‘लाडली लक्ष्मीं’ना मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा नोंद

0
9

>> 1 लाखांपैकी अर्धी रक्कम न दिल्याने मारहाण

‘लाडली लक्ष्मी’ योजनेच्या दोघा लाभधारकांना कमिशनच्या पैशांच्या वादातून मारहाण करणाऱ्या तिघा महिलांवर फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बाबल्याखळी, नागझर-कुर्टी येथे सोमवारी ही मारहाणीची घटना घडली होती. सदर योजनेचे अर्ज मंजूर झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे 50 टक्के रक्कम न दिल्याने हा प्रकार घडला होता.
संशयित तिन्ही महिला या नागझर-कुर्टी येथील असून, लाडली लक्ष्मी योजनेचे अर्ज मंजूर करून आणण्याच्या बदल्यात या महिलांनी दोघा लाभधारकांकडे योजनेतील पैसे मिळाल्यानंतर त्यापैकी 50 टक्के पैसे आपणास देण्याची अट त्यांना घातली होती; मात्र योजनेचे 1 लाख रुपये मिळाल्यानंतर एका लाभधारक महिलेने 50 हजार रुपयांऐवजी 30 हजार रुपये, तर दुसऱ्या लाभधारक महिलेने 20 हजार रुपये दिल्यानंतर सदर संशयित तिघा महिलांनी त्यांना जबर मारहाण केली होती. त्यापैकी एक महिला मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तिला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले होते.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे जयश्री कंपद, सुवर्णा कंपद आणि सुमित्रा कंपद अशी आहेत. पीडित महिलांच्या मातेने दिलेल्या माहितीनुसार दोघाही मुलींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदर संशयित महिलांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले. योजनेचे पैसे मिळाल्यानंतर एका मुलीने सदर कमिशन एजंट महिलांना 30 हजार रुपये, तर दुसऱ्या मुलीने 20 हजार रुपये दिले. त्यावर योजनेखाली मिळणाऱ्या पैशांपैकी 50 टक्के एवढ्या पैशांची मागणी त्या तिघींनी केली; मात्र तेवढे पैसे न दिल्याने त्यांनी दोघा मुलींना मारहाण केली. या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भाजपच्या लाचखाऊ महिला कार्यकर्त्यांवर
कडक कारवाई करा; गोवा फॉरवर्डची मागणी

लाडली लक्ष्मी योजनेखालील 2 हजार अर्ज प्रलंबित आहेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना लाच खाता यावी, यासाठीच हे अर्ज निकालात न काढता प्रलंबित ठेवले आहेत का, असा सवाल गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा डॉ. रेणुका दिनीज डिसिल्वा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माफी मागावी, तसेच लाचखाऊ महिलांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभधारकांकडून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लाच घेतल्याचा प्रकाराचा आणि कमिशनचे कमी पैसे दिल्याच्या कारणावरुन त्यांना मारहाण करण्याच्या घटनेचा गोवा फॉरवर्ड पक्ष तीव्र निषेध करीत असल्याचे डॉ. डिसिल्वा यांनी सांगितले. भाजप सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच आहेत का, भाजपचे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ धोरण हेच आहे का, भाजपचे ‘सुशासन हेच आहे का, असे सवाल डिसिल्वा यांनी उपस्थित केले.
राज्यातील गरीब महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या लोककल्याणाच्या योजनेवर जनतेचा पैसा खर्च होत आहे व भाजपच्या महिला कार्यकर्त्या एजंटांना लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभधारकांकडे लाच मागण्याचा अधिकार नाही, असे डिसिल्वा म्हणाल्या.
एका महिलेकडून 20 हजार रुपये, तर दुसऱ्या महिलेकडून 30 हजार रुपये लाच घेण्यात आलेली असून, त्यांना जबर मारहाणही करण्यात आली आहे. हे कृत्य करण्याचे धाडसच या महिलांना कसे आले, असा सवालही डिसिल्वा यांनी केला.
यापूर्वी ‘लाडली लक्ष्मी’चे पैसे हे मुलींना शिक्षण घेण्यासाठी अथवा उद्योगधंदा सुरू करण्यासाठीही दिले जायचे. आता ते बंद करुन केवळ विवाहाच्या वेळीच पैसे दिले जातात. सरकार आपल्या या कृतीतून काय दाखवू पाहते. महिलांनी चांगले शिक्षण घेऊ नये, उद्योगधंदा करू नये, केवळ लग्नच करावे असे सरकारला वाटते काय, असा सवालही डिसिल्वा यांनी यावेळी केला.