कळंगुटमध्ये लोबोंविरुद्ध भाजपचे जोसेफ सिक्वेरा

0
7

>> मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

भाजपची साथ सोडून गेलेल्या मायकल लोबो यांना कळंगुट मतदारसंघात पराभूत करण्यासाठी यशस्वी चाल खेळताना भाजपने मंगळवारी विरोधी गट फोडून कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना पक्षात प्रवेश दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांच्याविरुद्ध त्यांना कळंगुटमधून निवडणूक रिंगणात उतरवले जाणार आहे.

सिक्वेरा यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी पणजीत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आमदार ग्लेन टिकलो यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांना कळंगुट मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे जोसेफ सिक्वेरा, आग्नेल फर्नांडिस व अँथनी मिनेझिस हे नाराज बनले होते व त्यांनी बंडाची भाषा करीत तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. कळंगुटमध्ये उमेदवाराच्या शोधात असलेल्या भाजप नेत्यांनी या संधीचा फायदा उठवत काल या विरोधी गटातील एक प्रबळ नेते असलेल्या जोसेफ सिक्वेरा यांना भाजपात प्रवेश दिला. दरम्यान, जोसेफ सिक्वेरा यांना आम्ही कळंगुटमधून निवडणूक रिंगणात उतरविणार आहोत, असे सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणारे नेते हे स्वार्थी व आपमतलबी असून, या नेत्यांना मतदार कधीही माफ करणार नाहीत. यापुढे आपण भाजपसाठी आणि पक्षाच्या विजयासाठी काम करणार आहे. जोसेफ सिक्वेरा.