कुंकळ्ळीतील अपघातात 1 ठार; चौघेजण जखमी

0
12

कुंकळ्ळी कदंब बसस्थानकानजीक तीन वाहनांत झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, तर चार जण जखमी झाले. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडला.
या अपघातात दुचाकीचालक साहिल शेख (19) हा गंभीर जखमी झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला गजानन चव्हाण (19) हा ठार झाला. सदर दुचाकीस्वाराने दोन वाहनांना धडक दिल्याने आणखी तिघे जखमी झाले.

कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शेख हा गजानन चव्हाण याच्यासह यामाहा एफझेड दुचाकीवरून भरवेगाने व निष्काळजीपणे पाझरखणी येथून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाजवळ एका अज्ञात वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाताना समोरून त्यांच्या दुचाकीने कारला धडक दिली. त्या धडकेत कार उलट्या दिशेला गेली. या धडकेने दोघेही खाली कोसळले आणि त्यात गजानन हा गंभीर झाला. त्याचवेळी पाझरखणी येथून कुंकळ्ळीच्या दिशेने हिरो होंडा दुचाकीने जाणाऱ्या मंजू लखप्पा पावडी (19) याला देखील त्यांच्या दुचाकीने धडक दिली. त्यात तोही जखमी झाला. या तीन वाहनांच्या अपघातात कारचालक तन्मय च्यारी (19), त्याची आई शोभिता च्यारी (45, रा. पाझरखणी) हे दोघे जखमी झाले. गजानन चव्हाण हा मूळ बिहार येथील असून, तो सध्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. दरम्यान, सोमवारी कुंकळ्ळीत झालेल्या अन्य दोन अपघातांचा तिघांचा मृत्यू झाला होता.