सृष्टीचा परमात्मा म्हणजे शिव! या परमात्म्याची महाशिवरात्रीदिनी भेट घ्यावी, हा अपूर्व योग, सुखद सोहळा!
सह्याद्रीची सप्त शिवालये
सह्याद्रीत वसलेल्या सप्त शिवालयांपैकी श्री जोम मल्लिकार्जुन मंदिराची यात्रा! महाशिवरात्रीच्या मध्यरात्री सह्याद्रीच्या पर्वतशिखरावर ही यात्रा सजते. सह्याद्रीच्या माथ्यावरची सप्त शिवालये प्रसिद्ध आहेत. श्री जोम मल्लिकार्जुन मंदिर हे शिवालय सह्याद्रीच्या पर्वतात विराजमान आहे. या शिवालयांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शिवालय हे प्राचीन पांडवकालीन हेमाडपंथी बांधकामाने बनविण्यात आल्याचे आढळून येते. शिवरात्री उत्सवात इथे येणार्या पाहुण्यांना मानाचे विडे काढण्याची प्रथा आहे. इथे येणार्या भाविकांचा ओघ एवढा असतो की शिवरात्रीच्या रात्री त्यांच्यासाठी विनामूल्य फराळाची सोय करण्यात येते. येथे येणार्या प्रत्येक भाविकाला सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा साद घालतात. पैकी सर्वात उंच शिखर हे ४२०० फूट उंचीचे असल्यामुळे या शिखराला पर्वत म्हटले जाते. याच पर्वतावर जोम मल्लिकार्जुन देवाचे मंदिर आहे.
काशी, बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर ही सर्वच तीर्थक्षेत्रे आहेत. परंतु निवृत्तीनाथांना बोध झाला तो मात्र त्रिंबकेश्वराच्या एका गुहेत! सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या एका शिखरावर श्री जोम मल्लिकार्जुन शिवालयाचे एकांताचे स्थान आहे. प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यास ही रम्य अशी जागा आहे. हे देवस्थान सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मोडत असले तरीही तिथे जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडहून रस्ता व सुविधा आहेत. याठिकाणी जाताना रघुवीर घाटासारख्या निसर्गरम्य घाट पाहताना डोळे तृप्त होतात. या मल्लिकार्जुन शिवालयाच्या ठिकाणी अगस्तीमुनी आणि लोपामुद्रा यांनी तपश्चर्या करून ते तेथेच समाधिस्थ झाले, असे सांगितले जाते. जोम मल्लिकार्जुन शिवालय मंदिरात जाण्यासाठी खेडहून खोपीला जावे लागते. तिथे गेल्यानंतर शिंदी गाव लागते. शिंदी याठिकाणी आपल्या वाहनांना थांबवल्यानंतर तेथून पर्वत मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराळ भागातून पाऊलवाट आहे. डोंगर माथ्यावरून खळखळ वाहणारे निर्झर भाविकांची तृष्णा भागविण्यास तत्पर असतात. झर्यांचे पाणी थंड व पिण्याजोगे आहे. या क्षेत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे डोंगरमाथ्यावर पाच-सहा ठिकाणी पाण्याचे झरे बारमाही वाहतात. येथे प्राचीन काळी खोदलेली सहा-सात फूट खोल पाण्याने भरलेली दोन कुंडे आहेत. त्याठिकाणी भाविकांसाठी स्नानाची सोय आहे. या ठिकाणाहून सूर्यास्तावेळी सूर्यनारायणाची विविध रूपे दृष्टीस पडतात. सह्याद्रीच्या माथ्यावरची ही सप्त शिवालये… श्री जोम मल्लिकार्जुन, चौकेश्वर, मोळेश्वर, गाळेश्वर, घृणेश्वर, धारेश्वर आणि तळेश्वर! हिंदू धर्मीयांची भावोत्कट श्रद्धा आणि जोडीला शिवरायांच्या हिंदवी पराक्रमाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेले हे निसर्गरम्य स्थळ कुणालाही मोहवून टाकेल यात शंका नसावी.