>> मुख्यमंत्र्यांची रोजगार मेळाव्यात माहिती
>> नोकरीसाठी पैसे मागणार्यांविरोधात तक्रारीचे आवाहन
राज्यातील सरकारी खात्यातील नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक केली जाणार असून कर्मचारी भरती आयोगाकडून येत्या जानेवारी २०२३ पासून नोकरी भरतीला सुरू केली जाणार आहे. सरकारी नोकर्या पैसे घेऊन दिल्या जात नाहीत. सरकारी नोकरीसाठी पैसे मागणार्या व्यक्तीविरोधात पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करा. ‘मै ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे सरकारचे ब्रीदवाक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथे आयोजित सरकारच्या रोजगार मेळाव्यात काल केले.
कर्मचारी भरती आयोगाकडून सर्व खात्यातील एलडीसी ते प्यून आदी पदांच्या नोकरभरतीसाठी एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या वेगवेगळ्या खात्यातील नोकरीसाठी वेगवेगळी परीक्षा घेतली जात आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना अनेक ठिकाणी परीक्षा द्यावी लागत आहे. यापुढे ही प्रक्रिया बंद करून आयोगाकडून नोकरभरतीसाठी एकच परीक्षा घेतली जाणार आहे. नोकरभरतीसाठी उमेदवारांची गुणवत्ता ग्राह्य धरण्यात येणार आहे. आयोगामार्फत वर्षातून एकदा घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांद्वारे पदे भरली जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
१२५० जणांना नियुक्ती पत्रे
रोजगार मेळाव्यात १,२५० नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यात पोलीस दलात ९००, अग्निशामक दलात १८९, कृषिखात्यात ५९ आणि नियोजन आणि सांख्यिकी विभागात ५४ नियुक्तिपत्रांचा समावेश आहेत. या व्यतिरिक्त गेल्या ७ महिन्यांत इतर सरकारी विभागांमध्ये ४०० ते ५०० अधिक नियुक्ती करण्यात आली आहे, मोप विमानतळावर १,२०० जणांना नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
रोजगाराबाबत गंभीर
राज्य सरकार राज्यातील तरुणांना रोजगार देण्याबाबत गंभीर असून एकही युवक नोकरीपासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केला जात आहे. सरकारी खात्याबरोबरच निमसरकारी, खासगी क्षेत्रात नोकर्या मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशपातळीवर १० लाख सरकारी नोकर्या, खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील हॉस्पिटालिटी क्षेत्रात आगामी पाच वर्षात २ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्य सरकारच्या कामगार, कौशल्य विकास, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण या खात्यांनी आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी पाऊल उचलले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, बांधकाममंत्री नीलेश काब्राल, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मच्छीमारमंत्री नीळकंठ हर्ळणकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांची उपस्थिती होती.
‘स्वयंपूर्ण गोवा’
मोहिमेची प्रशंसा
पंतप्रधान मोदी यांनी गोवा सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेची प्रशंसा केली. गोव्यातील नवीन पर्यटन धोरणामुळे पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. दुहेरी इंजिन सरकारकडून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मोपचे लवकरच उद्घाटन ः मोदी
पंतप्रधानांचे आभासी पद्धतीने मार्गदर्शन
मोप आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ सुमारे ३००० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असून या मोप विमानतळाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यात आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना काल सांगितले.
सरकारने नवीन नियुक्त केलेल्या कर्मचार्यांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी निष्ठापूर्वक काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. गोवा पोलीस खात्यामधील नवीन कर्मचारी भरतीमुळे गोवा पोलीस दल आणखी मजबूत होईल आणि परिणामी नागरिक आणि पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढण्यास मदत होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.