Home अंगण कविता

कविता

0
  • डॉ. सुनेत्रा कळंगुटकर

कविता ही शाश्वताची वात असते आणि जगताना ती आपल्याला प्रकाश देते. म्हणूनच कवितेविषयी म्हणावेसे वाटते, कविता रुजते मनाच्या खोल तळाशी… नाते जोडते निळ्या नभाशी… कविता म्हणजे मनाचा ध्यास… कविता म्हणजे फुलांचा वास… कविता म्हणजे वेदना… कविता म्हणजे साधना…

कविता हे नावच किती सुंदर! कविता म्हणजे मनाचा उद्गार! हृदयाचा हुंकार!! कविता वाहत असते आतून खोल खोल झऱ्यासारखी… विहरत असते नभात पक्ष्यासारखी… कविता असते समुद्राची लाट… कविता असते नदीचा हिरवा घाट… कविता म्हणजे पावसाची बरसात… कविता म्हणजे चांदण्याची रात… कविता म्हणजे हिरवळ… कविता म्हणजे सुगंधाचा दरवळ… मातीत फुटलेले लसलसते हिरवे कोंभ म्हणजे कविता… नभातील लखलखणारी नक्षत्रे म्हणजे कविता… कविता कधी अलवारपणे निसर्गरंग टिपते, कधी फुलपाखरांचे रंग लेवून भिरभिरते… कविता म्हणजे रसयात्रा…
उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता… तमसा नदीच्या तीरावर क्रीडा करीत असलेल्या क्रौंच पक्ष्याच्या एका जोडीतील नराला एका व्याधाकडून बाण मारला जातो आणि त्यामुळे त्या नराचा मृत्यू होतो. तेव्हा त्याची जोडीदारीण पक्षिणी विलाप करू लागते. हे दृश्य पाहिल्यावर वाल्मिकी ऋषींच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली-
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा: ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी: काममोहितम्‌‍ ॥
ही शापवाणी उच्चारल्यावर महर्षी वाल्मिकींना आपण काव्यनिर्मिती केल्याची जाणीव झाली आणि पुढे त्यांच्या हातून रामायणाची रचना झाली.

कधीतरी एखाद्या वळणावर अवचित कविता आपल्याला भेटते. कविता आपल्याला भेटली की आपले जीवन आनंदगाणे होऊन जाते. अनेक कवींनी कवी आणि कवितेविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. आनंदयात्री बा. भ. बोरकरांनी ‘कवी कोण’ हे सांगताना लिहिले आहे-
मतीनें कृतीनें उक्तीनें निर्मळ
तेजानें उजळ करी जनां
हाच खरा कवि प्रीत पाझरवी
तेजें दिपे रवि ईश्वर हा
कविता हा सर्वांचा आवडता साहित्यप्रकार. सोपा भासणारा पण तितकाच कठीण असलेला हा प्रकार. कवीवर देवी शारदेची कृपादृष्टी असते. कवी देवाचा लाडका असतो. ‘आम्ही कोण?’ या कवितेत केशवसुतांनी कवीची महती सांगितली आहे. ते म्हणतात,
आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?
आम्ही असूं लाडके देवाचे,
दिधलें असे जग तयें आम्हांस खेळावया;
विश्वीं या प्रतिभाबलें विचरतों चोहींकडे लीलया;

दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके!
कवी आपल्या प्रतिभेच्या बळावर सगळीकडे संचार करतो. तो दिक्कालातून आरपार पाहू शकतो. कविता ही कवीसाठी शब्दांचा खेळ नसतो तर ती त्याच्या आयुष्याचे बळ असते. सगळी ओझी टाकून कवी कवितेच्या किनाऱ्यावर विसावतो. समाजातील सुखदु:खांचे, विषमतेचे चित्र रंगवत असतो.
कविता लिहिणे हे जितके सोपे वाटते तितकेच ते कठीण असते. कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नसतो. कविवर्य केशवसुतांनी आपल्या एका पत्रात कवितेबद्दल सुंदर विचार व्यक्त केले आहेत. एका तरुण नवोदित कवीला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात- ‘कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा 99 आपणास होरपळून मात्र घेतात. मी असा नव्व्याण्ण्वांपैकीच आहे.’

कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेला समिधा म्हटलेले आहे. त्यात ओलावा नाही, त्या रुक्ष आहेत असे सांगून, आपल्या कवितेला तुमच्या अंतरातील अग्नी फुलवण्याची एकच आकांक्षा आहे, असे ते म्हणतात.
समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!
चांगल्या कविता दीर्घकाल आपल्या लक्षात राहतात. लहानपणापासून शिकलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या अनेक आशयसंपन्न कविता आपल्या स्मरणात राहतात. आपल्याला आनंद देतात. आपल्याला जीवनाचा अर्थ समजावतात. कविता ही शाश्वताची वात असते आणि जगताना ती आपल्याला प्रकाश देते, हेच खरे.
म्हणूनच कवितेविषयी म्हणावेसे वाटते, कविता रुजते मनाच्या खोल तळाशी… नाते जोडते निळ्या नभाशी… कविता म्हणजे मनाचा ध्यास… कविता म्हणजे फुलांचा वास… कविता म्हणजे वेदना… कविता म्हणजे साधना…