कर्मयोगी लोकमान्य टिळक

0
21
  • शंभू भाऊ बांदेकर

देशाच्या स्वातंत्र्याचे, सुराज्याचे स्वप्न टिळकांनी पाहिले व त्यासाठी देह झिजविला. परदास्याच्या श्रृंखला तोडून मातृभूमी मुक्त व्हावी म्हणून त्यांनी काया, वाचा, मने जे जे करता येईल ते केले. असंतोषाचे जनक आणि जनकत्व समर्थपणे व यथार्थपणे पूर्णत्वास नेणाऱ्या वंदनीय लोकमान्यास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हटले की सर्वप्रथम दोन गोष्टींची आठवण होते- पहिली म्हणजे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ असे इंग्रजांना निर्भीडपणे सांगणारे व दुसरी गोष्ट म्हणजे, तितक्याच निर्भीडपणे आपल्या अग्रलेखातून इंग्रजांना ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ म्हणत खडसावणारे, यातून टिळकांची जाज्वल्य देशनिष्ठा स्पष्ट होते. त्यांनी इंग्रजांना चोहोबाजूंनी सळो की पळो करून सोडले होते, म्हणूनच तर ते ‘असंतोषाचे जनक’ ठरले.

त्यांच्या अद्वितीय लेखणीचे सामर्थ्य कळावे म्हणून त्यांच्या अनेक लेखांची, अग्रलेखांची शीर्षके वाचली तर त्यातील मजकुरांची परखडता, सरकारवर केलेले जहाल प्रहार आणि स्पष्टपणे सरकारला दाखवून दिलेल्या चुका आपल्या लक्षात येतात. पत्रकारांनी पिवळी पत्रकारिता सोडून लोकमान्य टिळकांचा आदर्श घ्यावा असे आवर्जून त्यांचे स्मरण करताना सांगितले जाते.

लो. टिळकांचे संपूर्ण जीवन निखळ कर्म करण्यातच गेले. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत काम करून त्यांनी स्वतःचे वेगळेपण व महत्त्व सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सिद्ध करून दाखवले. देशाच्या स्वातंत्र्याचे, सुराज्याचे स्वप्न त्यांनी पाहिले व त्यासाठी देह झिजविला. परदास्याच्या श्रृंखला तोडून मातृभूमी मुक्त व्हावी म्हणून त्यांनी काया, वाचा, मने जे जे करता येईल त्यात तसूभरही कमतरता पडू दिली नाही.
सगळ्या जातिधर्मातील लोकांना एकत्र करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करायचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. देशभक्तीपर व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम करमणुकीच्या माध्यमातून साजरे करून त्यांनी आपल्या देशाचे स्वातंत्र्य तर जवळ आणलेच, पण या स्वराज्याचे सुराज्यात कसे परिवर्तन करता येईल, यासाठीही ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

लोकमान्य टिळक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन अग्रणी. फरक होता तो इतकाच की, लो. टिळक यांची जहाल, तर म. गांधींची मवाळ भूमिका. टिळकांची देशाच्या स्वातंत्र्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशी भूमिका होती, तर म. गांधी सत्य, अहिंसा, शांती अशा विवेकशील व संयमी भूमिकेचे पुरस्कर्ते होते. असे असले तरी दोन्ही स्वातंत्र्ययोद्धे एकमेकांची पात्रता व महत्ता जाणून होते व तशा आदरयुक्त भावनेने त्यांनी शेवटपर्यंत काम केले. गांधीजींचा विवेक, संयम, सहनशीलता आपल्याला मान्य नाही व तसे वागणे आपल्याला शक्यही नाही असे टिळक म्हणत, तर टिळकांचा जहाल मतप्रवाह आपल्याला मान्य नाही असे गांधीजी म्हणत. पण त्याचबरोबर टिळकांच्या ‘गीतारहस्या’वर मात्र त्यांची फार श्रद्धा व भक्ती होती. ते मी या लेखाच्या शेवटी सांगणारच आहे.

लोकमान्य टिळकांची तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ‘गीतारहस्य’ या महान ग्रंथाचे जनक आहेत. मुळात भगवद्गीता हा नीतिशास्त्र सांगणारा धार्मिक ग्रंथ होय. गीता स्वतःला उपनिषद म्हणते. शंकराचार्यांनी तिला ‘स्मृती’ म्हटले आहे, तर लोकमान्य टिळकांनी तिला ‘कर्मयोगशास्त्र’ संबोधले आहे. अशा या गीतेमुळे मायानंद चैतन्य विज्ञानवादी बनले, म. गांधी व आचार्य विनोबा भावे अहिंसेचे समर्थक बनले, तर क्रांतिकारी अरविंद घोष आत्मचिंतनात बुडाले, असा या गीतेचा महिमा आहे. अशी ही गीता जगातील किमान 75 भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहे. याचे कारण म्हणजे कोणत्याही धर्माचा पवित्र ग्रंथ काव्यगुणांच्या बाबतीत गीतेशी बरोबरी करू शकत नाही, असे विदेशी विद्वानांचे मत आहे.

