हेडलॅण्ड सडा येथील सडा उपकारागृहातील कैद्यांना भेटण्याचे निमित्त करून आलेल्या व्यक्तीकडे गांजा सापडल्याने त्याला मुरगाव पोलिसांनी अटक केली.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्याचे नाव रवळनाथ पवार (३८ वर्षे) असून तो बेळगाव येथील आहे. रवळनाथ आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अधून मधून सडा उपकारागृहात येत असे. त्याचे मित्र पणजी येथील एकाखून प्रकरणात सडा उपकारागृहात शिक्षा भोगत आहेत. अरुण पाटील, रवी पाटील व अनिल भोये असे अशी कैद्यांची नावे असून रवळनाथ पवार नेहमीप्रमाणे काल सकाळी वरील कैद्यांना भेटण्यास आला होता. त्याल आत सोडण्यापूर्वी प्रवेशद्वारावरील पहारेकर्यांनी रवळनाथची झडती घेतली असता त्यांनी आपल्या बुटात गांजाची एकूण १२० ग्राम वजनाची १३ पाकीटे लपवून आणल्याचे सापडले.
आरबीआय पोलीस पहारेकर्यांनी त्याला नंतर सडा उपकारागृहाचे अधीक्षक पेडणेकर यांच्या हवाली केल्यानंतर त्यांनी त्याला मुरगाव पोलिसांच्या हवाली केला. मुरगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्द अमली पदार्थविरोधी कायदा कलमाखाली गुन्हा नोंद करून पुढील चौकशीसाठी अटक केली.