Home बातम्या कांदोळकरांना अटक करा

कांदोळकरांना अटक करा

0

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना आमदार तथा गोवा कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे लोक आमदार किरण कांदोळकर यांचे समर्थक असून कांदोळकर यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष नीळकं हळर्णकर व प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

वाघ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भाजपचे पदाधिकारी सतीश धोंड यांचाही हात असल्याचा आरोप वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी परवा रात्री पोलीस स्थानकावरच केला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या राज्यात स्वत:च्या पक्षाचे कार्यकर्ते आमदारावर हल्ला करतात. आमदारांनाही संरक्षण देणे शक्य नसलेले सरकार सामान्य जनतेला कसे संरक्षण देणार, असा प्रश्‍न हळर्णकर यांनी केला. मुख्यमंत्री पर्रीकर व आमदार किरण कांदोळकर यांनी वाघ यांना वरील कार्यक्रमास  न जाण्याची सूचना केली होती. त्यावरून हा पूर्वनियोजित हल्ला आहे, यात संशय नसल्याचे डिमेलो यांनी सांगितले.
थिवी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण बार्देश तालुक्यात जुगाराला उत आला आहे, असे असतानाही सरकार कारवाई करीत नसल्याचा आरोप हळर्णकर यांनी केला. वाघ यांनी प्रसाद सिनारी, अवधुत हळर्णकर, यशवंत चोडणकर, सुरज कांबळी व च्यारी यांच्या विरुध्द पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती हळर्णकर यांनी दिली. वरील प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पर्रीकर यांनी पदत्याग करावा, असे आवाहन त्यांनी केले. काल दुपारपर्यंत भाजपच्या एकाही आमदाराने वाघ यांच्याशी संपर्क साधला नाही, त्यामुळे भाजपचे कटकारस्थान उघड झाल्याचा आरोप डिमेलो यांनी केला.