गीतेची सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर त्यातील प्रमुख पात्र श्रीकृष्ण होय. कृष्ण प्रेमाने सर्वांना जवळ करतो. तो बालमित्रांबरोबर जसा त्यांचा म्होरक्या बनून त्यांच्या जीवनात मजा आणतो, तसा गोपिकांना सतावूनही त्यांच्या आदरास, प्रेमास पात्र ठरतो. आपला दरिद्री बालमित्र सुदामा याच्यावर जसे तो निर्व्याज प्रेम करतो, तशाच प्रकारे कंसालाही सुधारण्याच्या अनेक संधी देतो. विलास भोगून अनासक्त राहिलेला, पराक्रमी, सर्व शास्त्रांनी आणि शस्त्रांनी पारंगत असूनही शस्त्रत्याग करणारा, कूटनीतीत भल्याभल्यांना न हारणारा तो तत्त्ववेत्ता आहे. असे असूनही तत्त्वासाठी आपल्या लोकांचा बळी न देणारा, जो-जो संकटात आहे, संकट विमोचनासाठी त्याची आराधना करीत आहे, त्याच्या संकटकाळी धावून जाणारा, जीवनाकडे खिलाडू वृत्तीने पाहणारा, सृजनांचा त्राता आणि दुर्जनांचा कर्दनकाळ असा हा कृष्ण गीतेने आम्हाला दिला. तोच कृष्ण गीतारहस्यातून एकेक रहस्य उलगडवून दाखवतो आणि मग लोकमान्य टिळक गीता रहस्यकार बनून या कर्मयोगशास्त्राचे महत्त्व उलगडून दाखवतात.

मंडालेच्या कारागृहात लो. टिळकांनी गीतेवरील टीका समजला जाणारा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून मानवजातीवर फार मोठे उपकार केले आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘परखड बुद्धिवादी विवेचन’ हे होय. गीतेवरील अन्य टीकाकारांच्या प्रज्ञेचा योग्य तो आदर राखून हे मुक्त स्वातंत्र्य टिळकांनी घेतले आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमुळेच लो. टिळक ‘कर्मयोगी’ संज्ञेस पात्र ठरले असे नव्हे, तर टिळकांच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा मांडला तर सर्वार्थाने ते ‘कर्मयोगी’ ठरतात हे आपल्या लक्षात येते.
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लो. टिळक म्हणतात, ‘केल्याविना काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही निष्काम बुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झाले. निव्वळ स्वार्थपरायणबुद्धीने संसार करून थकल्या-भागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणून ही गीता सांगितलेली नसून संसार हाच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्रांचे संसारातील खरे कर्तव्य काय आहे, याचा तात्त्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीता आरंभाची प्रवृत्ती झालेली आहे.’

टिळकांच्या गीतारहस्याचे रहस्य उलगडून सांगताना म. गांधी म्हणतात, ‘लोकमान्य टिळकांना अभ्यास व विद्वत्ता यांच्या ज्ञानसागरातून गीताप्रसादामुळेच हे दिव्य टीकामौक्तिक मिळाले.’ पुढे ते म्हणतात, ‘माझ्या बालपणीच आयुष्यात मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणाऱ्या आरंभग्रंथाची गरज मला भासली. मी कोठेतरी वाचले होते की, अवघ्या सातशे श्लोकांच्या मर्यादेत गीतेने साऱ्या शास्त्रांचे व उपनिषदांचे सार ग्रंथीत केले आहेत. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचता यावी म्हणून मी संस्कृत शिकलो. आज गीता माझे बायबल किंवा कुराण तर काय; त्यापेक्षाही अधिक माझी माताच झाली आहे. माझ्या लौकिक मातेस मी फार पूर्वीच अंतरलो; परंतु तेव्हापासून या गीतामाऊलीने माझ्या जीवनात तिची जागा पूर्ण भरून काढली आहे. आपत्काली मी तिचाच आश्रय घेतो.’
असंतोषाचे जनक आणि जनकत्व समर्थपणे व यथार्थपणे पूर्णत्वास नेणाऱ्या वंदनीय लोकमान्य टिळकांस त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.