Home बातम्या काश्मीरात सभापतींवर भिरकावला पंखा

काश्मीरात सभापतींवर भिरकावला पंखा

0

नॅशनल कॉन्फरन्स कार्यकर्त्याच्या कारागृहातील मृत्यू प्रकरणावरून जम्मू काश्मीर विधानसभेत काल मोठा हंगामा झाला. पीडीपी पक्षाने दिलेला स्थगन प्रस्ताव सभापतींनी नामंजूर केल्यानंतर विरोधी पक्षांनी थयथयाट केला. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सलग तीनवेळा कामकाज तहकूब करावे लागले.

विधानसभाध्यक्ष मोहम्मद अकबर लोण यांची स्थगन प्रस्तावाची मागणी फेटाळल्यावरून विरोधकांचा भडका उडाला. इतक्यातच, पीडीपीचे आमदार मौलाना इफ्तिकार यांना सभापतींनी बेईमान आणि गद्दार म्हटल्यावर ते उसळले. त्यांनी जवळचा पंखा उचलून अध्यक्षांच्या दिशेने भिरकावला. वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हं दिसू लागल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. तहकुबीनंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा अध्यक्ष मोहम्मद अकबर लोण यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आपण रागाच्या भरात काहीबाही बोलून गेलो, पण मौलाना इफ्तिकार यांचा हात कायम माझ्या डोक्यावर राहिलाय. त्यामुळे मी त्यांची बिनशर्त माफी मागतो, असं त्यांनी प्रांजळपणे नमूद केलं. गदारोळादरम्यान, अन्य सदस्यांनीही स्वत:च्या आसनासमोरील माईक्‌स उपटून फेकले. काहीजण आपल्या आसनावर उबे राहिले व घोषणा देऊ लागले.

चौकशीस तयार : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

दरम्यान, सय्यद मुहम्मद युसूफ यांच्या कारागृहातील मृत्यूप्रकरणात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सहभाग असल्याचा आरोप पीडीपी आमदारांनी केला. यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपण न्यायालयीन चौकशी आयोगासमोर उपस्थित राहण्यास तयार असल्याचे सांगितले. आपणावर खोटे आरोप करण्यात येत असून ते करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.